चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयावर कशी व्यक्त झाली चीनमधली प्रसारमाध्यमं?

केंद्र सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. भारत-चीन सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला 'कठोर संदेश' देण्याचा हा प्रयत्न असल्याचं भारतीय प्रसार माध्यमांमधून सांगण्यात आलं.

मात्र अॅपवर बंदी घालण्यासंबंधीचं जे पत्रक केंद्र सरकारने प्रसिद्ध केलंय, त्यात सीमावादाचा कुठेही उल्लेख नाही. हे अॅप देशाचं सार्वभौमत्व आणि देशाची सुरक्षा यासाठी 'नुकसानकारक' असल्याचं तसंच या अॅपमुळे डेटाच्य़ा सुरक्षिततेला आणि गोपनीयतेलाही 'धोका' असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

15 जून रोजी लडाख सीमेवरच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक चकमक झाली. त्यानंतर भारत सरकारने ही बंदी घातली आहे. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनने मात्र, त्यांच्या बाजूने किती नुकसान झालं, याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सीमेवर जवान शहीद झाल्यानंतर देशात अनेकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. चिनी वस्तू विशेषतः स्मार्टफोन भारतात बरेच लोकप्रिय आहेत.

भारतीय प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी 'अव्यवहार्य' आहे.

सीमावादासाठी कायम भारताला दोषी धरणाऱ्या चीनच्या एका राष्ट्रवादी सरकारी वृत्तपत्राने चिनी अॅपवर बंदी घालण्याचं भारत सरकारचा हे पाऊल 'अति-राष्ट्रवादा'चा भाग असल्याचं म्हटलं आहे.

चिनी प्रसार माध्यमं : यात भारताचाच तोटा

चीनमधली अधिकृत प्रसार माध्यमं उदाहरणार्थ शिन्हुआ वृत्तसंस्था, पिपल्स डेली आणि चायना सेंट्रल टेलिव्हिजन यांनी या बंदीवर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ते सीमावादावर सामान्यपणे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचीच री ओढतात.

मात्र, ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राने पुन्हा एकदा सीमावादासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे आणि अॅप्सवर घातलेली बंदी 'अल्ट्रा-नॅशनॅलिझम'च्या लाटेचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

या इंग्रजी वृत्तपत्राने लिहिलं आहे, "हे पाऊल भारतीय जवानांनी सीमा पार करून चीनसोबत बेकायदा कारवाई सुरू करणे आणि चिनी जवानांवर हल्ला चढवण्यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढल्यानंतर उचलण्यात आलं आहे. त्यानंतर भारतात 'अल्ट्रा-नॅशनॅलिझन'ची लाट आली आहे."

बातम्या आणि कॉमेंट्री वेबसाईट Guancha.cn ने म्हटलं आहे की, गलवान खोऱ्यात 'स्वतःच चिथावल्यानंतर' चिनी वस्तूंचा बहिष्कार करून भारत स्वतःचंच नुकसान करून घेत आहे.

ग्लोबल टाईम्सच्या चिनी भाषेतल्या वेबसाईटवर हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, या बंदीमुळे ज्या भारतीयांच्या नोकऱ्या जाणार आहे, त्याबद्दल भारतीय मीडियाने काळजी व्यक्त केली आहे. यात म्हटलं आहे की, दीपिका पादुकोण, सारा अली खान, शाहिद कपूर आणि माधुरी दीक्षित यासारखे बॉलीवुड तारे-तारका चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी टिकटॉकचा वापर करतात.

वृत्तपत्रात म्हटलं आहे की, बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा आधीच भारतात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांवर परिणाम होतोय. यात चिनी मोबाईल कंपनीच्या भारतातल्या कर्मचाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे (नाव दिलेलं नाही) की कोरोनाची साथ आणि बहिष्कार मोहिमेमुळे कंपनीच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.

चिनी युजर्स भडकले

कठोर सेंसॉरशीप असलेली चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वीबोवर (भारतात बंदी घालण्यात आली आहे) 'India bans 59 chinese apps' या बातमीवर 30 जूनच्या दुपारपर्यंत 22 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 9,700 कमेंट्स होत्या.

अनेक यूजर्स या बंदीवर टीका करत भारतीय वस्तू आणि अॅपवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत होते. मात्र, असं करण्यासाठी त्यांना कुठलीच भारतीय वस्तू किंवा अॅप मिळत नसल्याचं म्हणत टरही उडवली जात होती.

एक यूजर लिहितो, "केवळ दुबळेच बहिष्कार घालू शकतात. आम्हाला भारताच्या बहिष्काराची गरज नाही. कारण आमच्याकडे 'मेड इंड इंडिया' उत्पादनं वापरलीच जात नाहीत."

मात्र, काही युजर्सने हेदेखील म्हटलं आहे की, ज्याप्रमाणे चिनी इंटरनेट यूजर्स व्हर्च्युअल प्रॉक्सी नेटवर्क (VPN) वापरून देशाने घातलेली 'बंदीची महान भिंत' ओलांडून फेसबुक, ट्वीटर आणि इतर बंदी असलेल्या वेबसाईट्स वापरतात, त्याचप्रमाणे भारतीय यूजरदेखील व्हीपीएनच्या मदतीने बंदी घातलेले हे अॅप्स वापरू शकतात.

वीबो यूजर्सनी भारतीय दूतावासाच्या अधिकृत वीबो अकाउंटवरही बंदीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

एक यूजर लिहितो, "चीनच्या वीबो अॅपवरही बंदी घालत आहात, असं म्हटलेलं नाही का? लवकर करा. तात्काळ आपलं अकाऊंट बंद करा."

भारतीय प्रसार माध्यमं : हा 'डिजिटल सर्जिकल स्ट्राईक'

सरकारने ज्या 59 अॅपवर बंदी घातली आहे त्यात टिकटॉक या भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या अॅपचाही समावेश आहे. एका स्थानिक माध्यमानुसार भारतात टिकटॉकचे 10 कोटी सक्रीय यूजर आहेत.

अनेकांना यातून प्रसिद्धी मिळाली तर अनेकांनी व्यवसायाच्या प्रमोशनसाठीसुद्धा टिकटॉकची मदत घेतली आहे.

भारतात ट्वीटरवर "ChineseAppsBlocked" आणि #RIPTikTok हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

या बंदीवर प्रतिक्रिया देताना टिकटॉकने म्हटलं आहे की, डेटाची गोपनीयता आणि सुरक्षा याबाबत त्यांनी कायमच भारतीय कायद्यांचं पालन केलं आहे. आपण भारतीय यूजरची कुठलीही माहिती कुठल्याही परदेशी सरकार किंवा चीनच्या सरकारला पुरवलेली नाही.

जाणकारांच्या मते केंद्र सरकारचं हे पाऊल भारतात व्यावसायिक हितसंबंध ठेवणाऱ्या बड्या चिनी कंपन्यांसाठी एकप्रकारे 'संकेत' आहेत.

'द इंडियन एक्सप्रेस' या आघाडीच्या इंग्रजी दैनिकातल्या एका लेखात म्हटलं आहे की, ही बंदी म्हणजे भारतातर्फे आपल्या हेतूची झलक दाखवणं आणि कठोर संदेश देणं दोन्ही आहे.

या लेखात पुढे म्हटलं आहे, "या निर्णयामुळे भारताला फार तोटा होणार नाही. कारण या अॅप्सचे भारतीय पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, चीनसाठी भारतीय अॅप मार्केट फार महत्त्वाचं आहे."

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. भारतात विकल्या जाणाऱ्या वस्तू ज्या देशातून आल्या आहेत, त्या देशांचे टॅग लावा, असं या बैठकीत सांगण्यात आलं होतं. फायनॅन्शिअल टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने लिहिलं आहे की, काही कंपन्यांनी याला होकार दिला आहे.

चिनी वस्तू ओळखता याव्या, यादृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातंय.

भारतीय प्रसार माध्यमातल्या काहींनी तर एक पाऊल पुढे जात हा भारताचा 'डिजिटल सर्जिकल स्ट्राईक' असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामीदेखील त्यापैकीच एक. बंदीचा हा निर्णय 'अद्वितीय' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं, "त्यांच्यावर (चीनवर) किती मोठा आघात झालाय, याची त्यांना कल्पना नाही. आता चीनला हे कळून चुकलं असेल की, आम्ही काही करायचं ठरवलं तर आपल्या मर्जीने पावलं उचलतो."

इंडिया टुडेचे न्यूज अँकर राहुल कंवल यांनी म्हटलं, "59 चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयाला माझा भक्कम पाठिंबा आहे. यापैकी बहुतांश अॅप भारतीय यूजरची माहिती चोरत होते. चीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अॅप स्वतःच्या देशात वापरू देत नाही. आर्थिक सहकार्य एकतर्फी असू शकत नाही. हा चीनच्या दुखऱ्या शीरेवर केलेला आघात आहे."

हे नक्की वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)