कोरोना लस : इस्रायली संशोधकांना कोरोनावरील उपाय शोधण्यात यश?

कोरोना विषाणूचा बीमोड करण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. कोरोनावर लस तयार करण्याचे तसंच औषध शोधून काढण्याचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. इस्रायलने कोरोना विषाणूचा नायनाट करेल अशा अँटीबॉडी विकसित केल्याचा दावा केला आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी केलेल्या दाव्यानुसार, देशातील प्रमुख बायोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूविरुद्धच्या अँटीबॉडी विकसित करण्यात यश मिळवलं आहे. अँटीबॉडी विषाणूवर आक्रमण करतात आणि त्यांना शरीरात निष्क्रिय करतात, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

संरक्षणमंत्र्यांच्या मते, अँटीबॉडी विकसित करण्याचं काम पूर्ण झालं होतं. ही संघटना आता पेटंट अर्थात स्वामित्व मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. ते मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन घेतलं जाईल.

मंगळवारी इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्वीटर हँडलवरून यासंदर्भात तीन ट्वीट करण्यात आले.

IIBR संघटनेने अतिशय महत्वपूर्ण अशा शास्त्रीय संशोधनात यश मिळवलं आहे. या संघटनेनं कोरोना विषाणूला निष्क्रिय करतील अशा अँटीबॉडी तयार केल्या आहेत, असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, की प्रमुख मापदंड - 1. अँटीबॉडी मोनोक्लोनल, नवीन आणि शुद्ध आहेत. हानीकारक प्रथिनांची संख्या कमी आहे. 2. अँटीबॉडी कोरोना विषाणूचा प्रभाव संपुष्टात आणू शकतात. 3.जीवघेण्या अशा कोरोना विषाणूंविरोधात या अँटीबॉडींची चाचणी घेण्यात आली.

मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणजे काय?

अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणजे एकप्रकारचं प्रथिन असतं जे प्रयोगशाळेत तयार केलं जातं. रुग्णाच्या शरीरातील विषाणूच्या पेशींना जाऊन ते चिकटतं.

अनेक प्रकारच्या मोनोक्लोनल अँटीबॉडी असतात. त्यांचा उपयोग कॅन्सर रुग्णांवरील उपचारांमध्ये केला जातो.

दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील मेडिसन विभागाचे व्हाईस चेअरमन डॉ. अतुल कक्कड सांगतात की, मोनोक्लोनल अँटीबॉडी नवीन नाही. कॅन्सर, शरीरातील गाठी तसंच इन्फेक्शन दूर करण्यासाठी यांचा उपयोग होतो.

मोनोक्लोनल अँटीबॉडी रेडिमेट असतात. याच्या नावातच मोनो म्हणजे एक आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी एका लक्ष्याप्रमाणे काम करतं.

कसं काम करतं?

डॉ. अतुल यांच्या मते आपलं शरीर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी शरीर अनेक पद्धतीने काम करतं. शरीर स्वत: इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी बनवतं, जे प्लाझ्मा पेशी बनवतं.

मोनोक्लोनल अँटीबॉडी इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडीप्रमाणेच असतं म्हणून नावात 'क्लोन' आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीचं लक्ष्य इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडीच्या आत एका ठिकाणी असतं. मोनोक्लोनल अँटीबॉडी विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशीवर जाऊन चिकटतं आणि त्याला निष्प्रभ करतं.

मोनोक्लोनल अँटीबॉडी कसं बनवलं जातं?

डॉ. अतुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीच्या पेशींची आवश्यकता असते त्या सुरुवातीला उंदरांमध्ये इंजेक्ट केल्या जातात. त्या प्राण्याला प्रयोगशाळेत आणलं जातं.

यकृताला लागून प्लीहा हा अवयव असतो. प्राण्यांमध्ये या ठिकाणी अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडी आणि प्लीहामधील पेशी यांना एकत्र करण्यासाठी हायब्रडोमा तयार होतो. हे अँटीबॉडीच बनवतं. हे काढून माणसांच्या शरीरात सोडलं जातं.

इस्रायलच्या परीक्षणानंतरच कोरोना विषाणूचा बीमोड करण्यात हे किती परिणामकारक आहे हे समजू शकेल. जोपर्यंत यासंदर्भातलं संशोधन प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काहीही ठोस भाष्य करू शकत नाही.

इस्रायलमधील पत्रकार हरेंद्र मिश्रा यांच्या मते, शास्त्रज्ञांनी शरीरातील अशा प्रथिनांचा शोध लावला आहे जे विषाणूचा नायनाट करू शकेल. लवकरच या संघटनेद्वारे या संशोधनातील तपशीलाविषयी पेपर प्रसिद्ध करण्यात येईल. तूर्तास या अँटीबॉडीबाबत अधिक तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. माणसांवर याचे प्रयोग करण्यात आले आहेत का याविषयी सांगण्यात आलेलं नाही.

हरेंद्र मिश्रा यांना मिळालेल्या माहितीनुसार, IIRBने काही क्लिनिकल ट्रायल घेतल्या आहेत.

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वतः पाहिली अँटीबॉडी

संरक्षण मंत्री बेनेट यांनी IIBR लॅबला भेट दिली आणि कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणारी एक लस बनविण्याचा आदेश दिला.

संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार संरक्षण मंत्र्यांना लॅबमध्ये ती अँटीबॉडी दाखविण्यात आली. ही अँटीबॉडी विषाणुवर मोनोक्लोनल पद्धतीनं हल्ला चढवते आणि आजारी व्यक्तिच्या शरीरातला विषाणुचा प्रादूर्भाव नष्ट करते.

या अँटीबॉडी विकसित करण्याचं काम पूर्ण झालं असून IIBR या संशोधनाचं पेटंट घेण्याची तयारी करत असल्याचंही संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. या अँटीबॉडीजचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन करता यावं, यासाठी संशोधक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संवाद साधतील.

संरक्षण मंत्री बेनेट यांनी सांगितलं, की या यशाबद्दल मला IIBR च्या कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या सर्जनशीलतेनेच हा महत्त्वपूर्ण शोध लागला आहे.

या वर्षी इस्रायली वर्तमानपत्र Ha'aretz नं काही वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्यानं बातमी देताना म्हटलं होतं, की IIBR च्या वैज्ञानिकांना व्हायरसचं जैविक तंत्र आणि गुण समजून घेण्यात यश मिळालं आहे.

IIBR ची स्थापना 1952 साली इस्रायल डिफेन्स फोर्सेस सायन्स कॉर्पसचा एक भाग म्हणून झाली होती. त्यानंतर ती एक नागरी संस्था बनली. ही संस्था इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित येते, मात्र संरक्षण मंत्रालयासोबत काम करते.

ही एक जगप्रसिद्ध संशोधन संस्था आहे. यामध्ये 50 हून अधिक अनुभवी वैज्ञानिक काम करतात.

मोनोक्लोनल अँटीबॉडीचे संभाव्य साइड इफेक्टस

अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार मोनोक्लोनल अँटीबॉडीचे काही साइड इफेक्टही असू शकतात. वेगवेगळ्या लोकांवर याचे परिणाम वेगळे दिसू शकतात. ज्याच्यावर उपचार सुरू आहेत त्या रुग्णाचं आरोग्य, आजाराचं गांभीर्य आणि कोणत्या अँटीबॉडीचा किती डोस दिला गेला आहे, यावर हे परिणाम अवलंबून असतात.

इन्युनोथेरपीप्रमाणेच मोनोक्लोनल अँटीबॉडी दिल्यानंतर त्वचेच्या निवडक जागेवर रॅशेस येऊ शकतात किंवा फ्लूसारखी लक्षणंही दिसून येतात. पण हे अतिशय सौम्य साइड-इफेक्टस आहेत. याचे गंभीर साइड इफेक्ट्स म्हणजे त्वचा आणि चेहऱ्यावर फोड येणं, ज्यामुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. यामुळे हृदय विकाराचा झटकाही येऊ शकतो किंवा फुफ्फुसांचा गंभीर आजार होऊ शकतो.

अर्थात, फार कमी वेळा इतके गंभीर परिणाम होतात, की त्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यूच होईल. अशा परिस्थितीत कॅपिलरी लीक सिंड्रोम होऊ शकतो. यामध्ये छोट्या रक्तवाहिन्यांमधील द्रव पदार्थ आणि प्रोटीन लीक होऊन आजूबाजूच्या ऊतींमध्ये पसरतो. त्यामुळे रक्तदाब प्रचंड कमी होतो. कॅपिलरी लीक सिंड्रोममुळे मल्टीपल ऑर्गन फेल्युअरचाही धोका असतो.

अशा प्रकारची लस विकसित करण्यासाठी प्राण्यांवरील प्री-क्लीनिकल ट्रायलही दीर्घकाळ चालते. त्यानंतर क्लीनिकल ट्रायल होते. त्याच दरम्यान, साइड-इफेक्टचाही अंदाज येतो आणि वेगवेगळ्या लोकांवर औषधाचा काय परिणाम होतो, हे पण स्पष्ट होतं.

फेब्रुवारीमध्ये न्यूज पोर्टल वायनेटनं एक लेख छापला होता. जपान, इटली आणि दुसऱ्या देशातून व्हायरसचं सँपल घेऊन पाच शिपमेंट इस्रायलला पोहोचल्याचं या लेखात म्हटलं होतं. याचा अर्थ तेव्हापासून इस्रायल लस बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जगभरातील संशोधक कोव्हिड-19 वरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक सरकारी आणि प्रायव्हेट संस्थांनी कोव्हिड-19 वर इलाज शोधल्याचा दावाही केला आहे. मात्र अजूनही कोणत्या संशोधनाला मान्यता मिळाली नाहीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)