You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मृतदेह अंत्यसंस्कार : मुंबई स्मशानभूमीतील कर्मचारी ज्यांच्या वाट्याला हे दुःख येतं
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"कधी-कधी स्मशानाबाहेर कोव्हिड-19 मुळे मृत्युमुखी पडलेले रुग्ण घेऊन येणाऱ्या अँब्युलन्सची रांग लागते. 4-5 अँब्युलन्स एकापाठोपाठ एक उभ्या असतात. स्मशानात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करेपर्यंत, बाहेर दुसरी अँब्युलन्स मृतदेह घेऊन उभी राहते. एक-एक करून आम्ही प्रत्येक मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो."
मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत काम करणारे मोहन खोराटे यांचे हे शब्द. देशाच्या आर्थिक राजधानीत कोव्हिड-19ची परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव त्यांच्या बोलण्यातून होते.
मुंबईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणालेल्यांची 900च्याही पुढे गेलीय, आणि हा आकडा वाढतच असल्याने मोठा चिंतेचा विषय आहे. एकट्या मध्य मुंबईतील शिवाजीपार्क स्मशानभूमीत आतापर्यंत 150हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
बीबीसी मराठीशी बोलत असताना खोराटे एका कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी करत होते. त्यांच्याशी चर्चा करत असतानाच, शिवाजीपार्क स्मशानभूमीत एक अँब्युलन्स मृतदेह घेऊन आली. मोहन आणि इतर कर्मचारी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात व्यग्र झाले. थोड्या वेळानं त्यांचं काम झाल्यानंतर हे सगळं कसं केलं जातं, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
काय काळजी घेतली जाते?
40 वर्षीय अरुण साळवे शिवाजीपार्क स्मशानभूमीत फर्नेस ऑपरेटर म्हणून काम करतात. मुंबईत कोव्हिड-19 मुळे झालेल्या पहिल्या रुग्णाच्या मृतदेहावर शिवाजीपार्क स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
अरुण साळवे पुढे म्हणतात, "पहिली बॉडी आली तेव्हा आम्हालाही सर्वच नवीन होतं. आमचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. आम्हाला सूचना देत होते. सर्व खबरदारी आणि सुरक्षा उपाययोजना केल्यानंतर आम्ही त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मुंबईत कोरोनाचा फैलाव झाल्यापासून आत्तापर्यंत 150 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत."
"अँब्युलन्समधून मृतदेह आणल्यानंतर तो थेट फर्नेसजवळ आणण्यात येतो. त्याठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी तो मृतदेह स्ट्रेचरवरून उतरवतात आणि त्यानंतर इलेक्ट्रिक फर्नेसच्या आत सरकवतात. पूर्वी अंत्यदर्शनासाठी रांग लागायची. लोक मोठ्या संख्येने यायचे. आता फक्त पाच नातेवाईकांना परवानगी आहे. गेल्या दोन महिन्यात सर्वच बदललं आहे," असं अरुण सांगतात.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
नातेवाईक आणि तिरस्कार
कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना काही सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं, असं मोहन खोराटे सांगतात. "नातेवाईकांना स्मशानात अंत्यविधी करण्याची परवानगी नाही. फक्त 5 व्यक्तींनाच स्मशानात घेतलं जातं. नातेवाईक खूप दुखात असतात. कोणाची आई, वडील, भाऊ यांचा मृत्यू झालेला असतो. नातेवाईक विनवणी करतात, एकदा चेहरा दाखवा अशी विनंती करतात, पण आम्ही बॅगमध्ये बंद केलेला मृतदेह उघडू शकत नाही," ते सांगतात.
"मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. मृतदेहाची बॅग का उघडणार नाही, हे समजावून सांगितल्यानंतर नातेवाईक शांत होतात. आमचं ऐकतात," मोहन सांगतात.
कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळलेला असतो, अशा परिस्थितीत त्यांची मानसिकता समजून घेण्याची गरज असते. आपल्या जीवलग व्यक्तीचा चेहराही त्यांना पाहता येत नाही. पण नातेवाईकांच्या आणि आमच्या सुरक्षेसाठी आम्हाला काळजी घ्यावीच लागते, असं मोहन म्हणतात.
इथेच उमेश मेरू माळी सफाईचं काम करतात. आपला अनुभव सांगताना उमेश म्हणतात, "चार-पाच दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा मृतदेह आणण्यात आला होता. तो पोलीस अधिकारी खूप रडत होता. त्याला आईचं शेवटचं दर्शन करायचं होतं. आईचा चेहरा पाहायचा होता. त्याने आम्हाला खूप विनवणी केली. पण आमचा नाईलाज होता. आम्ही त्यांना समजावून सांगितलं. मृतदेहाची बॅग उघडू शकत नाही. त्यांनाही पटलं."
कोव्हिड-19 बाबत लोकांमध्ये प्रचंड भीती आहे, यामुळे कधीकधी नातेवाईक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह स्वीकारत नाहीत. अशा अनेक घटना रुग्णालयात घडलेल्या आहेत.
फर्नेस ऑपरेटर अरुण साळवे सांगतात, "काही नातेवाईक तिरस्काराच्या भावनेने येतात. म्हणतात, आम्हाला नाही पाहायचं. सर्वकाही तुम्हीच करा. दुरूनही मृतदेहाचं दर्शन घेत नाहीत. तर काही वेळा नातेवाईक येतच नाहीत."
तर उमेश सांगतात, "गेल्या काही दिवसांत मला एक गोष्ट मनात खटकली आहे. मध्यमवर्गीय नातेवाईक मृतदेहासोबत स्मशानात येतायत. पण उच्चभू लोक येत नाहीत. बहुदा हे माझं निरीक्षण असेल. पण मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे."
'घरी जरा जरी खोकला आला तर…'
अरुण यांची पत्नी गर्भवती आहे. घरी लहान मुलं आहेत. मग घरी गेल्यानंतर काय काळजी घेता? यावर ते सांगतात, "स्मशानात काम करताना भीती वाटत नाही, कारण सर्व खबरदारी घेतली जाते. मात्र घरी गेल्यानंतर जरा जरी खोकला आला तरी घरचे घाबरतात. कधी-कधी खोकला किंवा शिंक दाबावी लागते. मास्क घालूनच घरात फिरावं लागतं. पण घरच्यांची काळजी घेणं सर्वांत जास्त महत्त्वाचं आहे. मुलांपासून शक्यतो दूर रहाणं चांगलं."
महापालिका प्रशासनाकडून स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स, ग्लोज, मास्क, गॉगल आणि हॅन्ड सॅनिटायझर या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा पुरवठा करण्यात येतो. पीपीई किट घातल्यानंतरच स्मशानातील कर्मचारी कोव्हिड-19 मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाला हात लावतात.
आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारी
58 वर्षाचे काशीनाथ जंगम हे मुंबई महापालिकेत सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. शिवाजीपार्क स्मशानभूमीची जबाबदारी जंगम यांच्या खांद्यावर आहे.
काशीनाथ जंगम म्हणतात, "कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार इलेक्ट्रिक मशीनमध्ये केले जातात. मात्र काहीवेळा गैरसमजुतीमुळे आसपास रहाणारे लोक तक्रार करतात. मग त्यांच्याशी चर्चा करावी लागते. सर्वांना समजून घ्यावं लागतं. त्यांच्या मनातील संशय दूर करावा लागतो. स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत इतरांनाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेऊनच आम्ही काम करतो."
"रुग्णालयाकडून मृतदेह स्मशानात आणण्याआधी आम्ही रुग्णालयांच्या संपर्कात असतो. कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पाठवण्याअगोदर आमच्याशी संपर्क करा, असं प्रशासनाला सांगतो. जेणेकरून स्मशानात किती मृतदेह आहेत, यावरून रुग्णालयाला माहिती दिली जाईल आणि जर स्मशानात आधीपासून मृतदेह असतील तर अँब्युलन्स इतर ठिकाणी पाठवता येईल," असं ते पुढे म्हणाले.
काहीवेळा 4-5 अँब्युलन्स या ठिकाणी उभ्या असतात, कारण एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड-दोन तास लागतात. त्यानंतर फर्नेस स्वच्छ करावा लागतो. त्यामुळे नातेवाईक, अॅम्ब्युलन्स यांना ताटकळत रहावं लागतं, असं स्पष्टीकरण ते देतात.
मी लोकसेवा करतोय…
उदय जाधव यांना निवृत्त होण्यासाठी फक्त आठ महिने शिल्लक आहेत. बीबीसीशी चर्चा करत असताना जाधव पीपीई किट चढवून तयार होत होते. बहुदा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह येणार होता.
उदय जाधव म्हणतात, "मी जे काम करतो आहे, ही लोकसेवाच आहे या भावनेने मी करतो. या महामारीचा सर्वांना एकजुटीने सामना करायचा आहे. पालिका अधिकारी, कर्मचारी प्रत्येकावर एक जबाबदारी आहे. लोकांच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावणं ही जबाबदारी माझ्यावर आहे. मला ती योग्य पद्धतीने पूर्ण करावीच लागेल. सेवा म्हणून मी हे काम करतो."
"काही नातेवाईक येतात. तर, काही मृत झालेल्या रुग्णांचे नातेवाईक येत नाहीत. मग, आपणच मनात देवाचं नाव घेवून त्यांना शेवटचा निरोप द्यायचा. मृतदेह नष्ट झाल्यानंतर अस्थी गोळा केल्या जातात. काही नातेवाईक अस्थी घेवून जातात, तर काही अस्थी नको असं म्हणतात. मग एकत्र झालेल्या अस्थी पालिकेची गाडी येऊन घेऊन जाते," असं जाधव म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)