कोरोना लॉकडाऊन : ST ची राज्यभरात अडकलेल्या लोकांसाठी सेवा, 10 हजार गाड्या धावणार

महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, मजूर आणि इतरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी गुरुवारपासून (7 मे) महाराष्ट्र राज्या महामंडळाच्या बसेस धावतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

"एसटीच्या तब्बल 10 हजार बसेसच्या मार्फत राज्यभरामध्ये लोकांना त्यांच्या गावी वा तालुक्याला मोफत सोडलं जाईल. यासाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन विभाग करणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा मोफत असेल," असं वडेट्टीवार म्हणाले.

"परराज्यातले मजूर पाठवण्यासाठी जशा याद्या तयार केल्या तशाच पद्धतीनं जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेल्या लोकांच्या याद्या तयार करण्यात येतील, तसंच एक पोर्टल त्यासाठी तयार करण्यात येईल," अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

या प्रक्रियेला 7 मेपासून सुरुवात होणार असून, त्यासाठीची आखणी आणि तयारी सध्या सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय. कोरोनासाठीच्या सगळ्या नियमांचं पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाईल.

राज्याच्या विविध भागात अडकलेले मजूर, प्रवासी, यात्रेकरू, विद्यार्थी, नोकरीनिमित्त वेगळ्या गावी असणारे, नातेवाईकांकडे अडकून पडलेले अशा सगळ्यांना या सेवेचा लाभ मोफत घेता येणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

याविषयी सांगताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, "मदत-पुनर्वसन खात्याच्या माध्यमातून एसटीचा खर्च देण्यात येईल. परिवहन मंत्र्यांनी बसेस देण्यासाठी सहमती दर्शवली आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या गावात वा जिल्ह्यांमध्ये लोक अडकलेले आहेत, त्यांना स्वगावी सोडण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे.

"जवळपास 20 कोटीहून अधिक खर्च यासाठी अपेक्षित आहे. जवळपास 10,000 बसेसची तयारी ठेवून लोकांना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होईल," असं ते म्हणाले.

यासाठीची व्यवस्था आणि प्लानिंगचं काम चालू झालेलं आहे. सर्व प्रवासी, विद्यार्थी, मजुरांना आणि इतरांना 10 हजार मोफत बसेसच्या माध्यमातून पुढच्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पण या प्रवासासाठी नोंदणी कधी वा कुठे करायची, चाचण्या होणार असल्यास त्या कुठे करायच्या याविषयीची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)