भारत-चीन सीमा तणाव: गलवान खोऱ्यात मृत्युमुखी पडलेले जवान कोण आहेत?

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांच्या चकमकीत भारतीय लष्करी सेवेतील एका अधिकाऱ्यासह 19 जवानांचा मृत्यू झाला आहे.

भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर 45 वर्षांनी पहिल्यांदाच इथं कुणाचा तरी जीव गेला आहे.

या संघर्षात जीव गमावलेल्या जवानांमध्ये गणेश हांसडा हेसुद्धा होते. गणेश हे पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बहरागोडा तालुक्यातील बांसदाचे मूळ रहिवासी होते.

मंगळवारी रात्री उशिरा सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबू लाल मरांडी यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.

या चकमकीत मारले गेलेले कुंदन कुमार बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील सत्तरकटैय्या तालुक्यातील आरणगांवचे होते. त्यांचे वडील शेतकरी आहेत.

कुंदन कुमार यांची पत्नी बेबी देवीला सैन्याकडून फोन आला आणि त्यांना सदर बातमी कळवण्यात आली.

कुंदन यांना सहा वर्षांचा रोशन आणि चार वर्षांचा राणा अशी दोन मुलं आहे.

कांकेरच्या आदिवासी समाजातून येणारे गणेश राम कुंजाम हे सुद्धा मारले गेले आहेत. ते 2011 मध्ये सैन्यात भरती झाले होते. इतर लोकांप्रमाणेच कुंजाम कुटुंबीयांनाही फोनवरच गणेश यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.

भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत एका भारतीय कर्नल पदावरील अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला.

तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातले मूळचे असलेले कर्नल संतोष बाबू गेल्या दीड वर्षांपासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. कर्नल संतोष हे 16-बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यांना पत्नी व दोन मुलं सध्या दिल्लीत राहतात.

कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा सांगतात, भारतीय सैन्याने सोमवारी दुपारी त्यांना ही माहिती दिली होती.

कोण आहेत जवान?

झारखंडमधील साहिबगंजच्या डिहारीमधले मूळचे असलेले कुंदन ओझा बिहार रेजिमेंटमध्ये होते.

कुंदन मारले गेल्याची माहिती कुटुंबीयांना फोनवरूनच सांगण्यात आली.

माजी मुख्यमंत्री यांनी ट्विटरवरून कुंदन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तामीळनाडूचे जवान के. पलानी यांचासुद्धा चकमकीत मृत्यू झाला.

पलानी यांच्या भावाने याबाबत माहिती दिली आहे. पलानी गेल्या 22 वर्षांपासून भारतीय सैन्यदलाच्या सेवेत होते.

तामीळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी ट्वीट करून पलानी यांच्या जवानाच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

पलानी यांचे भाऊसुद्धा सैन्यात

पलानी यांचे भाऊ इतायाक्कनी सुद्धा सैन्यदलात आहेत. ते सध्या राजस्थानात तैनात आहेत. त्यांनी बीबीसी तमिळ सेवेच्या साईराम यांच्याशी बातचीत केली. आपण घरी जात असल्याचं त्यांनी कळवलं.

काल लष्करातील कर्मचाऱ्यांनी मला माझ्या भावाच्या मृत्यूची बातमी सांगितली. लडाखमध्ये चकमकीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीच मी राजस्थानातून आपल्या घरी जात आहे, असं इतायाकन्नी म्हणाले.

इतायाकन्नी 10 दिवसांपूर्वी आपल्या भावाशी शेवटचं बोलले होते. शहरातून लडाख सीमेवर चालल्याचं सांगत नेटवर्क नसल्यामुळे फोन करता येणार नाही. पुन्हा फोन करण्यास वेळ लागू शकतो, असं पलानी यांनी सांगितलं होतं.

इतायाकन्नी लष्करात भरती होण्याचं कारणसुद्धा पलानी हेच आहेत. ते म्हणतात, हे आमच्या कुटुंबाचं सर्वात मोठं नुकसान आहे. माझ्या वहिनी आणि त्यांची दोन मुलं सध्या कोणत्या अवस्थेतून जात असतील, याचा विचार करवत नाही, असं ते म्हणाले.

भारत-चीन सीमेवरील चकमकीत निधन झालेल्या जवानांची नावे -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)