You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते का? आली तर ती कशी असेल?
- Author, एव्हा आँटोव्हेरॉज
- Role, बीबीसी न्यूज
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येणार की नाही, हा प्रश्न नसून, ती कधी येईल आणि किती भयावह असेल, हा खरा प्रश्न असल्याचं जीवशास्त्रज्ञ डॉ. जेनिफर रॉन म्हणतात.
आशिया खंडात सुरू झालेली ही साथ जगभरात कशाप्रकारे पसरतेय, यावर डॉक्टर रॉन सध्या लक्ष ठेवून आहेत.
टेस्टिंग, ट्रेसिंग आणि लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करत कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणणाऱ्या दक्षिण कोरिया, जपान आणि जर्मनीसारख्या देशांतही निर्बंध हटवण्यात आल्यानंतर संसर्गाची नवीन प्रकरणं समोर येत आहेत.
युरोपाने कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज रहावं, असा इशारा युरोपियन युनियनच्या कोव्हिड 19 रिस्पॉन्स टीमने याच आठवड्यात दिला होता.
संसर्गाची ही दुसरी लाट कधी येईल आणि ती किती मोठी असेल हा प्रश्न आता आपल्यासमोर असल्याचं या टीमच्या संचालक अँड्रिया अॅमॉन यांनी म्हटल्याचं वृत्त गार्डियन वृत्तपत्राने दिलंय.
ज्या देशांना कोव्हिड 19 चा सामना सगळ्यात आधी करावा लागला होता आणि कोरोना व्हायरसबाबतच्या आलेखात इतर देशांपेक्षा पुढे असणाऱ्या देशांकडून मग आपण काय शिकू शकतो?
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
रुग्ण शोधून संपर्कातील व्यक्ती शोधणं
पूर्व आशियातल्या देशांकडून बाकीच्या देशांनी शिकण्याजोगी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संसर्गाचं प्रत्येक प्रकरण शोधून त्या व्यक्तीला आयसोलेट करणं, चाचणी करणं आणि काळजी घेणं. यासोबतच प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 'ट्रेस' करून क्वारंटाईन करणंही गरजेचं असल्याचं WHOचे डायरेक्टर जनरल ट्रेड्रोस यांनी म्हटलंय.
डॉक्टर रॉन या लंडन युनिव्हर्सिटी मध्ये व्हायरस आणि सेल (Cell) एक्स्पर्ट म्हणून काम करतात. त्या म्हणतात, "आशियाच्या आकडेवारीवरून हे लक्षात येतं की आक्रमक टेस्टिंग, ट्रेसिंग करणं आणि मग क्वारंटाईन करण्यानेच दुसरी लाट आटोक्यात आणली जाऊ शकते. हाच एकमेव पर्याय आहे."
उदाहरणार्थ, दक्षिण कोरिया हा आधी कोव्हिड 19चा हॉटस्पॉट होता. पण सुरुवातीपासूनच तिथल्या सरकारने मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या. सोबतच अॅप्स आणि GPS तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती ट्रेस करण्यात आल्या.
डॉ. रॉन सांगतात, "याच धोरणांच्या मदतीने त्यांना 'लोकल अॅलर्ट सिस्टीम' उभारता आली. सध्या जरी एकूण परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता गरज पडल्यास एखाद्या विशिष्ट भागातपुरता लॉकडाऊन केला जाईल."
आकडेवारीचा अभ्यास
पूर्व आशियातल्या देशांकडून घ्यायचा दुसरा धडा म्हणजे हा व्हायरस कशा प्रकारे काम करतो हे जाणून घेण्यासाठी आकडेवारीचा अभ्यास करणं. चीन, जपान, दक्षिण कोरियासारख्या देशांची आकडेवारी एकत्र करत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सार्वजनिक आरोग्य विषयक धोरणांचा अभ्यास करणाऱ्या विभागाचे प्राध्यापक अॅलिस्टर मॅग्वायर सांगतात, "आम्हाला रिकव्हरी रेटबद्दल काही माहिती मिळालेली आहे. पण अजूनही कॉन्टॅक्ट रेट (संपर्कामुळे संसर्ग होण्याची शक्यता)विषयी संशोधन करणं गरजेचं आहे."
हा नवीन व्हायरस आशियामधल्या सार्स आणि आफ्रिकेतल्या इबोलाच्या विषाणूपेक्षा वेगळा वागतो. म्हणूनच याविषयीची अनेक प्रकारची माहिती अजून मिळालेली नाही.
निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर हा व्हायरस नेमका कसा पसरतो ही या जागतिक साथीतून शिकण्याजोगी तिसरी गोष्ट आहे. आशियाचं उदाहरण पाहत प्राध्यापक मॅग्वायर म्हणतात, "फार आशा वाढवून चालणार नाही."
लॉकडाऊन यशस्वी झाला म्हणजे एखादा भाग कोरोनामुक्त झाला असा याचा अर्थ होत नाही. जपानमधल्या काही निवडक भागांमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस सगळ्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. यापैकीच एक होता होक्काइडो भाग.
मार्चच्या मध्यापर्यंत इथे नवीन केसेस येणं कमी झालं आणि ही संख्या रोजच्या एक वा दोन रुग्णांवर आली. यानंतर हे कडक निर्बंध उठवण्यात आले आणि एप्रिलपर्यंत शाळाही सुरू करण्यात आल्या.
पण इथे संसर्गाची दुसरी मोठी लाट निर्माण झाली आणि महिनाभराच्या काळामध्ये पुन्हा एकदा इथे आपत्कालीन उपाययोजना लागू कराव्या लागल्या.
यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नसल्याचं डॉक्टर रॉन म्हणतात. त्या सांगतात, "ज्या देशांमधली साथ आटोक्यात येताना दिसली, तिथेही निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर संसर्ग वाढला. सगळ्या जगात हे होतंय."
एक नाही दोनदा टेस्टिंग
डॉ. रॉन यांच्यानुसार, "आशियाकडून घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे टेस्टिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे."
तज्ज्ञ म्हणतात, "दक्षिण कोरियाला आक्रमक टेस्टिंग, ट्रेसिंग आणि क्वारंटाईनच्या धोरणांमुळेच विषाणूचा संसर्ग प्रभावीपणे थांबवता आला."
दक्षिण कोरियामधली रुग्णसंख्या सुरुवातीला वाढली. पण मग या देशाने झपाट्याने एक प्रणाली तयार केली. इथे दररोज 10,000 मोफत चाचण्या करण्यात येऊ लागल्या. फेब्रुवारीमध्ये हे करण्यात आलं. या देशाला 2015मधल्या मर्सच्या साथीचा अनुभव कामी आला.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमध्ये साथीच्या रोगांविषयीच्या अभ्यासाच्या प्राध्यापक ऊई अँग आँग यांनी बीबीसीला मार्चमध्ये सांगितलं होतं, "ज्या प्रकारची पावलं त्यांनी उचलली आणि लोकसंख्येचं स्क्रीनिंग केलं, ते कौतुकास्पद आहे."
जर्मनीनेही आपल्याकडचा बळींचा आकडा बऱ्यापैकी कमी ठेवण्यात यश मिळवलं. पण युके आणि स्पेनला मात्र असं करता आलं नाही.
आशिया खंडामध्ये ज्या देशांनी आकडेवारी नियंत्रणात आणली त्यामध्ये 'डबल टेस्टिंग' महत्त्वाचं ठरलं.
प्राध्यापक मॅग्वायर सांगतात, "कुणाला संसर्ग झालाय हे फक्त स्वाब टेस्टवरून समजू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अँटीबॉडीजही तपासाव्या लागतात."
उदाहरणार्थ तैवान आणि जपानमध्ये जे लोक पॉझिटिव्ह आढळले आणि ते ज्यांच्या संपर्कात आले होते अशांचा शोध घेण्यात आला आणि त्यांचं विलगीकरण करण्यात आलं. यावरून एक नकाशा तयार करण्यात आला ज्यावरून संसर्ग झालेले रुग्ण सगळ्यात जास्त कोणत्या भागात आहेत आणि किती वेगाने ही साथ पसरतेय हे समजू शकत होतं.
तर सिंगापूरने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मार्गांनी हजारो लोकांना ट्रेस केलं होतं. विलगीकरणामध्ये असणाऱ्या व्यक्तींशी दिवसातून अनेकदा संपर्क साधण्यात आला आणि गरज पडल्यास या लोकांना ते सध्या कुठे आहेत, हे फोटो काढून सिद्ध करावं लागलं.
हाँगकाँगने तर यापेक्षा आणखी तपशीलवार प्रणाली तयारी केली. इथे परदेशातून येणाऱ्या लोकांना इलेक्ट्रॉनिक ब्रेसलेट्स घालण्यात आली.
ज्या देशांनी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि ट्रेसिंग केलं नाही तिथे संसर्गाची दुसरी लाट आल्यास त्यांच्याकडे आवश्यक आकडेवारी नसेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर लक्ष
बार्सिलोना युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक ज्युडिथ वॉल सांगतात, "या साथीच्या काळात हे सिद्ध झालंय की आरोग्य क्षेत्र नव्याने उभं राहू शकतं आणि झपाट्याने परिस्थिती अनुकूल होऊ शकते."
चीनने वुहानमध्ये 1,000 खाटांचं हॉस्पिटल केवळ 8 दिवसांमध्ये उभं केलं. नवीन योजना कशा प्रकारे आखता येऊ शकतात आणि आणीबाणीच्या काळातही कशाप्रकारे हॉस्पिटल उभारलं जाऊ शकतं, हे या शहराने दाखवून दिलं.
प्रा. वॉल सांगतात, "सगळ्या जगातल्या हॉस्पिटल्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी एकमेकांकडून खूप धडे घेतले आहेतच पण ते स्वतःच्या अनुभवावरूनही खूप काही शिकले आहेत. म्हणूनच संसर्गाची दुसरी लाट आली तर तिला तोंड देण्यासाठी आपण अधिक चांगल्या परिस्थितीत असू."
"आशिया खंडातल्या देशांच्या अभ्यासावरून हे देखील दिसून आलंय की याप्रकारच्या अनुभवातून गेल्यानंतर आरोग्य कर्मचारीही पोस्ट - ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरला बळी पडण्याची शक्यता असते."
"गेल्या आकडेवारीवरून हे लक्षात आलं होतं, की सार्स पसरल्याच्या साधारण तीन वर्षांनंतरही सुमारे 10% कर्मचाऱ्यांमध्ये डिप्रेशनची लक्षणं आढळली होती."
अनेक महिने संसर्गाच्या लाटा
विषाणू संसर्गाच्या एकामागून एक लाटा येतात, हे साथीच्या आजारांच्या अभ्यासात म्हटलेलं आहे. डॉक्टर रॉन म्हणतात, "आपण ज्यासाठी लॉकडाऊन केलाय ती संसर्गाची एक लाट आहे. नाहीतर आपल्याला अत्यंत विनाशकारी काळ पहावा लागेल."
"निर्बंध हटवण्यात आल्यानंतर संसर्ग पुन्हा पसरतो. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन आजाराचा सामना करत असता आणि लोकांमध्ये त्यासाठीची इम्युनिटी नसते, तेव्हा असंच होतं."
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राध्यापक डॉ. लिया मेनो सांगतात, " आपण फक्त इतर देशांकडूनच नाही, तर इतिहासाकडूनही शिकू शकतो. 1918 मध्ये पसरलेली स्पॅनिश फ्लूची साथ हा रेकॉर्ड अथवा संदर्भ असणारा एकमात्र असा आजार आहे, ज्याची तुलना आजच्या व्हायरसशी करता येऊ शकते."
"निर्बंध कसे शिथील करण्यात आले याविषयी भरपूर आकडेवारी त्यावेळी जमा करण्यात आली होती. या जुन्या आकडेवारीचा पुन्हा नव्याने अभ्यास करण्यात आल्यानंतर त्यात महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या. 1918 नंतर सगळ्या जगात एकापाठोपाठ एक संसर्गाच्या लाटा आल्या होत्या. आणि हे सगळं कठोर धोरणांवर अवलंबून होतं."
"आम्ही याविषयी आशावादी आहोत, पण सध्या जगभरातल्या सरकारांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात."
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे कोव्हिड 19 इंन्सिडंट मॅनेजर डॉ. नाओको इशिकावा सांगतात, "चाचण्या करणं वा सोशल डिस्टंसिंगवर हे फक्त अवलंबून नाही. याबाबत अनेक देशांनी आणि अनेक भागांनी व्यापक अंमलबजावणी केलेली आहे. दुसऱ्या लाटेसाठी सज्ज होणं हे अनेक उपाय एकाचवेळी करणं आहे. 2003 सालच्या सार्सच्या साथीदरम्यान यातल्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या."
हा विषाणू नेमका कधी जाईल याचा अंदाज व्यक्त करण्याविषयी WHOने इशारा दिला होता.
कारण हा विषाणू आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना ठोस ठरतीलच याची खात्री नसल्याचं दक्षिण कोरिया आणि जपानच्या अनुभवावरून दिसून आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)