भारत-चीन तणावामुळे कोरोनाची लढाई लढण्यासाठी भारतासमोर अडथळे निर्माण झालेत का?

    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत-चीन यांच्यातील दुरावलेल्या संबंधाचा फटका व्हेंटिलेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, ऑक्सीमीटर यांच्या पुरवठ्याला बसला आहे.

कोरोना हे जगावरचं अभूतपूर्व संकट आहे. जगभरातले नागरिक या विषाणूशी लढत आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16,000 पेक्षा जास्त आहे.

कोरोनावर रामबाण इलाज अशी लस किंवा औषध अद्याप तयार झालेलं नाही. कोरोनाची लक्षणं टिपण्यात तसंच उपचारांमध्ये व्हेंटिलेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ऑक्सीमीटर यांची भूमिका निर्णायक आहे.

या तिन्ही मेडिकल उपकरणांचं उत्पादन भारतात होतं. मात्र या प्रक्रियेत वापरल्या जाणारी छोटी छोटी उपकरणं चीनमधून आयात केली जातात.

म्हणूनच भारतातील मेडिकल क्षेत्रात कार्यरत माणसं, मेडिकल उपकरणं आयात करणाऱ्या कंपन्या यांच्यासह सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात एक प्रश्न डोकावतो. भारत-चीनदरम्यान ताणलेल्या संबंधांचा परिणाम या वस्तूंच्या उपलब्धतेवर होईल का?

भारत-चीन वाद

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लडाखमध्ये एलएसी अर्थात लाईन ऑफ अक्च्युअल कंट्रोल याठिकाणी दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला. 15-16 जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षामध्ये 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. या संघर्षात 76 भारतीय सैनिक जखमीही झाले.

या हिंसक घटनेसंदर्भात चीनने अधिकृत पातळीवर कोणतंही वक्तव्य दिलेलं नाही.

तब्बल 45 वर्षांनंतर एलएसी या ठिकाणी दोन्ही देशाचे सैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आणि त्यामध्ये काही सैनिकांचा मृत्यू झाला.

भारतात याघटनेचे तीव्र पडसाद उमटले. वीस भारतीय सैनिकांनी प्राण गमावल्यामुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली. केंद्र सरकारने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याला किंवा चीनमधून येणाऱ्या वस्तूंचं प्रमाण कमी करण्यासंदर्भात अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. रेल्वे मंत्रालय आणि टेलिकॉम मंत्रालयाने मात्र चीनमधून होणाऱ्या उपकरणांची आयात भविष्यात थांबवण्याचा इशारा दिला आहे.

जगभरातील आकडेवारी -

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-

फार्मएक्सिल म्हणजेच भारताच्या फार्मा एक्सपोर्ट काऊंसिलने चीनहून भारतात आलेल्या मात्र बंदरांमध्ये तसंच विमानतळावर अडकून राहिलेल्या वस्तूंसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अनेक वस्तू तसंच उपकरणं कस्टम क्लिअरन्सेसच्या प्रतीक्षेत आहेत.

वैद्यकीय उपकरणांची भूमिका

गेल्या दोन दशकात भारत-चीन व्यापारी संबंधांमध्ये 30 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. यामध्ये औषधं आणि मेडिकल उपकरणांचा प्रामुख्याने समावेश आहे.

चीनहून येणाऱ्या बल्क ड्रग्सवर म्हणजेच औषधांसाठीच्या कच्च्या मालासाठी भारत चीनवर अवलंबून आहे. भारतात मेडिकल टूरिझम आणि वैद्यकीय सुविधांमध्ये चीनहून येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचा वाटा मोलाचा आहे.

भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019-20 या कालावधीत भारताने चीनकडून 1,150 कोटी रुपयांचे फार्मा प्रॉडक्ट्स आयात केले आहेत. यामध्ये बल्क ड्रग्ज म्हणजेच औषधं बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय उपकरणांचाही समावेश आहे.

भारतात आयात होणारी मोठी वैद्यकीय उपकरणं प्रामुख्याने अमेरिकेहून येतात. मात्र भारतात असेंम्बल होणाऱ्या उपकरणांमध्ये चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाची भूमिका निर्णायक आहे.

व्हेंटिलेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ऑक्सीमीटर

कोव्हिड-19 आणि या तीन वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसंच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व जाणकारांनी वारंवार अधोरेखित केली आहे.

कोव्हिड-19च्या निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डेव्हिड नबारो यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, कोरोना विषाणू फुप्फुसांवर आक्रमण करतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती करावे लागते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर केला जातो.

कोरोनाचं प्रमुख लक्षण ताप आहे. एरव्ही ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापक केला जातो. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यादृष्टीने इन्फ्रारेड थर्मामीटर अनिवार्य आहे. याद्वारे ठराविक अंतरावरून व्यक्तीच्या शरीराचं तापमान मोजलं जातं.

चीनहून भारतात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांमध्ये व्हेंटिलेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ऑक्समीटर यांचा समावेश आहे.

फार्मा इंडस्ट्रीतील जाणकार सांगतात, बल्क ड्रग्जच्या तुलनेत वैद्यकीय उपकरणांसाठी भारत चीनवर तेवढा अवलंबून नाही. भारतात असेंब्म्ल होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांमध्ये हार्डवेअर, मदरबोर्ड आणि एलईडी, एलईडी अशा छोट्या मात्र दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू चीनहून आयात केल्या जातात.

काळजीचं कारण का?

फार्मा क्षेत्रातील आयात-निर्यात संघटना फार्मएक्सिलचे प्रमुख दिनेश दुआ यांच्या मते, बंदरांमध्ये लाल फितीच्या कारभारामुळे वैद्यकीय उपकरणं अन्य शहरात पोहोचवण्यासाठी उशीर होत आहे.

भारतात चिनी वस्तूंवर बहिष्काराचं प्रमाण वाढतं आहे. मात्र आयात केलेल्या त्या उपकरणांचं, वस्तूंचं काय ज्या बंदरांमध्ये, विमानतळावर अडकून राहिल्या आहेत. त्याविषयी चर्चा होताना दिसत नाही.

चीनहून आयात झालेल्या गोष्टी भारतीय बंदरं अथवा विमानतळांवर अडकून राहिल्या तर नुकसान चीनचं नाही भारताचं आहे असं फार्मा क्षेत्रातील बड्या आयातदारांनी सांगितलं.

आवश्यक वैद्यकीय उपकरणं हॉस्पिटल्स तसंच व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचायला उशीर होत असेल तर कोरोना रुग्णांसाठी ही चांगली गोष्ट नाही.

चीनहून वस्तू, उपकरणं आयात करणारे व्यापारी 70 ते 75 टक्के अडव्हान्स पैसे देतात. त्यानंतरच वस्तू किंवा उपकरणं पाठवली जातात. जेवढा जास्त उशीर होईल तेवढं भारतीय व्यापाऱ्यांचं नुकसान होईल. बँक गँरंटीच्या माध्यमातून लेटर ऑफ क्रेडिट जारी केलं जातं. आयात एकाबाजूने बरखास्त केली जाते. मात्र यामुळे क्रेडिट रेटिंगचं अवमूल्यन होऊ शकतं.

तिसरी गोष्ट चीनहून वस्तू तसंच उपकरणं पाठवण्यासाठीचे पैसे आधीच दिलेले असतात.

उशीर का होत आहे?

एकीकडे भारतात चीनच्या वस्तू आणि उपकरणांची मागणी वाढत आहे. दुसरीकडे कोरोनाचं निर्मूलन करण्यासाठी सगळ्या यंत्रणा झटत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व्हेंटिलेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर तसंच ऑक्सिमीटर ही तीन महत्त्वाची उपकरणं आहेत. या वस्तू कस्टम्सच्या प्रक्रियेत खोळंबल्या असतील तर मग उशीर का होतो आहे?

नौकावहन, परिवहन आणि लघू-मध्यम-उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री तसेच उद्योगमंत्र्यांना देशभरातल्या बंदरांमध्ये खोळंबलेल्या कन्साईनमेंटला क्लिअरन्स देण्यासंदर्भात विनंती केली होती. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे.

यक्षप्रश्न हा की वस्तू तसंच उपकरणांच्या क्लिअरन्सेससाठी उशीर का होत आहे?

सुरक्षेशी संबंधित काही नियमांचं पालन करणं अनिवार्य असल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे असं एका वरिष्ठ कस्टम्स अधिकाऱ्याने सांगितलं.

आयात निर्यात आणि आर्थिक क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या इन्व्हेस्टेक ग्लोबल रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ विजय कुमार गाबा यांच्या मते लोकांचं लक्ष चीनहून येणाऱ्या मात्र अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंवर म्हणजे लहान मुलांची खेळणी, दिवाळीत रोषणाईसाठी वापरले जाणारे लाईट्स, बॅग्स तसंच कपडे.

ते पुढे म्हणाले, चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंच्या दोन श्रेणी असतात. कच्चा माल आणि इंजिनिअरिंग गुड्स. दोन्ही श्रेणीतील वस्तू कस्टम्स प्रक्रियेत खोळंबून राहिल्या तर मागणी-पुरवठा कोलमडण्याची शक्यता आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणं आणि औषधांचा समावेश आहे. या सगळ्या वस्तू अत्यावश्क सदरात मोडतात'.

देशातली बंदरं आणि विमानतळांवर चीनहून आलेल्या वस्तू आणि उपकरणं खोळंबल्याची दोन प्रमुख कारणं आहेत. चीनमधल्या वुहान शहरातूनच कोरोनाचा विषाणू जगभर पसरला हे स्पष्ट झालं. कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून वुहानची नोंद होते. त्यामुळे वुहान तसंच परिसरातून येणाऱ्या कच्च्या मालाची तपासणी केली जाते.

सरकारने यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आर्टिफिशिल इंटेलिजन्स आणि इंटरनेट सुरक्षेशी निगडीत तज्ज्ञ असं सांगतात की, भारतात आयात केल्या जाणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे. कोणत्याही स्वरुपाची गुप्तहेरी किंवा स्पाइंग सदृश सॉफ्टवेअर देशात येऊ नये यासाठी सर्वतोपरी तपासण्या, शहानिशा केली जात आहे.

विजय कुमार गाबा यांच्या मते कस्म्ट्स क्लिअरन्सवेळी आधी सॅम्पल टेस्टिंग केलं जातं. मात्र आता शंभर टक्के मालाचं टेस्टिंग केलं जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)