कोरोना अंत्यसंस्कार : मृतदेहापासूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

भारतात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्यांची संख्याही लक्षणीय वाढलीय. अनेक राज्यातून समोर येणारे अंत्यसंस्काराचे फोटे काळीज पिळवटून टाकणारे आहेत.

अशावेळी एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे, तो म्हणजे, मृतदेहापासूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

मृत्युशय्येवर असणाऱ्या अनेक कोरोना रुग्णांना एकाकी मृत्यू येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांच्याजवळ कुणालाच जाण्याची परवानगी नसते. त्यामुळे मृतदेहापासूनही कोरोना विषाणूची लागण होते का? कोरोनाग्रस्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे करावे? पार्थिवाला अग्नी द्यायचा की तो पुरायचा? असे अनेक प्रश्न तुमच्या-आमच्या सारख्यांना पडला आहे.

त्याचीच उत्तरं जाणून घेऊया....

मृतदेहापासून कोव्हिड-19 ची लागण होते का?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार खबरदारी घेतली तर कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून कोव्हिड-19ची लागण होत नाही.

संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकेतून किंवा बोलताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्समधून कोरोनाची प्रामुख्याने बाधा होतो. मात्र, हा विषाणू काही पृष्ठभागांवर अनेक दिवसही सक्रीय राहू शकतो.

मे 2020 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पॅन-अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रवक्ते विलियम अॅडू-क्रो म्हणाले होते, "मृतदेहापासून संसर्ग पसरल्याचा कुठलाही पुरावा अजून तरी मिळालेला नाही."

विषाणू मृतदेहातही सक्रीय असतो का?

याविषयी बोलताना अॅडू-क्रो म्हणतात, "मृतदेह संसर्गजन्य नसतात, असं आम्ही म्हटलं याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृतदेहाजवळ जावं, त्यांना स्पर्श करावा, असा होत नाही. आपण खबरदारी घेतलीच पाहिजे."

जागतिक आरोग्य संघटनेने मार्चमध्ये काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यात म्हटलं होतं, "इबोला, मार्बग यासारखे काही ताप आणि कॉलरासारखे आजार सोडले तर मृतदेह सहसा संसर्गजन्य नसतात. मात्र, इन्फ्लुएंझाच्या रुग्णाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करताना फुफ्फुसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्यातून संसर्ग पसरू शकतो. अन्यथा नाही."

श्वसनाच्या आजाराने दगावलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात आणि इतर अवयवांमध्ये विषाणू असू शकतात. हे विषाणू शवविच्छेदन करताना वापरण्यात येणारी अवजारं किंवा आतला भाग स्वच्छ करताना पसरू शकतात.

त्यामुळे कोव्हिड-19 मुळे दगावलेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना प्रशिक्षित व्यक्तीकडूनच ते करण्यात यावे, हे कटाक्षाने पाळलं पाहिजे.

अंत्यसंस्कार कसे करावे?

काही देशांमध्ये कोव्हिड-19 मुळे दगावणाऱ्यांची संख्या इतकी जास्त आहे की मृतदेहांसाठी स्मशानभूमींमध्ये जागा कमी पडू लागली आहे.

काही देशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी अंत्यसंस्कार कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. काही देशांमध्ये अंत्यसंस्काराला परवानगी आहे. मात्र. तिथेही किती लोकांनी उपस्थित रहावे, यावर बंधनं आहेत.

अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय आणि आप्तेष्ट पार्थिवाचा चेहरा बघू शकतात. मात्र, त्यासाठीही काही नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार, "मृतदेहाला स्पर्श करू नये आणि बघितल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनी किमान 1 मीटर अंतर ठेवावं."

श्वसनासंबंधी कुठलाही त्रास असणाऱ्या लोकांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहू नये आणि राहिल्यास चेहऱ्यावर मास्क घालावा.

इतकंच नाही तर लहान मुलं, 60 वर्षांवरील व्यक्ती आणि ज्यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे, अशा लोकांनी मृतदेहाला स्पर्श करू नये.

मृतदेह पुरावा की अग्नी द्यावा?

जागतिक आरोग्य संघटनेने दोन्ही प्रकारच्या अंत्यविधींना परवानगी दिली आहे.

याविषयीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे, "संसर्गजन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुरण्याऐवजी त्याला अग्नी दिला पाहिजे, असा एक समज आहे. मात्र, तो चुकीचा आहे. ही प्रत्येक समाजाची आपापली संस्कृती आहे."

ज्यांच्यामार्फेत अंत्यविधी केले जातात त्यांनीही विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. उदाहरणार्थ मृतदेह दफन करण्यासाठी त्याला उचलणाऱ्या व्यक्तींनी हातात ग्लोव्ज घालावे आणि ग्लोव्ज काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे.

तसंच कोव्हिड-19 च्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना घाईगडबड करू नये, असा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

मृताच्या वस्तू जाळायचीही गरज नाही. 70 टक्के इथेनॉल असलेल्या जंतूनाशकाने किंवा ब्लीचने त्या वस्तू चांगल्या स्वच्छ करून घेता येतात.

मृताचे कपडेसुद्धा गरम पाण्यात वॉशिंग पावडर टाकून थोडा वेळ भिजत ठेवून त्यानंतर धुता येतात. फक्त कपडे धुताना त्याचे शिंतोडे आपल्यावर उडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

मृताची प्रतिष्ठा जपावी

"मृत व्यक्तीची प्रतिष्ठा, त्यांची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि त्यांचे कुटुंबीय यांचा आदर राखला गेला पाहिजे," असंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

मात्र, कोव्हिड-19 च्या साथीने काही ठिकाणी इतकं थैमान घातलं आहे की या सगळ्या गोष्टी पाळल्या जात नाहीत किंवा ते पाळणं शक्य होत नाही.

यासाठी दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर देशाचं उदाहरण देता येईल. या देशातल्या ग्वायस शहरात काही आठवड्यातच 10 हजार लोकांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला आहे. "इथली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं" इक्वेडोरच्या फ्युनरल सर्विस संघटनेचे प्रमुख मेरविन टेरॅन यांनी बीबीसीला सांगितलं.

इक्वेडोरची वैद्यकीय यंत्रणा कोव्हिड-19 ला हाताळण्याइतपत सक्षम नसल्याने इथला मृत्यूदर वाढला आहे. मृतांची संख्या जास्त झाल्याने शवगृहांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागाच नाही. अनेक मृतदेह रस्त्यावर पडून आहेत.

मृतदेह नेण्यासाठी शवपेट्या नाहीत. अनेकांनी तर कार्डबोर्डच्या शवपेट्या बनवून त्यात मृतदेहांना ठेवलं. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह दोन-दोन दिवस रस्त्यावर पडून असल्याचं इथल्या लोकांना बघावं लागतंय.

शवगृहांमध्ये जागाच नसल्याने हॉस्पिटलमधून मृतदेह थेट कोठारांमध्ये पाठवले जात आहेत. या कोठारांमध्ये एअर कंडिशनर्सची व्यवस्था नाही. मृतदेह ठेवण्यासाठीच्या इतर पायाभूत सुविधा नाहीत.

टेरॅन सांगतात, "मृतदेह आम्ही रोजच हाताळतो. त्यामुळे आम्हाला सवय असते. पण या परिस्थितीत कोठारांमध्ये जाऊन मृतदेह बाहेर काढणं आमच्यासाठीही अवघड होऊन बसलं आहे. 24 तासांनंतर मृतदेहांमधून पाणी यायला लागतं."

न्यूयॉर्क, इस्तंबूल, ब्राझीलमधलं मॅनॅस या शहरांमधल्या सामूहिक दफनाची दृश्यं बघून अंगावर काटा आला.

मात्र, कोरोना काळातल्या मृत्यूचं कटू वास्तव मृताला सन्मानपूर्वक निरोप देण्याच्या मार्गात अडथळा ठरता कामा नये, मृताची प्रतिष्ठा जपली जावी आणि मृताच्या प्रियजनांनाही दुःख व्यक्त करण्याची संधी आणि अवकाश मिळाला पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

याविषयी जागतिक आरोग्य संघटना म्हणते, "कुटुंबाचे अधिकार, मृत्यूच्या कारणाचा तपास आणि संसर्ग होण्याची जोखीम याचा समतोल साधत प्रशासनाने प्रत्येक मृत्यूनुसार वेगवेगळं काम करायला हवं."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)