You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसमुळे भारतात पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त मृत्यू होतोय?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जगभरात कोव्हिड-19मुळे महिलांपेक्षा पुरुषांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. इटली,चीन आणि अमेरिकेत कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या पुरुषांचा टक्का जास्त आहे तसंच त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या पुरुषांची संख्याही जास्त आहे.
जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये साथीचे रोग आणि लिंगभाव याविषयी अभ्यास करणाऱ्या सब्रा क्लेन म्हणतात, "कोरोना व्हायरसला बळी पडणाऱ्यांसाठी पुरुष असणं जितकं धोकादायकं आहे तितकंच वृद्ध असणं धोकादायक आहे."
पण भारतातली परिस्थिती मात्र गोंधळात टाकणारी आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
भारत आणि अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी मिळून केलेल्या एका अभ्यासात नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. भारतात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त असली तरी त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका महिलांना जास्त आहे. या संशोधानात भारतात 20 मे पर्यंत झालेल्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला आहे.
यात असं दिसून आलं की, लागण झालेल्या एकूण महिलांपैकी 3.3 टक्के महिलांचा कोव्हिड-19 ने मृत्यू झाला तर लागण झालेल्या एकूण पुरुषांपैकी 2.9 टक्के पुरुषांचा मृत्यू झाला. हा अभ्यास केला तेव्हा भारतात कोव्हिड-19च्या एक लाख दहा हजार केसेस होत्या तर 3,433 लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच एकूण मृत्यूदर 3.1 टक्के इतका होता.
पुढे असंही लक्षात आलं की, 40-49 या वयोगटातील कोरोनाची लागण झालेल्या एकूण महिलांपैकी 3.2 टक्के महिलांचा मृत्यू झाला पण त्या तुलनेत याच वयोगटातल्या 2.1 टक्के पुरुषांचा मृत्यू झाला होता, तर 5-19 या वयोगटात फक्त महिलांचाच मृत्यू झाला होता.
या संशोधनाचे मुख्य अभ्यासक आणि हार्वर्ड विद्यापीठातले लोकसंख्या आरोग्य अभ्यासक एस व्ही सुब्रम्हण्यम यांच्याशी मी यासंबंधी अधिक चर्चा केली.
त्यांनी मला सांगितलं की, कोरोना व्हायरसचा धोका फक्त मृत्यूदराने मोजल्याने दोन गोष्टी एकत्र झाल्यात - एक म्हणजे मृत्यूचा धोका आणि दुसरं म्हणजे मृत्यूतला वाटा.
मृत्यूचा धोका म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट गटात, मग ठराविक गटातल्या महिला असोत वा पुरुष,मृत्यू होण्याची शक्यता किती आहे ते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एकूण लागण झालेल्या लोकांपैकी मृत्यू झालेल्या महिलांचा आकडा आणि त्याची टक्केवारी. तर मृत्यूतला वाटा म्हणजे एकूण मृत्यू झालेल्या लोकांपैकी त्या विशिष्ट गटातल्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या.
प्रो सुब्रम्हण्यम यांच्या मते एकूण मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी पुरुषांचं प्रमाण (जवळपास 63 टक्के) जास्त आहे याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं पण महिलांच्या गटातला मृत्यूंच्या टक्केवारीकडे कमी लक्ष दिलं गेलं.
"एकंदर आमच्या अभ्यासावरून लक्षात येतं की, एकदा लागण झाली की निदान भारतात तरी महिलांकडे जिवंत राहण्यासाठी काही विशेष क्षमता नाहीये.आता याचा संबंध शरीरशास्त्राशी किती आणि सामजिक गोष्टींशी, विशेषतः लिंगभेदभावाशी किती, हे सांगणं अवघड आहे. पण भारतात तरी अशा परिस्थितीत लिंग महत्त्वाचा घटक ठरू शकतो."
हे निष्कर्ष धक्कादायक आहेत कारण जगातल्या परिस्थितीच्या बरोबर उलटे हे निष्कर्ष आहेत.
भारतातील परिस्थिती जगाच्या तुलनेत उलटी का?
कुनीहिरो मतसुशिता जॉन हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये प्राध्यापक आहेत.ते म्हणतात, "पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयरोग,रक्तदाब किंवा डायबेटिससारख्या को-मॉर्बिडीटीचा धोका कमी असतो. दुसरं म्हणजे पुरुषांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण जास्त आहे आणि काही अभ्यासात असंही दिसून आलं की, पुरुष महिलांच्या तुलनेत कमी हात धुतात. मी ज्या अभ्यासांमध्ये सहभाग घेतला होता तिथे पुरुषांना कोव्हिड-19 पासून अधिक धोका आहे असं समोर आलं होतं. त्यामुळे भारतातली ही निरीक्षणं आश्चर्यकारक आहेत."
काही शास्त्रज्ञांचं असंही मत आहे की, महिलांची रोगप्रतिकारशक्ती जास्त चांगली असते. इस्ट्रोजेनसारखी संप्रेरकं 'श्वसनसंस्थेच्या वरच्या आणि खालच्या भागासाठी चांगली असतात आणि श्वसनसंस्थेच्या वरच्या भागात होणाऱ्या इंन्फेक्शन्सला तत्परतेने थांबवू शकतात.
"म्हणूनच महिलांचा मृत्यूदर पुरुषांपेक्षा जास्त असणं ही गोष्ट वेगळी ठरते," मतसुशिता म्हणतात.
पण जो डेटा आपल्याला या निष्कर्षांपर्यंत घेऊन आलाय त्याकडे वेगळ्या चष्म्यातून पाहायला हवं असंही मत ते मांडतात. "उदाहरणार्थ-महिला आणि पुरुषांना टेस्ट करण्याची समान संधी मिळते का?"
महिलांचा मृत्यूदर जास्त असण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतील.
भारतात महिलांचं आर्युमान पुरुषांपेक्षा जास्त आहे.त्यामुळेच इथे वयोवृद्ध महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. कोरोना व्हायरसला बळी पडणाऱ्यांपैकी बहुसंख्य लोक वृद्ध आहेत,मग याचा परिणाम तर महिलांच्या जास्त असणाऱ्या मृत्यूदरावर होत नसेल ना?
दुसरं म्हणजे महिला डॉक्टरांकडे उशीरा जातात आणि बऱ्याचदा घरच्या घरीच औषधं घेतात किंवा घरगुती उपचार करतात.घरातल्या कामाच्या धबडग्यात महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मग महिला कदाचित कोव्हिड -19 लागण झाल्यानंतर उशीरा टेस्ट करायला जात असतील का?
गृहिणी,घरातल्या इतर आजारी माणसांची काळजी घेण्याऱ्या महिलांना इंफेक्शन व्हायचा धोका अधिक असतो. 1918 च्या स्पॅनिश फ्लुमध्येही पुरुषांच्या तुलनेत कुपोषित असणाऱ्या,अस्वच्छ वातावरणात बंदिस्त असलेल्या तसंच मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश न मिळू शकलेल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजारी पुरुषांची सेवा करणाऱ्या महिला बळी पडल्या होत्या. म्हणजेच महिलांचा मृत्यूदर पुरुषांपेक्षा जास्त होता.
वेल्लोरमधल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधले व्हायरोलॉजीचे निवृत्त प्राध्यापक टी जेकब जॉन म्हणतात की, आपल्याला लिंगाधारित डेटाचा अजून अभ्यास करावा लागेल तरच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील."
या अभ्यासात सहभागी झालेल्या संशोधकांना हे मान्य आहे. "आम्ही डेटावर बारीक लक्ष ठेवू आणि वेळोवेळी आमचे रिझल्ट अपडेट करत राहू," प्राध्यापक सुब्रम्हण्यम म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)