कोरोना व्हायरस : मरण पावलेल्या हिंदूंचे अंत्यसंस्कार करणारा मुस्लीम

    • Author, शैली भट
    • Role, बीबीसी न्यूज गुजराती

जगभरातील लोक कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहेत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस त्यांची जबाबदारी निभावत आहेतच पण सामान्य माणसंही या लढाईत मागे नाहीत.

सुरतचे एक मुस्लीम गृहस्थ सध्या अनेक कुटुंबांचा आधार बनले आहेत. ही बातमी लिहिपर्यंत सुरतमध्ये 4 लोकांचा कोव्हिड -19 मुळे मृत्यू झालेला होता. अब्दुल मलबरी यांनी त्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले आहेत.

कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तरी अब्दुल त्यांचे अंत्यसंस्कार करतात. त्यांनी हे काम स्वीकारलं आहे, कारण संसर्गाच्या भीतीनं कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या जवळ त्यांच्या घरचे जाऊ शकत नाहीत.

30 वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार

बीबीसीशी बोलताना 51 वर्षीय अब्दुल यांनी सांगितलं, "मी गेल्या 30 वर्षांपासून कोणीही ताब्यात न घेतलेल्या, बेवारस अशा व्यक्तींच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करतोय. रस्त्यावर राहाणारे भिकारी, आत्महत्या केलेले लोक, ज्यांना जवळचं कोणी नाही अशा लोकांना सन्मानाने या जगातून निरोप देण्याचं काम आम्ही करतो. केदारनाथचा पूर, कच्छमधला भूकंप किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळेसही मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत. माझ्यासोबत आता 35 कार्यकर्ते काम करतात."

सुरतमधल्या कोरोनाबाधितांच्या केसेस वाढल्यानंतर सुरत महानगर पालिकेने अब्दुल मलबारी आणि त्यांच्या स्वयंसेवकांना संपर्क केला. जगभरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूच्या आकड्याने त्यांना चिंतेत टाकलं होतं. सुरतमध्येही असं घडलं तर मृतदेहांचे अंत्यसंस्कार व्यवस्थित तसंच सुरक्षितरित्या झाले पाहिजेत या जाणीवेने अधिकाऱ्यांनी आपल्याला संपर्क केल्याचं अब्दुल सांगतात.

"कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करता येत नाहीत. त्यामुळे सुरत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारलं, की स्मशानभूमीत जाऊन या मृतदेहांचे अंत्यसंस्कार आम्ही करू शकतो का? मी लगेच होकार दिला," अब्दुल सांगतात.

याविषयी अधिक बोलताना सुरत महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष नाईक सांगतात, की आम्हाला अब्दुल मलबारी यांची खूप मदत होते आहे. आम्ही त्यांच्याकडे मदत मागितली तेव्हा ते तातडीने हो म्हणाले. त्यांना फोन केल्यानंतर १५ ते २० मिनिटात ते हॉस्पिटलमध्ये पोहचतात. मृत व्यक्तीवर अग्नीसंस्कार झाल्यानंतर किंवा त्यांचा दफनविधी झाल्यानंतर अब्दुल यांची टीम ते स्मशान किंवा दफनभूमी पूर्णपणे डिसइन्फेक्ट करतात. त्यांचं काम खूप मोलाचं आहे."

अब्दुल यांनी आपली 20 जणांची टीम तयार केली आहे. कोरोनाबाधित व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी, पीपीई किट कसं वापरावं यासाठी त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांनी आपले कॉन्टॅक्ट नंबर्स सगळ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना आणि सरकारी दवाखान्यांना दिले. त्यांना कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची सुचना मिळाली की ते लगेच आपलं किट घेऊन कामाला लागतात.

स्वतःचा बचाव कसा करतात?

कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळेस ते आपला बचाव कसा करतात याबद्दल विचारल्यानंतर अब्दुल सांगतात, "आम्ही WHO च्या सगळ्या सूचना पाळतो. आम्ही बॉडीसुट, मास्क आणि ग्लोव्हज घातल्याशिवाय बाहेर पडत नाही. मृतदेहावर रसायनं फवारली जातात आणि त्याला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलं जातं. आमच्याकडे 5 शववाहिका आहेत ज्यातल्या 2 फक्त कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर वापरल्या जातात. त्या नियमितपणे सॅनिटाईज केल्या जातात."

या सगळ्यात सरकार, पोलीस, फायर ब्रिगेड आणि सॅनिटाईजिंग टीमचंही सहकार्य मिळतं असल्याचं ते नमूद करतात.

'शेवटची भेटही होत नाही'

कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या परिवारांशी बोलणं हा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव असल्याचं अब्दुल म्हणतात. एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर तिच्या कुटुंबालाही क्वारंटिनमध्ये राहावं लागतं. अशात कुटुंबाचा क्वारंटाईन कालावधी संपायच्या आतच जर कोणाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला आपल्या जवळच्या व्यक्तीची शेवटची भेटही घेता येत नाही.

"आयुष्यात वाईट अवस्थेतले कित्येक मृतदेह पाहिले. पण ही परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. जवळचे नातेवाईक रडतात, आमच्या माणसाला शेवटचं पाहू द्या म्हणून विनंती करतात आणि कोणीच काही करू शकत नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लांब ठेवणं गरजेचं असतं. आम्ही त्यांना आश्वासन देतो, की अंतिम संस्कार तुमच्या धर्माप्रमाणेच होतील, सगळे विधी पार पाडले जातील, कशातही कसूर राहणार नाही. इतकं तर आम्ही त्यांच्यासाठी करूच शकतो."

'आमच्या परिवारापासूनही लांब राहतोय'

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर घरचे काय म्हणाले हे विचारल्यावर अब्दुल सांगतात, "त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, काळजी घ्या."

मृतदेहाला हॉस्पिटलमधून ताब्यात घेतल्यापासून ते त्याचा अंत्यविधी होईपर्यंत अब्दुल आणि त्यांचे सहकारी प्रोटेक्टिव्ह कीट वापरतात.

"आमचं काम झाल्यावर आम्ही आमचे हात गरम पाण्याने स्वच्छ धुतो आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालतो. कितीती काळजी घेतली तरी आमच्या कुटुंबाला धोका आहेच, त्यामुळे आम्ही आमच्या घरच्यांपासून लांब राहाण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोवर आम्ही आमच्या कुटुंबाला भेटू शकत नाही पण त्याला पर्याय नाही. आमच्या ऑफिसमध्येच आमच्या झोपण्याची सोय केली आहे," ते म्हणतात.

अब्दुल कोरोनाबाधित व्यक्तींचे अंत्यसंस्कार करतात हे कळाल्यानंतर अनेक जण त्यांच्याशी पूर्वीसारखे वागत नाही, पण त्याने आपल्याला काही फरक पडत नसल्याचं ते स्पष्ट करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)