You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किम जाँग-उन आहेत तरी कुठे?; चर्चांना उधाण
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट बातम्या येत आहेत मात्र यासंदर्भात अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.
दक्षिण कोरियाच्या प्रशासनानेही या वृत्ताचं खंडन केलं आहे. 36 वर्षीय किम जाँग-उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे कुठलेही विशिष्ट संकेत उत्तर कोरियाकडून मिळाले नसल्याचं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान चीनने आपलं एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला रवाना केलं आहे. किम यांची प्रकृती चांगली नसल्याने हे पथक पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.
वॉशिंग्टनस्थित उत्तर कोरिया मॉनिटरिंग प्रोजेक्टनं एका सॅटेलाईट इमेजची समीक्षा करत म्हटलं आहे की, उत्तर कोरियामधील रिसॉर्ट टाऊन वोनसनमध्ये एक ट्रेन उभी आहे, जी किम जाँग-उन वापरत असलेली ट्रेन असण्याची शक्यता आहे. 21 एप्रिलला ही ट्रेन वोनसनमधील लीडरशीप स्टेशनवर पार्क करण्यात आली होती, असंही मॉनिटरिंग प्रोजेक्ट 38 नॉर्थचं म्हणणं आहे.हे स्टेशन किम यांच्या कुटुंबीयांसाठी राखीव असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासंबंधीचा रिपोर्ट रॉयटर्समध्ये छापून आला आहे. मात्र मॉनिटरिंग ग्रुपच्या रिपोर्टची रॉयटर्सनं स्वतंत्रपणे पुष्टी केली नाही.रिपोर्टमध्ये म्हटलंय की, ट्रेनच्या उपस्थितीमुळे हे समजू शकलेलं नाही की, "किम जाँग-उन कुठे आहेत, तसंच त्यांच्या तब्येतीविषयीची माहितीही समजू शकलेली नाही. पण, ते देशातल्या विशेष अशा पूर्वेकडच्या भागात असल्याचं दिसून येतं."
दक्षिण कोरियाची राजधानी सोलस्थित न्यूज वेबसाईट डेली एनकेच्या एक रिपोर्टनुसार, किम हे प्याँगयाँगच्या उत्तरेकडील रिसॉर्ट काउंटी ऑफ ह्यागसनमध्ये उपचार घेत आहे. त्यांनी एका अनामिक सूत्राच्या आधारे ही बातमी दिली आहे. दक्षिण कोरियामधील वृत्त संस्था न्यूजइजच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी किम वोनसममध्ये असण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही अफवा
किम आजारी असल्याच्या अफवा यापूर्वी अनेकदा पसरल्या होत्या.
15 एप्रिल रोजी किम जाँग-उन यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने उत्तर कोरियात दरवर्षी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला फार महत्त्व असतं.
किम जाँग-उन आजवर कधीही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार नाहीत, या तर्कावरून पुढे ते आजारी असावेत, असे अंदाज वर्तवले गेले.
किम जाँग-उन प्रसार माध्यमांमध्ये शेवटचे दिसले होते ते 12 एप्रिल रोजी. त्याच दिवशी प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेल्या काही बातम्यांनुसार किम यांनी 11 एप्रिल रोजी एक महत्त्वाची राजकीय बैठकही बोलावली होती. मात्र त्यानंतर ते कुठे आहेत, काय करत आहेत, याबाद्दल कुणालाची काहीही माहिती नाही.
गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. अशा चाचण्यांना किम जाँग-उन सहसा उपस्थित राहतात. मात्र गेल्या आठवड्यात घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवेळी ते उपस्थित होते की नाही, याबाद्दल तिथल्या प्रसार माध्यमांनीही काहीही सांगितलेलं नाही.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
उत्तर कोरियातून कुठलीही खात्रीशीर बातमी मिळवणं एरवीही अवघड असतं. आता तर कोव्हिड-19 मुळे उत्तर कोरियाने सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे तिथून बातमी मिळवणं पूर्वीपेक्षा जास्त कठीण झालं आहे.
आजारी असल्याचं पहिलं वृत्त
उत्तर कोरियाच्या 'डेली NK' नावाच्या वेबसाईटने सर्वप्रथम हे वृत्त दिलं. किम जाँग-उन यांना गेल्या ऑगस्टपासूनच हृदयाच्या आजाराने ग्रासलं आहे. मात्र पाएक्तू पर्वतावर वारंवार गेल्याने आजार अधिकच बळावल्याचं वृत्त अज्ञात सूत्राच्या हवाल्याने या वेबसाईटने प्रकाशित केलं आहे.
आणि मग याच एकमेव बातमीच्या आधाराने आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये हे वृत्त प्रसारित झालं. वृत्तसंस्थांनीही त्या वेबसाईटने केलेल्या दाव्यावरून बातम्या दिल्या. पुढे दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था आणि अमेरिका उत्तर कोरियावर लक्ष ठेवून असल्याच्या बातम्याही आल्या.
बेपत्ता असण्याची पहिलीच वेळ नाही
12 एप्रिलपासून किम जाँग-उन यांचा ठावठिकाणा कुणालाही माहिती नसला तरीही, असं होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2014 साली ते असेच 40 दिवस बेपत्ता होते. त्यावेळी अनेक अफवा पसरल्या होत्या. राजकीय विरोधकांनी उठाव करत त्यांना पायउतार केल्याच्याही बातम्या आल्या.
मात्र 40 दिवसांनंतर काठीचा आधार घेऊन उभे असलेले किम जाँग-उन यांचा फोटो छापून आला. शारीरिक त्रास असल्याने ते इतके दिवस कुणासमोरही आले नसल्याचं प्रसार माध्यमांनी सांगितलं.
किम यांचा उत्तराधिकारी कोण?
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयीही चर्चा सुरू झाली आहे. याविषयी आघाडीवर असलेलं नाव आहे किम यो-जाँग.
किम यो-जाँग या किम जाँग-उन यांची बहीण आहे.
यो-जाँग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1987 रोजी झाला. किम जाँग-उन यांच्यापेक्षा त्या चार वर्षांनी लहान आहेत.
लोकांशी प्रेमपूर्वक बोलणाऱ्या यो जाँग मितभाषी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात 'टॉम बॉय'ची प्रतिमा दिसत असल्याचंही बोललं जातं.
सन 1996 ते 2000 दरम्यान त्यांनी स्वित्झर्लंडच्या बर्न या शहरात शिक्षण घेतलं.
राजकीय सल्लागार
2014 सालापासून त्या पक्षाच्या प्रचार प्रमुख म्हणून किम जाँग-उन यांची प्रतिमा चांगली राखण्याचं काम करत होत्या.
मात्र काही महिन्यांपूर्वी किम यांनी त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली. त्यांना पॉलिट ब्यूरोची सदस्य बनवलं. या पॉलिट ब्यूरोच्या माध्यमातूनच किम जाँग-उन मोठे निर्णय घेतात.
त्या किम जाँग-उन यांच्या राजकीय सल्लागार म्हणूनही काम पाहतात. तसंच भाऊ किम यांची प्रचार यात्रा आणि त्यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या पुरवठ्याकडे त्या बारकाईने लक्ष देतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)