You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किम जाँग-उन 20 दिवसांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन हे तब्बल 20 दिवसांनंतर सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. उत्तर कोरियातील माध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केलंय.
उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था KCNA नुसार, किम जाँग-उन यांनी एका रासायनिक खतांच्या कारखान्याचं उद्घाटन केलं. यावेळी उपस्थितांनी जयघोषात किम यांचं स्वागत केलं. ते बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक व्यासपीठावर दिसले.
उत्तर कोरियातल्या वृत्तसंस्थेकडून आलेल्या वृत्ताला इतर ठिकाणाहून अद्याप दुजोरा मिळालेलं नाहीय. मात्र, या वृत्तसंस्थेनं किम जाँग-उन यांचा उद्घाटन कार्यक्रमातील फोटोही प्रसिद्ध केलाय.
उत्तर कोरियनं वृत्तसंस्थेनं नेमकं काय म्हटलंय?
कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी अर्थात KCNA नं सांगितलं की, किम जाँग-उन हे त्यांची बहीण किम यो जाँग आणि उत्तर कोरियातील इतर वरिष्ठ नेत्यांसोबत कार्यक्रमाला हजर होते.
प्याँगयाँगमधील रासायनिक खतांच्या कारखान्याच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता.
यावेळी किम यांनी छोटेखानी भाषण केलं आणि कारखान्याच्या माध्यमातून देशाच्या विकासात कशी भर घातली जातेय, याबाबत मत मांडलं. उत्तर कोरियातल्या रासायनिक उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचं कौतुकही त्यांनी यावेळी केलं, असं KCNA नं आपल्या वृत्तात म्हटलंय.
किम जाँग-उन यांच्याबद्दलच्या चर्चांना उधाण का आलेलं?
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. मात्र यासंदर्भात अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. आताही वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ते सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिल्याचं जगभरात कळलं आहे. मात्र, उत्तर कोरियाच्या प्रशासनाकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयीच्या उलटसुलट बातम्यांचं मात्र दक्षिण कोरियाच्या प्रशासनानं खंडन केलं होतं.
36 वर्षीय किम जाँग-उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे कुठलेही विशिष्ट संकेत उत्तर कोरियाकडून मिळाले नसल्याचं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान चीनने आपलं एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला रवाना केलं होतं. किम यांची प्रकृती चांगली नसल्याने हे पथक पाठवण्यात आल्याची चर्चा होती.
यापूर्वीही अफवा
किम आजारी असल्याच्या अफवा यापूर्वी अनेकदा पसरल्या होत्या.
15 एप्रिल रोजी किम जाँग-उन यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने उत्तर कोरियात दरवर्षी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला फार महत्त्व असतं.
किम जाँग-उन आजवर कधीही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार नाहीत, या तर्कावरून पुढे ते आजारी असावेत, असे अंदाज वर्तवले गेले.
किम जाँग-उन प्रसारमाध्यमांमध्ये शेवटचे दिसले होते ते 12 एप्रिल रोजी. त्याच दिवशी प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेल्या काही बातम्यांनुसार किम यांनी 11 एप्रिल रोजी एक महत्त्वाची राजकीय बैठकही बोलावली होती. मात्र, त्यानंतर ते कुठे आहेत, काय करत आहेत, याबाद्दल कुणालाच माहिती नाही.
गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. अशा चाचण्यांना किम जाँग-उन सहसा उपस्थित राहतात. मात्र गेल्या आठवड्यात घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवेळी ते उपस्थित होते की नाही, याबाद्दल तिथल्या प्रसार माध्यमांनीही काहीही सांगितलेलं नाही.
उत्तर कोरियातून कुठलीही खात्रीशीर बातमी मिळवणं एरवीही अवघड असतं. आता तर कोव्हिड-19 मुळे उत्तर कोरियाने सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे तिथून बातमी मिळवणं पूर्वीपेक्षा जास्त कठीण झालं आहे.
आजारी असल्याचं पहिलं वृत्त
उत्तर कोरियाच्या 'डेली NK' नावाच्या वेबसाईटने सर्वप्रथम हे वृत्त दिलं. किम जाँग-उन यांना गेल्या ऑगस्टपासूनच हृदयाच्या आजाराने ग्रासलं आहे. मात्र पाएक्तू पर्वतावर वारंवार गेल्याने आजार अधिकच बळावल्याचं वृत्त अज्ञात सूत्राच्या हवाल्याने या वेबसाईटने प्रकाशित केलं आहे.
आणि मग याच एकमेव बातमीच्या आधाराने आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये हे वृत्त प्रसारित झालं. वृत्तसंस्थांनीही त्या वेबसाईटने केलेल्या दाव्यावरून बातम्या दिल्या. पुढे दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था आणि अमेरिका उत्तर कोरियावर लक्ष ठेवून असल्याच्या बातम्याही आल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)