चीनमध्ये सापडला कोरोना व्हायरस सारखाच जीवघेणा नवा व्हायरस, दुसरी जागतिक साथ आणण्यास सक्षम

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, हेल्थ एडिटर, बीबीसी न्यूज ऑनलाईन

चीनमध्ये शास्त्रज्ञांना फ्लू पसरवणारा एक नवीन विषाणू सापडला आहे. नवी जागतिक साथ पसरवण्याची क्षमता या विषाणूमध्ये असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

डुकरामध्ये हा विषाणू आढळून आला आहे.

हा विषाणू म्युटेट होऊन त्याची माणसांनाही लागण होऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

असं असलं तरी या विषाणूमुळे लगेच काही धोका नाही. मात्र, माणसांना या विषाणूची लागण होण्यासाठीचे सर्व गुणधर्म या विषाणूमध्ये आहेत आणि म्हणूनच यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

हा विषाणू नवीन असल्याने त्याचा सामना करण्यासाठीची आपली रोगप्रतिकार क्षमता समर्थ नाही.

Proceedingd of the National Academy of Sciences या विज्ञानविषयक नियतकालिकात संशोधकांनी या नव्या विषाणूविषयी माहिती दिली आहे. डुकरांमध्ये आढळलेल्या हा विषाणू नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांवर बारकाईने लक्ष ठेवणं, अशी पावलं तातडीने उचलण्याची गरज असल्याचंही त्यात म्हटलं आहे.

जागतिक साथीचा धोका

कोरोना विषाणूची जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू असताना इन्फ्लूएंझाचा हा नवा विषाणू आरोग्याविषयक मोठ्या धोक्यांपैकी एक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

2009 साली स्वाईन फ्लूची साथ आली होती. सुरुवातीला ही साथ जेवढी धोकादायक वाटली, प्रत्यक्षात तेवढी नव्हती. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वृद्धांमध्ये त्या विषाणूविरोधात थोडीफार तरी रोगप्रतिकार क्षमता होती. त्यापूर्वी आलेल्या इतर अनेक फ्लू विषाणूंमुळे ही रोगप्रतिकार शक्ती तयार झाली होती.

जगभरातील आकडेवारी -

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-

त्या विषाणूला H1N1 म्हणण्यात आलं. पुढे त्या आजारावर लसही तयार करण्यात आली.

चीनमधल्या डुकरांमध्ये जो नवा विषाणू आढळला आहे तोदेखील 2009 च्या स्वाईन फ्लू विषाणूसारखाच असला तरी त्यात काही नवीन बदल आढळले आहेत.

सध्यातरी या विषाणूमुळे धोका नाही. मात्र, यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं या विषाणूचा अभ्यास करणारे प्रा. किन-चाओ चँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.

घाबरण्याची गरज आहे का?

या विषाणूला G4 EA H1N1 असं नाव देण्यात आलं आहे. माणसाच्या श्वासनलिकेत असणाऱ्या पेशींमध्ये हा विषाणू वाढू शकतो किंवा पसरू शकतो.

चीनमध्ये कत्तलखाने किंवा डुकरांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांचा 2011 ते 2018 या काळातला डेटा तपासण्यात आला. त्यात अलिकडच्या काळात काही जणांना या विषाणूची लागण झाल्याचं आढळलं.

या फ्लूवर सध्या उपलब्ध असलेली लस प्रभावी नाही.

बीबीसीशी बोलताना युकेतल्या नॉटिंघम युनिव्हर्सिटीत शिकवणारे प्रा. किन-चाओ चँग म्हणाले, "सध्या सर्वांचं लक्ष कोरोना विषाणूवर आहे आणि ते बरोबरही आहे. मात्र, धोकादायक असणाऱ्या इतर नवीन विषाणूंकडे दुर्लक्ष होता कामा नये."

फ्लूची साथ कधीही येऊ शकते. मात्र, अशा घटना वारंवार घडत नाहीत. अशा जागतिक साथी दुर्मिळ आहेत. जागतिक साथ तेव्हाच येते जेव्हा एखादा नवा विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत सहज पसरतो.

फ्लू विषाणू कायम बदलत असतात आणि म्हणूनच त्यावरच्या लसींमध्येही वेळोवेळी बदल करणे गरजेचं असतं. फ्लू विषाणू बदलत असले तरी प्रत्येक नवीन विषाणूमुळे जागतिक साथ येईलच, असं नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमध्ये व्हेटर्नरी विभागाचे प्रमुख असणारे प्रा. जेम्स वुड सांगतात, "आपल्याला नवनवीन रोगजंतूचा धोका कायम असतो. माणसांचा जंगली प्राण्यांपेक्षा पाळीव प्राण्यांशी जास्त आणि जवळचा संबंध येतो आणि त्यामुळे हे पाळीव प्राणीच महत्त्वाच्या जागतिक साथीचे स्त्रोत ठरू शकतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)