You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: खासगी डॉक्टरांना किमान 15 दिवसांसाठी कोव्हिड-19 वॉर्डात सेवा अनिवार्य
- Author, मयांक भागवत
- Role, मुक्त पत्रकार
मुंबईत कोव्हिड-19 ची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या 10 हजाराजवळ पोहोचली आहे.
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या संख्येने डॉक्टरांची गरज भासणार आहे.
राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांनी 15 दिवस सरकारी आणि महापालिका रुग्णालयाला कोव्हिड-19 रुग्णांची सेवा करावी असा आदेश जारी केला आहे. 55 वर्षाखालील डॉक्टरांना यात सेवा बंधनकारक करण्यात आली आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी हे आदेश जारी केले आहेत.
काय आहे सरकारचा आदेश?
15 दिवस कोव्हिड-19 रुग्णालयात सेवा बंधनकारक डॉक्टरांनी त्यांना काम करण्याच्या ठिकाणाची माहिती द्यावी आदेश न पाळल्यास मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या कोडचं उल्लंघन मानलं जाईल. एपिडेमिक कायद्यांतर्गत डॉक्टरांवर कारवाई होऊन लायसन्स रद्द होऊ शकतं.
याबाबत बीबीसीशी बोलताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, "55 वर्षाखालील आणि जुने आजार (मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग) नसलेल्या डॉक्टरांनी कोव्हिड रुग्णालयात सेवा द्यावी यासाठी पत्र जारी करण्यात आलं आहे.
डॉक्टरांना 15 दिवस सरकारी किंवा मुंबई महापालिका रुग्णालयात सेवा द्यावी लागेल. बुधवारपासून (आजपासून) खासगी डॉक्टर स्वत: पुढे येवून कोव्हिड-19 रुग्णालयात सेवा देवू शकतात.
"डॉक्टर हा सेवाभावी असतो. सद्यस्थितीत मुंबईत अनेक खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंद आहेत. क्लिनिक लहान असल्याने डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले नाहीत. सरकारी रुग्णालयात काम केल्यास डॉक्टरांना पगारही देण्यात येईल. कोव्हिड-19 रुग्णालयात पीपीई किट्स आणि इतर सर्व गोष्टी डॉक्टरांना पुरवण्यात येतील," असंही डॉ. लहाने पुढे म्हणाले.
मुंबईत पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय टीम ने कोरोनाबाधितांची संख्या 75 हजारावर पोहोचू शकते असा अंदाज वर्तवला होता. मुंबई महापालिकेने त्या दृष्टीने तयारी करण्यास सुरूवात केली आहे. खासगी डॉक्टरांना बंधनकारक करण्यात येणारी सेवा ही याच उपाय योजनांचा भाग मानली जात आहे. खासगी डॉक्टरांना सरकारचं पत्र महाराष्ट्र मेडिकल काउंसिलतर्फे पाठवण्यात आलं आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, "आम्हाला सरकारकडून 4 मे ला हे पत्र आलं आहे. आम्ही, हे पत्र मंगळवारी मुंबई परिसरातील 25,000 खासगी डॉक्टरांना आम्ही पाठवलं आहे" का देण्यात आलं खासगी डॉक्टरांना पत्र या पत्रात नमुद केल्यानुसार, मुंबई शहरात कोव्हिड-19 चा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे राज्य सरकारने यावर आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत.
डॉक्टरांनी वेगळी सेवा देण्याची गरज काय?
खासगी डॉक्टर आपल्या रुग्णालयात सेवा देतच आहेत तेव्हा त्यांनी वेगळी सेवा देण्याची गरज काय असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्टृचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विचारला आहे.
ते म्हणतात "खासगी डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत आहेत. रुग्णालयात काम करत आहेत. कोव्हिड-19 ड्युटी करत आहेत. अशांनी आपलं काम सोडून कोव्हिड रुग्णालयात काम करावं का? याबाबत स्पष्टता नाही." "आयएमएच्या अनेक डॉक्टरांना हे पत्र मिळालेलं नाही. हे पत्र अॅलोपॅथीसोबत इतर पॅथीच्या डॉक्टरांसाठीही असेल अशी आमची अपेक्षा आहे." "पुण्यात 50 खासगी डॉक्टरांच्या तीन बॅचेस नायडू रूग्णालयात सेवा देत आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)