You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा उत्तर कोरियात खरंच एकही रुग्ण नसेल का?
जगभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना जगाच्या पाठीवर एक असाही देश आहे ज्याने आपल्याकडे एकालाही कोरोना विषाणूची लागण झालेली नाही, असा दावा केला आहे. हा देश आहे उत्तर कोरिया.
नुकतंच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग-उन यांना पाठवलेल्या एका संदेशात उत्तर कोरियाला कोरोना विषाणूचा धोका असल्याचं म्हणत मदत देऊ केली होती. मात्र, उत्तर कोरियाच्या सरकारने कायमच आपल्याकडे एकही कोरोनाग्रस्त आढळला नसल्याचं म्हटलं आहे.
शुक्रवारी उत्तर कोरियाच्या प्रसार माध्यमांमध्ये सांगण्यात आलं की राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना तोंडी संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी कोरोनाच्या जागतिक साथीविरोधी लढ्यात मिळवलेल्या विजयाबद्दल चीनचं कौतुक केलं आहे.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनीही तोंडी संदेश पाठवत किम जाँग-उन यांचे आभार मानले. चीनमध्ये विषाणूच्या उद्रेकानंतर उत्तर कोरियाने दिलेली साथ मोलाची होती, असं जिनपिंग म्हणाले. तसंच कोव्हिड-19 विरोधातल्या लढ्यात (उत्तर कोरियाला) आपल्या परीने सर्व ती मदत करायला आपण तयार असल्याचंही म्हटलं आहे.
मात्र, आपल्याकडे कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याच्या उत्तर कोरियाच्या दाव्यामुळे सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. खरंच असं होऊ शकतं का, असा प्रश्न तज्ज्ञांनाही पडला आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
चीनमधल्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करणारा उत्तर कोरिया पहिला देश होता. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्याचा आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, उत्तर कोरियातली आरोग्य यंत्रणा अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे कोरोनाचा थोडाही प्रसार झाला तर उत्तर कोरियातली परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असं तज्ज्ञांना वाटतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग-उन अचानक गायब झाले होते. तब्बल 20 दिवस त्यांचा काहीच थांगपत्ता नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमधून लावण्यात येत होता. काहींनी तर त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं होतं.
मात्र, 20 दिवसांच्या अज्ञातवासानंतर जाँग-उन 2 मे रोजी खतनिर्मिती कारखान्यात दिसले. याविषयी दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजंस सर्विस या गुप्तहेर संस्थेने किम जाँग-उन यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याच्या अफवा खऱ्या असण्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं संसदीय समितीसमोर सांगितलं होतं.
यानंतर दक्षिण कोरियाच्या संसदीय समितीच्या एका सदस्याने किम जोंग उन गायब होण्यामागे कोव्हिड-19 चा उद्रेक हे कारणदेखील असू शकतं, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोरोनाबाबत उत्तर कोरियाने केलेला दावा आणि चीनने देऊ केलेली मदत याचं बीबीसी वर्ल्ड सर्विसच्या एशिया पॅसिफिक एडिटर सेलिया हॅटन यांनी विश्लेषण केलं आहे. त्या काय म्हणतात, बघूया.
कोव्हिड -19 पासून स्वतःला सुरक्षित ठेवल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. मात्र, उत्तर कोरियावर लक्ष ठेवून असणाऱ्या अनेकांनी गेली कित्येक आठवडे या दाव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
विषाणूच्या उद्रेकानंतर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास बंद करणारा उत्तर कोरिया पहिला देश होता, हे खरं आहे. उत्तर कोरिया आणि चीन यांच्यामध्ये जी मोठी सीमा आहे ती पार करणाऱ्याला दिसताक्षणी गोळा घालण्याचे आदेशही उत्तर कोरियाने आपल्या लष्कराला दिल्याचं वृत्त आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सीमा पूर्णपणे बंद करणं जवळपास अशक्य आहे. याच सीमेतून चीनी उद्योजकांचा उत्तर कोरियाशी अवैध व्यापार चालतो.
बीजिंगने उत्तर कोरियाला मदतीचा हात दिला आहे. यामागे अनेक कारणं आहेत. एक महत्त्वाचं कारण म्हणजे चीनमध्ये नव्याने कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी उत्तर कोरियात त्याचा उद्रेक टाळणं चीनसाठी गरजेचं आहे. दुसरं म्हणजे उत्तर कोरियात विषाणूची साथ पसरलीच तर तिथली परिस्थिती किती गंभीर होईल, याचीही चीनला काळजी आहे. उत्तर कोरियातली आरोग्य यंत्रणा अत्यंत ढिसाळ आहे. त्यामुळे कोरोनाचा थोडाही उद्रेक झाला तर तो भार ही यंत्रणा पेलू शकणार नाही. परिणामी किम जाँग-उन यांची सत्ताच धोक्यात येईल. उत्तर कोरियातला सत्ताबदल चीनसाठी जोखमीचा ठरू शकतो. त्यामुळे तसं होऊ नये, याची चीन सर्वतोपरी काळजी घेईल.
चीनचे जागतिक राजकीय हितही यात गुंतले आहेत. या दोन्ही देशातल्या राष्ट्राध्यक्षांमधल्या या सार्वजनिक संवादाने चीन आणि उत्तर कोरिया यांच्यातले घनिष्ठ संबंध अधोरेखित केले आहेत. अमेरिकेने वेळोवेळी दिलेली मदतीची ऑफर स्वीकारण्यात उत्तर कोरियाने दिरंगाई केली आहे. वॉशिंग्टनसोबतची शांतता चर्चाही थांबली आहे. अशावेळी उत्तर कोरियाने चीनने देऊ केलेली मदत स्वीकारली तर गरजेच्यावेळी धावून येणारा खरा मित्र आपणच असल्याचं दाखवून देण्यात चीनला यश येणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)