You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनाही कोरोनाची लागण
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. ओक हे सध्या ऑक्सिजन सप्लायवर आहेत. ते हाय फ्रिक्वेंसी नेजल कॅन्युला (HFNC) म्हणजेच रेस्पिरेटरी सपोर्टवर आहेत. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 एप्रिलला कोव्हिड टास्क फोर्सची घोषणा केली होती. मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.
या टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत.
काही दिवसांपूर्वीच डॉ. संजय ओक यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली होती. गेल्या अडीच महिन्यांत या टास्क फोर्सने कोरोनावर कशाप्रकारे काम केले? राज्यात दररोज रुग्णसंख्या वाढत असताना पुढील नियोजन काय आहे? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं त्यांनी दिली होती.
महाराष्ट्रात संमिश्र परिस्थिती आहे. एका बाजूला रुग्णसंख्या वाढते आहे. दुसऱ्या बाजूला रिकव्हरी रेटही चांगला आहे. हे कसं शक्य झालं?
आपल्याला अजून विश्रांती घेऊन चालणार नाही. टेस्ट मोठ्या संख्येने होत आहेत. कारण लक्षणं असलेल्या रुग्णांनी टेस्ट करुन घेणं गरजेचं आहे. यामुळे पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार सुरू होतात.
आपण दुखणं अंगावर काढतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आपल्याला सामान्य वाटणारे आजार आहेत. पण ही वेळ दुखणं अंगावर काढायची नाही. प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवे आपल्याला कोव्हिड-19 तर नाही ना?
आपल्याला दोन नवीन औषधं मिळालेली आहेत. रेमडेसिव्हिर आणि फॅव्हिपिराविर ही ती औषधं आहेत. ही अँटीव्हायरल आहेत. ही औषधं नियंत्रण मिळवण्यात मदत करतील. फॅव्हिपिराविर गोळ्या डॉक्टरांनी दवाखान्यातून लिहून दिल्या तरी घेता येतील.
लोक बाहेर गर्दी करताना दिसत आहेत. लोकांमध्ये कोरोनाबद्दलचीभीती कमी झाली आहे. हे सकारात्मक वाटते की घातक आहे ?
यापुढे आपण न्यू नॉर्मल आयुष्य जगू. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही. बाहेर पडल्यावर हस्तांदोलन करुन भेटणार नाही. कदाचित भारतीय पद्धतीने नमस्कार करू. दिवाळीत जशी आपण लक्ष्मीची पावलं काढतो तसं सोशल डिस्टंन्सिंगसाठी आरोग्य लक्ष्मीची पावलं हॉस्पिटलमध्ये लावण्याबाबत मी बोललो आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
आपण बाहेर पडताना हा प्रश्न स्वत: विचारायला हवा की, मी ज्या कामासाठी बाहेर पडतोय ते काम बाहेर न पडता होऊ शकते आहे का, जर होऊ शकत असेल तर आपण घरुनच ते काम करायला हवे.
रुग्ण आणि डॉक्टर यांचेही संबंध पूर्वीसारखे असणार नाहीत. टेलिफोनवर अधिक चर्चा होईल.
लॉकडाऊन शिथील केल्यामुळे रुग्णसंख्या वाढलीय का?
लॉकडाऊन शिथील केल्यावर रुग्णसंख्या वाढेल हे आम्हाला अपेक्षित होते. रुग्ण अधिक संख्येने पॉझिटिव्ह आढळले. हे जगभरात सगळीकडे दिसून आले. याचे रुपांतर मृत्यूमध्ये होऊ द्यायचे नाही.
कोव्हिड-19 आपल्यामधून जाईल का ? तर याचे उत्तर नकारात्मक आहे. कोव्हिड आपल्या आयुष्यातून जाणार नाही. कोव्हिडला स्वीकारुन जगायला शिकण्याची गरज आहे.
कोव्हिड कधीही आपल्यातून जाणार नाही का ?
हा एक इन्फ्लुएन्झा ग्रुपचा व्हायरस आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरस जेव्हा आला, तेव्हाही लोक मेले. नंतर लस आली. पण तरीही इन्फ्लुएन्झा गेला नाही. पण मृत्यूचे भय गेले. अशीच परिस्थिती कोरोनाची होईल. दीड दोन वर्षांत लस नक्की येईल. स्वाईन फ्लूच्या बाबतीतही टॅमीफ्लू आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
पण कोव्हिड आणि इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये फरक आहे. कोरोना व्हायरस 72 तास सरफेसवर राहतो. तो संसर्गजन्य आजार आहे.
लॉकडॉऊन शिथील का केले ?
लॉकडाऊन किती दिवस ठेवणार? आर्थिक बाबीही आपल्यासमोर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मी एक वाक्य वापरलं. ते त्यांनाही आवडलं. 'जर लॉकिंग हे सायन्स असेल तर अनलॉकिंग हे एक आर्ट आहे.' आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे.
आपण टप्प्याटप्प्याने अनलॉक करत आहोत. सगळं एकदम सुरू केलेले नाही.
उत्तर मुंबईत केसेस वाढल्यामुळे पुन्हा लॉकडॉऊन करावा लागला. त्याप्रमाणे हे सगळं आपल्याला रिजन वाईज करावं लागेल. हे नित्याचे होईल.
लॉक-अनलॉक हे रुटीन होईल का?
समाज स्वत:च्या सवयी कशा बदलतो, सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे करतो, समाज स्वत:ची काळजी किती घेतो, यावर रुग्णसंख्या किती वाढेल हे अवलंबून आहे.
हे सर्व प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे का ?
हा आजारच आपल्यासाठी नवीन आहे. अमेरिका, आफ्रिकेपासून सगळ्यांसाठी हा नवा आजार आहे. केवळ टास्क फोर्ससाठी नाही. मला वाटतं यात सतत बदल होत राहतात. ज्याला जसा प्रतिसाद मिळतो तसे निर्णय घेतले जातात.
फॅव्हिपिराविर प्रभावी ठरत आहे का?
कोणतंही औषध येताना त्याच्या अनेक चाचण्या केल्या जातात. मोठ्या प्रक्रियेनंतर ते बाजारात येते. यावेळेला आलेली औषधं तितक्या चाचण्यांमधून गेलेली नाहीत. हे महत्त्वाचे तत्त्व आहे.
पण आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे आहेत. जेव्हा मोठं वादळ येतं तेव्हा मिळणाऱ्या प्रत्येक लाकडाच्या ओंडक्याची मदत आपल्याला घ्यावी लागते. तसेच रेमडेसिव्हिर आणि फॅव्हिपिरावीरच्या बाबतीत आहे.
अमेरिकेने सांगितलं की, रेमडेसिव्हिर वापरुन 50 टक्के लोक बरे झाले. 50 टक्के लोक बरे झाले नाहीत. तरीही आपण ते आणलं. फॅव्हिपिरावीरच्या बाबतीत आतापर्यंत मोठा वैज्ञानिक डेटा नाही. पण जपान, मलेशियामध्ये चाचण्या झाल्या. तिथे औषध उपयुक्त ठरलं असं दिसलं म्हणून आपण ते आणलं.
मुंबई अनलॉक कधी होणार?
आपण एका बाजूला काही प्रमाणात अनलॉक करतो आहोत. दुसऱ्या बाजूला आपण हॉस्पिटल्स, बेड्स,आरोग्य व्यवस्था वाढवत आहोत. त्यामुळे मला वाटतं मुंबई काही आठवड्यांमध्ये सुरू होऊ शकेल.
पावसाळ्यात दुसरी लाट येईल का?
कोव्हिडची दुसरी लाट येईल असं मला वाटत नाही. केसेस कमी होतील असं नाही. पण दुसरी लाट येणार नाही. इतर साथीच्या रोगांसोबत आपल्याला कोव्हिडही दिसेल.
बाबा रामदेव यांनी आयुर्वेदाची औषधं समोर आणली आहेत. याने कोरोना बरा होऊ शकतो असा दावा केला जातोय. यामध्ये कितपत तथ्य आहे ?
आयुर्वेदाच्या औषधात तथ्य आहे. पण ती कशी वापरायची हा मुद्दा आहे. ही औषधं अॅलोपथीला पर्याय म्हणून नव्हे तर पूरक म्हणून वापरावी.
यापुढील नियोजन काय ?
जगाची आकडेवारी पाहिली तर भारतात एवढी लोकसंख्या असून पाश्चात्य देशात जितके मृत्यू झाले तितके भारतात झाले नाही. भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. भारतात आलेला व्हायरस वेगळ्या प्रकारचा असण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असलेल्या वृद्धांसाठी काम करायचे नियोजन आहे.
ज्यांना मधुमेह, हायपरटेंशन आहे अशा वृद्ध व्यक्तींना वेगळं काढावं लागेल. आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स आहेत, जिथे बेड्स रिकामे आहेत. तिथे वृद्धांना हलवण्यात येईल. यामुळे वृद्धांना कोरोनापासून सुरक्षा मिळेल. हे काम आपल्याला करावं लागेल.
कोरोना आपल्या आयुष्यातून जाईल का?
मी खोटं आश्वासन देणार नाही. काही गोष्टी मानवी वस्तीतून जाणाऱ्या नसतात. पण आपण योग्य काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांचा सल्ला घेत राहिलो तर कोरोना आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकणार नाही.
कोरोना प्रत्येकाला होईल का ?
लस आल्यानंतर काही प्रतिबंधात्मक गोष्टी करता येतील. कोरोना झाला तर शरीरात अँटीबॉडीज नैसर्गितरीत्या तयार होतील. त्यामुळे पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी होईल.
एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होतोय का?
काही केसेस अशा आहेत. कोरोनाचे उपप्रकार आहे. कोरोनाचा एखादा काटा ग्लायकोप्रोटीन आहे. असे अनेक उपप्रकार आहेत. त्यामुळे एका उपप्रकाराचा कोरोना झाला तर दुसऱ्या उपप्रकाराचा होणार नाही याची खात्री नाही. आमच्याकडे काही प्रमाणात अशा केसेस आल्या आहेत.
शाळा सुरू करण्याबाबत काय सल्ला द्याल ?
शाळा आणि शिक्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुलांना शाळेत बोलवलं तर ते एकत्र जमणार. मस्ती करणार, एकमेकांच्या जवळ जाणार. त्यामुळे रूग्णसंख्या कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत.
आपल्या आयुष्यातून कोरोना जाणार नाही. आपल्याला कोरोनाला स्वीकारुन आयुष्य जगावं लागणार आहे. पण कोरोना आपलं जीवन उद्ध्वस्त करणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)