You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमा तणाव : '...आणि त्या चीनी जवानाच्या डाव्या डोळ्याच्या वर माझी गोळी लागली'
- Author, के. के. तिवारी
- Role, निवृत्त मेजर जनरल
19 ऑक्टोबरची रात्र मी गोरखांबरोबर घालवली. 20 ऑक्टोबरला सकाळी राजपूतांकडे जाण्याचा माझा विचार होता. मात्र, तसं होऊ शकलं नाही. त्यानंतर तर चिनी जे म्हणतील ते मला करावं लागलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी राजपूतांकडे गेलो खरा. मात्र, युद्धकैदी या म्हणून. 20 ऑक्टोबरच्या सकाळी बॉम्बस्फोटाच्या कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने मी गाढ झोपेतून जागा झालो.
मी बंकरमधून बाहेर आलो आणि धडपडत कसातरी सिग्नल्सच्या बंकरपर्यंत पोहोचलो. तिथे माझ्या रेजिमेंटचे दोन सिग्नलमॅन मुख्यालयाशी रेडियोद्वारे संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
टेलिफोन लाईन्स कट झाल्या होत्या. मात्र, ब्रिगेड मुख्यालयाशी रेडियोद्वारे संपर्क स्थापित झाला होता. मी त्यांना जोरदार गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली.
स्मशान शांतता आणि पुन्हा गोळीबार
थोड्यावेळाने गोळीबार थांबला आणि गोळीबार थांबताच तिथे स्मशान शांतता पसरली. काहीवेळाने उंच डोंगरांवरून छोट्या शस्त्रांनी अधून-मधून गोळीबार सुरू झाला. मी बघितलं तर मला लाल चांदण्या असणारे खाकी गणवेश घातलेले चीनी जवान खाली उतरत स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी गोळीबार करत आमच्या बंकरकडे येत होते.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की बटालियनचे सगळेच मला आणि माझे दोन सिग्नलमेन यांना तिथेचू सोडून कधीच मागे निघून गेले होते.
मी कधीच कुठल्याच चिनी जवानाला एवढ्या जवळून बघितलेलं नव्हतं. माझं काळीज जोरजोरात धडधडतं होतं. चिनी जवानांची पहिली टिम आम्हाला मागे टाकत पुढे निघून गेली होती.
बंकरमधून बाहेर येऊन ब्रिगेड मुख्यालयाकडे जावं, असा विचार करत असतानाच चीनी जवानांची दुसरी टीम खाली उतरताना दिसली.
ते जवानही पहिल्या टीमसारखेच मधूनमधून गोळीबार करत होते. मात्र, ते खूप काळजीपूर्वक एकेका बंकरची झडती घेत पुढे सरकत होते. बंकरमध्ये भारतीय जवान असतील तर कुणीही जिवंत राहू नये, म्हणून ते प्रत्येक बंकरमध्ये ग्रेनेड फेकत होते.
भळभळणाऱ्या जखमा
त्याकाळी मी माझ्याजवळ 9 एमएमची ब्राउनिंग ऑटोमॅटिक पिस्तुल ठेवायचो. माझ्या मनात विचार आला की माझ्या मृतदेहाजवळ अशी पिस्तुल असायला नको ज्यातून एकही गोळी झाडली गेलेली नसेल. आमची परिस्थिती कितीही दयनीय असली तरी या पिस्तुलीचा वापर झालाच पाहिजे.
त्यामुळे दोन चिनी जवान आमच्या बंकरकडे येताच मी पिस्तुलातल्या सर्व गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. एक गोळी चिनी जवानाच्या डाव्या डोळ्याच्या वर लागली. तो कोसळला आणि घरंगळत खाली गेला.
तो ठार झाला असणार. कारण गोळी लागल्यावर तो ओरडला नाही किंवा कुठलाच आवाजही केला नाही. दुसऱ्या चीनी जवानाच्या खांद्याला गोळी लागली आणि तोही खाली घरंगळत गेला.
यानंतर तर अनेक चिनी जवान अंदाधुंद गोळीबार करत आणि ओरडत आमच्या बंकरच्या दिशेने धावले. एका सिग्नलमॅनने अनेक गोळ्या आपल्या शरीरावर झेलल्या आणि तो तिथेच धारातीर्थी पडला. मला अजूनही आठवतंय नळातून खूप दाबाने पाणी बाहेर यावं, तसं त्याच्या शरीरातून रक्त बाहेर येत होतं.
त्यानंतर दोन चीनी जवान उड्या मारून आमच्या बंकरच्या आत घुसले. त्यांनी रायफलच्या बटने माझ्यावर हल्ला केला. मला बेदम मारहाण करत आणि ओढत त्यांनी बाहेर काढलं. मार्च करत मला थोडं दूर नेण्यात आलं. त्यानंतर मला बसायला सांगण्यात आलं.
चिनी जवान अत्यंत असभ्यपणे वागत होता.
थोड्यावेळाने एक चिनी अधिकारी आला. त्याला मोडकंतोडकं इंग्रजी येत होतं. माझ्या खांद्यावर लावलेला बॅच बघून माझी रँक त्याच्या लक्षात आली. तोही असभ्यपणे बोलत होता.
माझ्या जवळच एक गोरखा जवान बेशुद्धावस्थेत पडला होता. थोड्यावेळाने त्याला शुद्ध आली. त्याने माझ्याकडे पाहिलं. कदाचित त्याने मला ओळखलं असावं. तो म्हणाला - साब पानी.
मी लगेच त्याला मदत करण्यासाठी त्याच्याजवळ गेलो. तेवढ्यात त्या चीनी कॅप्टनने मला मारलं आणि आपल्या तोडक्या-मोडक्या इंग्रजीत मला म्हणाला - मूर्ख कर्नल. बस तिथे. तू कैदी आहेस. मी सांगत नाही तोवर तू हलू शकत नाहीस. नाहीतर मी गोळी घालेन.
त्यानंतर थोड्यावेळाने नामका चू नदी लगतच्या एका चिंचोळ्या रस्त्यावरून आमचा मार्च काढण्यात आला. सुरुवातीचे तीन दिवस आम्हाला खायला-प्यायला काहीही देण्यात आलं नाही. त्यानंतर पहिलं जेवण दिलं ते उकळलेला खारट भात आणि तळलेला मुळा.
हृदय पिळवटून टाकणारं दृश्य
26 ऑक्टोबर रोजी आम्ही चेन येच्या युद्धकैद्यांच्या शिबिरात दाखल झालो. पहिले दोन दिवस मला एका अंधाऱ्या आणि ओल्या खोलीत ठेवण्यात आलं. यानंतर कर्नल रिख यांनाही माझ्या खोलीत आणलं गेलं. ते जखमी होते.
तिथे आम्हाला चार गटात विभागण्यात आलं होतं. प्रत्येक गटाचं वेगळं स्वयंपाकघर होतं. तिथे चिनी जवानांनी निवडलेले भारतीय जवान सर्वांसाठी जेवण बनवायचे.
नाश्ता सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान मिळायचा. दुपारच्या जेवणाची वेळ होती साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि रात्रीचं जेवण तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान दिलं जायचं.
ज्या घरात आम्हाला ठेवण्यात आलं होतं त्यांच्या दारं, खिडक्या गायब होत्या. कदाचित चिनी जवानांना खिडक्या, दारांच्या लाकडाचा वापर शेकोटी पेटवण्यासाठी केला असावा. वेळ घालवण्यासाठी मी खोलीतच फिरायचो.
कडाक्याची थंडी
पहिल्या दोन रात्री तर आम्ही थंडीत कुडकुडत होतो. आम्हाला आत नेत असताना आम्हाला तिथे पेंढ्यांचा ढीग दिसला. आम्ही त्यांना विचारलं की आम्ही त्या घेऊ शकतो का? त्यांनी आमची विनंती मान्य केली. आम्ही त्याच पेंढ्या अंथरून म्हणूनही वापरल्या आणि पांघरूण म्हणूनही.
8 नोव्हेंबर रोजी चीनी जवानांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी तवांगवर ताबा मिळवला आहे. हे ऐकून आम्ही सगळेच खूप अस्वस्थ झालो होतो. तोवर युद्ध कुठल्या दिशेने चाललंय, याची काहीच कल्पना आम्हाला येत नव्हती.
त्यांना कुठूनतरी माहिती मिळाली की 4 नोव्हेंबर 1942 रोजी मी भारतीय सैन्यात दाखल झालो होतो. त्यामुळे 4 नोव्हेंबर 1962 रोजी एक चीनी अधिकारी मी भारतीय सैन्यात दाखल झाल्याला 20 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने वाईनची एक छोटी बाटली घेऊन माझ्याकडे आला.
भारतीय जवानांच्या भावनांना हात घालण्यासाठी चीनी जवान काही खास सणांच्या दिवशी चांगलंचुंगलं खाऊ घालायचे. भारतीय सिनेमे दाखवायचे.
आमच्या शिबिरात एक अतिशय देखणी चीनी महिला डॉक्टर होती. ती अधून-मधून रिखला तपासायला यायची. खरं सांगायचं तर आम्हा सर्वांनाच ती आवडायची.
रेडक्रॉसकडून पार्सल
डिसेंबरच्या शेवटी शेवटी रेडक्रॉसकडून भारतीय युद्धकैद्यांसाठी दोन पार्सल आली. एका पॅकेटात उबदार कपडे होते. जर्मन बॅटल ड्रेस, थर्मल बनियान, मफलर, टोपी, जॅकेट, शू आणि टॉवेल. दुसऱ्या पाकिटात खायचं सामान होतं - साठे चॉकलेट, दूधाचे टिन, जॅम, दही, मासे, साखरेची पाकिटं, कणिक, डाळ, मटार, मीठ, चहा, बिस्किटं, सिगारेट आणि व्हिटॅमीनच्या गोळ्या.
16 नोव्हेंबरला पहिल्यांदा आम्हाला आमच्या घरी पत्र पाठवण्याची परवानगी मिळाली. आम्हा चार लेफ्टनंट कर्नल्सना घरी तार पाठवण्याची परवानगीही देण्यात आली. आमचे पत्र सेसंर्ड असायचे. त्यामुळे चीनी लोकांना वाईट वाटेल, असं काहीही आम्ही लिहू शकत नव्हतो.
एका पत्राच्या शेवटी मी लिहिलं होतं की मला रेडक्रॉसमार्फत काही उबदार कपडे आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पाठवा. माझ्या चार वर्षाच्या मुलीने याचा अर्थ असा घेतला की तिच्या वडिलांना तिथे थंडी वाजतेय आणि त्यांना खायला मिळत नाही. ते उपाशी आहेत.
चीनी जवान कायम पब्लिक अॅड्रेस सिस्टिमवर भारतीय गाणी लावायचे. एक गाणं वारंवार लावायचे. ते गाणं होतं लता मंगेशकर यांचं - आ जा रे मैं तो कब से खडी इस पार… हे गाणं ऐकून आम्हा सगळ्यांना घराची खूप आठवण यायची.
बहादुर शहा जफरच्या गझल
एक दिवस एका चिनी महिलेने आम्हाला बहादूर शहा जफलर यांच्या गझला ऐकविल्या. ते ऐकून आम्हा सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं.
आमचा एक जवान रतन आणि या महिलेने एकमेकांना जफर यांनी लिहिलेले शेर ऐकविले. ही ऊर्दू बोलणारी महिला कदाचित बरेच वर्ष लखनौला होती.
याच दरम्यान आम्ही चीनमध्ये सुईने करण्यात येणाऱ्या उपचारांची जादूही बघितली. आमचे मित्र रिख यांना मायग्रेनचा त्रास होता. मात्र, या सुईच्या उपचाराने त्यांचा त्रास खूप कमी झाला. यात त्या देखण्या डॉक्टरचा हात होता की उपचारांची कमाल, हे तुम्हीच ठरवा.
भारतात परत पाठवण्याआधी आम्हाला चीनदर्शन घडवावं, असं त्या लोकांना वाटलं. वुहानमध्ये आणखी 10 भारतीय अधिकारी युद्धकैदी म्हणून आम्हाला भेटले. यात मेजर धन सिंह थापाही होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आलं होतं.
बीबीसी ऐकण्याचं स्वातंत्र्य
इथे आम्हाला रेडियो ऐकण्याची परवानगी देण्यात आली. आम्ही पहिल्यांदा ऑल इंडिया रेडियो आणि बीबीसी ऐकलं.
चीनमध्ये फिरताना उंची कपडे घातलेला एक चीनी इसम कायम आमच्या सोबत होता. आम्ही त्याला 'जनरल' म्हणायचो.
त्याच्या मागे त्याचा एक सेवक असायचा. तो त्याला चहा-पाणी द्यायचा. बसायला खुर्ची देणे, डोक्यावर छत्री धरणे, अशी कामं तो करायचा. आम्ही त्याला जनरलचा 'अर्दली' म्हणायचो.
आम्हाला भारतात परत पाठवण्याचा कार्यक्रम सुरू असताना चीनतर्फे कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करणारी वक्ती तो 'अर्दली' होता. तर त्याच्या हातात पेन देणारा 'जनरल' होता.
सकाळी 9 वाजता आमचं विमान कुनमिंगहून कोलकात्यासाठी रवाना झालं. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी आमचं विमान कोलकाता एअरपोर्टवर पोहोचणार होतं. मात्र, ते खूप वेळ हवेतच घिरट्या घालत होतं.
विमान चालकाने घोषणा केली की विमानाची चाकं उघडत नाहीत. त्यामुळे कदाचित क्रॅश लँडिंग करावं लागेल.
अखेर 2 वाजून 30 मिनिटांनी आम्ही दमदम विमानतळावर उतरलो. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे अग्निशमन दलाच्या गाड्यांचा ताफा तैनात होता.
विमान जेव्हा हवेत घिरट्या घालत होतं तेव्हा विमानात बसलेल्या आम्हा सर्वांच्या मनात एकच विचार सुरू होता की चीनमधलं अग्निदिव्य पार पाडून आम्ही अखेर आमच्या भारतात दाखल तर झालो. मात्र, भारतात क्रॅश लँडिंगने आम्हाला मरणाच्या दारात उभं केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)