You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत - चीन सीमा तणाव : 'माझा मुलगा शहीद झाला, पण सरकार अजूनही गप्प आहे'
- Author, रवी प्रकाश
- Role, रांचीहून बीबीसी हिंदीसाठी
"माझा मुलगा चीनच्या सीमेवर शहीद झाला, पण सरकार अजूनही गप्प आहे. ही खेदाची बाब आहे. आमचा मुलगा गेला. समोर 15 दिवसांची तान्ही नात (जवानाची मुलगी) आहे. दोन वर्षांपूर्वी सून घरात आली. आता काय करायचं आम्ही? आमच्यावर कोसळलेल्या या संकटात काय करावं काही कळत नाही. भविष्य अंधारात आहे. बाहेर पाऊस कोसळतोय आणि आम्ही आतल्या आत रडतोय. सगळं काही संपलंय. आता मी मुलाच्या पार्थिवाची वाट पाहातोय."
बीबीसीला हे सांगताना भवानीदेवींना रडू कोसळलं
भवानीदेवींचा मुलगा कुंदन कांत ओझा भारतीय लष्करात होता. फक्त 26 वर्षांच्या कुंदनची गेल्या दोन आठवड्यांपासून लडाख रेंजच्या गलवान खोऱ्यात ड्यूटी होती. सोमवारी रात्री चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी 3 वाजता भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने फोनवरून कुटुंबाला याविषयीची माहिती दिली. तेव्हापासून घर शोकाकूल आहे. रडून रडून सगळ्यांची दैना झालीय.
"मी केके (कुंदन)ची कोण लागते असं फोन करणाऱ्यांनी मला विचारलं. मी म्हटलं तो माझा मुलगा आहे. मग त्यांनी विचारलं, तुम्ही आता बोलू शकता का? मी हो म्हटल्यावर त्यांनी कुंदन चीन बॉर्डरवर शहिद झाल्याचं सांगितलं. माझ्या मुलाचं पार्थिव पाठवण्याचा प्रयत्न ते लोक करत आहेत. आधी माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. मग मी माझ्या दिराच्या मुलाला - मनोजला त्या नंबरवर फोन करायला सांगितला. त्या ऑफिसरनी पुन्हा तेच सांगितलं. आता आम्ही अगदी असहाय्य आहोत. यापुढे काहीच बोलू शकत नाही."
15 दिवसांपूर्वी लेकीचा जन्म
कुंदन ओझा यांच्या पत्नी नेहा यांनी 1 जूनलाच लेकीला जन्म दिलाय. हे या जोडप्याचं पहिलंच मूल आहे. अजून बाळाचं बारसंही करण्यात आलेलं नाही. बाळाला बघायला घरी येण्यापूर्वीच कुंदन सीमेवर मारले गेले. ही नवजात कन्या आता कधीही वडिलांना भेटू शकणार नाही. नेहा आणि कुंदन यांच्या लग्नाला दोनच वर्षं झाली आहेत.
लॉकडाऊन झाला नसता तर कुंदन आज त्यांच्या घरी असते. पत्नी गरोदर असल्याने कुंदन यांना 10 मे पासून सुट्टी मिळाली होती असं भवानी देवी सांगतात.
पण लॉकडाऊनमुळे ही सुटी रद्द करण्यात आली. तेव्हापासून ते तिथेच होते. या दरम्यान 1 जूनला लेकीचा जन्म झाल्यानंतर कुंदन यांचं आईशी बोलणं झालं होतं. तेच शेवटचं ठरलं. त्यानंतर त्यांची नेमणूक गलवान खोऱ्यात करण्यात आली. तिथे नेटवर्क नसल्याने गेल्या 15 दिवसांपासून त्यांचा फोन बंद होता. हा फोन अजूनही बंद आहे.
तीन भावंडांमध्ये कुंदन दुसरे असल्याचं कुंदन यांचे चुलत बंधू मनोज ओझा यांनी बीबीसीला सांगितलं. 2011 साली कुंदन भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांचे वडील रवीशंकर ओझा शेतकरी आहेत. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातल्या डिहारी गावात हे कुटुंब रहातं. त्यांचे दोन भाऊ नोकरी करतात.
लष्कराकडून फोन आल्यानंतर भवानी देवींनी मनोजकडूनच या नंबरवर कॉलबॅक करून घेतला होता. कुंदन ओझा आता जगात नसल्याच्या बातमीवर याच कॉलदरम्यान शिक्कामोर्तब झालं.
झारखंड सरकारकडे अधिकृत माहिती नाही
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कुंदन ओझांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केलाय.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहीलंय, "मी त्यांना सॅल्यूट करतो. झारखंड सरकार आणि संपूर्ण राज्य कुंदनच्या कुटुंबीयांच्या सोबत आहे."
तर आपल्याला अद्याप (मंगळवारी रात्री 9.49 पर्यंत) अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याचं साहेबगंजचे उपायुक्त वरुण रंजन यांनी बीबीसीला सांगितलं.
त्यांनी सांगितलं, "कुंदन ओझांच्या कुटुंबियांकडूनच आम्हाला हे समजलं. याविषयीची अधिकृत माहिती देण्याची विनंती आम्ही लष्कराकडे केली आहे. तिथे नेटवर्कचीही समस्या आहे. बुधवार सकाळपर्यंत अधिकृतरित्या माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. पण हे समजल्यानंतर मी माझ्या काही अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवून नातेवाईकांशी बोललो. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना सगळ्या प्रकारची मदत केली जाईल."
कुंदन ओझांचं पार्थिव गुरुवारपर्यंत येण्याची शक्यता असल्याचं उपायुक्त वरुण रंजन यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)