कोरोना व्हायरस बिहार : लग्नानंतर दोनच दिवसात नवरदेवाचा मृत्यू, 111 जणांना लागण

    • Author, नीरज प्रियदर्शी
    • Role, पाटण्याहून, बीबीसी हिंदीकरता

बिहारमध्ये एका नववधूने लग्नानंतर अवघ्या काही तासात नवऱ्याला कोरोनामुळे गमावलं आहे.

कोरोना संकटाच्या काळातही अनेकजण विवाहबद्ध झाले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीला जी काही लग्न झाल, ती ऑनलाईन पद्धतीनं होत होती.

पण अनलॉक-1 नंतर म्हणजे 8 जूनपासून 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाच्या आयोजनाची परवानगी देण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी लपून-छपून पूर्वीप्रमाणेच लग्न-समारंभ होताना दिसत आहेत.

विचारल्यानंतर मात्र 50 लोकांच्या उपस्थितीतच विवाह केल्याचं आयोजक सांगतात. पाटण्यातील असाच एक विवाह सध्या चर्चेत आहे.

पाटण्यातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी (30 जून) एका लग्नाची बातमी छापून आली. याठिकाणी लग्नाला उपस्थित राहिलेल्या सुमारे 111 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली, तर दोनच दिवसांनंतर नवऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

व्हायरसची लागण झालेले बहुतांश लोक लग्न समारंभात उपस्थित होते, तर इतर लोक विवाहस्थळाच्या परिसरातील होते.

पालीगंजच्या या लग्नात संसर्ग झालेल्या एका व्यक्तीला बिहटाच्या ईएसआयसी रुग्णालयात अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "माझा त्या लग्नाशी काहीएक संबंध नव्हता. मी त्या समारंभात सहभागीसुद्धा झालो नाही. पण लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांशी माझा संपर्क आला. त्यांनासुद्धा संसर्ग झालेला आहे.

त्यांच्या मते, लग्नात उपस्थित आचारी, फोटोग्राफर, परिसरातील किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेता या सर्वांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

15 जूनला हे लग्न झालं होतं. यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच 17 जूनला नवऱ्या मुलाचा मृत्यू झाला. त्याला पोटदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संसर्गानंतर नवऱ्या मुलाचे वडील मसौढीच्या अनुमंडल हॉस्पिटलमध्ये अलगीकरणात आहेत.

त्यांनी फोनवर बीबीसीला सांगितलं, "एम्सच्या गेटवर पोहोचेपर्यंतच माझ्या मुलाचा मृत्यू झाला होता, तरी आम्ही त्याला आत नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून एक पावती दिली. मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी हे उपयोगी पडेल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मृतदेह घरी आणून आम्ही विधीवत त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.

मुलाच्या मृत्यूनंतर लग्नाची चर्चा

नवऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर या लग्नाची चर्चा आसपासच्या परिसरातील लोकांनी सुरू केली.

पालीगंजचे स्थानिक पत्रकार आदित्यकुमार सांगतात, "मुलगा गुरूग्राममध्ये इंजिनिअर होता. लग्नासाठी तो 23 मे रोजी कारने गावी आला होता. लग्न योग्य प्रकारे पार पडलं, पण त्याच्या मृत्यूनंतर तो कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मुलगा आजारी असायचा किंवा त्याच्यावर करणी केली, अशा प्रकारच्या अफवा पसरत चालल्या होत्या.

आदित्य पुढे सांगतात, "लोकांनी घाबरून स्वतःहून वैद्यकीय पथक बोलावलं. पहिल्या टप्प्यात 9 जण पॉझिटिव्ह आढळले. नंतर आणखी 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर प्रशासनाने संबंधित परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला. इथं सर्वांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 111 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे."

नवऱ्या मुलाचा अहवाल कुठे?

मृत नवऱ्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती किंवा नाही, याबाबत संशय आहे.

त्याच्या वडिलांच्या मते, मुलगा अतिशय सुदृढ होता. गुरुग्राममध्ये त्याने स्वतःची तपासणी करून घेतली होती. कारमधून दोन भाऊ, बहीण आणि भाच्यांसह सहाजण गावी आले होते. सर्वजण आपल्या घरात 14 दिवस क्वारंटाईन झाले होते. 6 जूननंतर ते आमच्यासोबत राहू लागले.

मुलाच्या मृत्यूच्या दुःखासोबतच अफवांमुळे नवऱ्या मुलाच्या वडिलांना दुःख होत आहे.

ते सांगतात, "लोक माझ्यावर कलंक लावत आहेत. मी दोनवेळा त्याचा वैद्यकीय अहवाल मागवला. पण तोपर्यंत तो तयार झाला नव्हता. दरम्यान माझा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मुलाचा अहवाल आणायला मी जाऊ शकलो नाही."

नवऱ्या मुलाच्या कोरोना चाचणीबाबत 'एम्स'चे संचालक प्रभात कुमार यांना कल्पना नाही. आपल्याकडे अशा प्रकारची कोणतीही नोंद नसल्याचं ते सांगतात.

अनलॉक नियमांचं उल्लंघन

नियमांनुसार, अनलॉक भारत अंतर्गत लग्नात फक्त 50 लोकांना आमंत्रित करता येतं. पण पालीगंजच्या या लग्नाशी संबंधित 400 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे इथं 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते, असा अंदाज लावण्यात येत आहे.

पालीगंज पोलीस ठाण्याचे प्रमुख सुनील कुमार सांगतात, "त्यांनी लग्नासाठी 50 जणांची परवानगी घेतली होती. पण जास्त लोक उपस्थित असल्याचं आढळून आलं आहे. आम्ही सर्वांची ओळख पटवून त्यांची तपासणी करून घेत आहोत. क्वारंटाईन काळ संपल्यानंतर कारवाई करण्यात येईल.

गट विकास अधिकारी चिरंजीव पांडेय सांगतात, "अनुमंडल हॉस्पिटलचं पथक संपर्कातील लोकांची चाचणी करत आहे. संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. अनेक जण तिथं उपस्थित होते. त्यामुळे ही साखळी वाढत जाण्याची भीती आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)