You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस कोव्हॅक्सिन : भारतात तयार झालेल्या कोरोना लशीचं जुलैपासून मानवी परिक्षण
भारतात कोरोना विषाणूवरील लसीसाठीचे प्रयत्न आता मानवी चाचणीपर्यंत पोहोचले आहेत. देशात तयार झालेल्या या लसीची जुलै महिन्यात माणसांवर चाचणी घेण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली लस ही स्वदेशी बनावटीची म्हणजेच संपूर्णत: स्थानिकरीत्या तयार झालेली आहे.
विषाणूला विलग करून, प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात आली आहे.
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ही लस तयार केली आहे. दरम्यान किती जणांवर लसीचा प्रयोग केला जाईल हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
प्राण्यांवर या लसीची चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे झाली असून, कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध झालं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
जगभरात विविध ठिकाणी मिळून 120 संस्थांमध्ये कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सहाहून अधिक भारतीय कंपन्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे.
देशातील औषध तसंच लस यांच्या संदर्भातील संस्थेने भारत बायोटेक कंपनीला लसीची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. प्राण्यांवर या लसीच्या चाचणीचे परिणाम कंपनीने सादर केले. ते समाधानकारक असल्याने लसीच्या मानवी चाचणीसाठी अनुमती देण्यात आल्याचं कंपनीच्या पत्रकात म्हटलं आहे.
ही लस परिणामकारक आहे यापेक्षाही ती सुरक्षित आहे ना याकरता मानवी चाचणी घेण्यात येणार आहे.
जगभरातील आकडेवारी -
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-
कोव्हॅक्सिन असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदच्या यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केली आहे, असं भारत बायोटेक कंपनीचे चेअरमन डॉ. कृष्णा इला यांनी सांगितलं.
या कंपनीने विविध आजारांसाठी ४ अब्जहून अधिक लशींचे डोस तयार करून जगभर पुरवले आहेत. एच1एन1, रोटा व्हायरस अशा विविध आजारांसाठी कंपनीने लसीची निर्मिती केली आहे.
भारत बायोटेकव्यतिरिक्त झायडस कॅडिआ ही कंपनी दोन लसींसंदर्भात काम करत आहे. यांच्याबरोबरीने बायॉलॉजिकल ई, इंडियन इम्यूनॉलॉजिकल्स, मायनवॅक्स या कंपन्या लशीच्या निर्मिती प्रकियेत आहेत. देशातील आणखी चार ते पाच कंपन्याही लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी जगात लस पुरवणारी सगळ्यांत मोठी कंपनी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युके सरकारचा या उपक्रमाला पाठिंबा आहे.
जेनेरिक औषधांच्या निर्मितीत भारताचा अव्वल देशांमध्ये समावेश होतो.
पोलिओ, मेनिनजायटिस, न्यूमोनिया, रोटाव्हायरस, बीसीजी, मंप्स, रुबेला अशा अनेक आजारांवर भारतातच लस शोधून काढण्यात आली आहे. देशभरात 10-12 कंपन्या कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी काम करत आहेत.
लस तयार करण्यासाठी काही वर्षं लागतात असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.
पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होऊ शकेल असं तज्ज्ञांना वाटतं. कोरोनाचा विषाणू पहिल्यांदा स्पष्ट झाल्यानंतर एक ते दीड वर्षात लस मिळू शकेल.
शास्त्रीयदृष्ट्या हा क्रांतिकारी क्षण असेल, मात्र या लशीच्या परिणामकारकेतबद्दल ठोस सांगता येणार नाही असंही म्हटलं जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)