कोरोना मुंबई : 'मिशन झिरो' राबवून मुंबई महापालिका कसा रोखणार कोरोनाचा संसर्ग?

मुंबई महापालिका उत्तर मुंबईच्या 6 वॉर्डांमध्ये 'मिशन झिरो' राबवणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माध्यमांना माहिती दिली.

बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड, मुलुंड आणि भांडूप या 6 वॉर्ड्समध्ये हे मिशन राबवलं जाईल. याअंतर्गत मुंबई महापालिकतर्फे सोमवारी (18 जून) 50 फिरत्या दवाखान्यांचं लोकार्पण केलं गेलं. रुग्णांना 2 ते 3 आठवड्यांत बरं होता यावं यासाठी हे 50 फिरते दवाखाने उत्तर मुंबईतील सहा भागांत कार्यरत असतील.

महापालिकेच्या या उपक्रमासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, क्रेडई, MCHI, देश अपना संघटनाही हातभार लावणार आहेत. 'मिशन झिरो'दरम्यान या भागांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर केलं जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय, तर रुग्णांना वेळच्या वेळी औषधं, त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.उत्तर मुंबईत सध्या रुग्णांची संख्या वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. तर मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर 50 करण्याचा निर्धारही महापालिका आयुक्तांनी बोलून दाखवला. सध्या मुंबईचा डबलिंग रेट 36 दिवसांचा आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)