You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: मुंबईसाठी संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील बेड्स मिळणार- राजेश टोपे
मुंबईसाठी संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी (6 मे) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोना उपाययोजनांचा आढवा घेतला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. महाराष्ट्रातील रेड झोन मधील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त देखील यावेळी सहभागी झाले होते.
जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत मात्र ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना रेल्वेने खास तयार केलेल्या रेल्वे डब्यातील विलगीकरण कक्षात ठेवले जाण्याबाबत यावेळी चर्चा झाली. गरज भासल्यास त्याचा वापर करावा या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली जाईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत जो प्रोटोकॉल आहे तो बदलण्याचा विचार ICMRच्या स्तरावर सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. कोरोना सोबतच अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत यासाठी राज्यात प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढतच असल्यामुळे लॉकडाऊन 3.0 मध्ये शिथील करण्यात आलेल्या अटी प्रशासनाने पुन्हा कडक केल्या आहेत. चाचण्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढतेय, असं सरकारतर्फे सांगितलं जात आहे.
या रुग्णांसाठी अधिकाधिक ICU बेड्स उपलब्ध व्हावेत, म्हणून राज्य सरकारने आता रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीतील इतर रुग्णालयांकडे मदतीची मागणी केली होती.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं.
देशात सध्या कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे, आणि महाराष्ट्रातील सुमारे 75 टक्के रुग्ण हे मुंबई महानगर भागात आहेत. 5 मेच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 लाख 82 हजार 884 नमुन्यांपैकी 1 लाख 67 हजार 205 जणांचे नमुने निगेटव्ह आले आहेत, तर 15,525 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महाराष्ट्राचं प्रतिदशलक्ष चाचणीचं प्रमाण इतर राज्यांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपल्याकडे रुग्णच नव्हे तर बरे होणाऱ्यांचं प्रमाणही सर्वाधिक आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
"मुंबईमध्ये सर्वांत मोठा प्रश्न आहे की आमच्याकडे डॉक्टर्स आणि क्रिटिकल बेड्स कमी पडत आहेत. मुंबईत 15 हजार खासगी डॉक्टर आपापले क्लिनिक आणि हॉस्पिटल बंद करून घरी बसले आहेत. आम्ही त्यांना आवाहन करतोय की, तुम्ही तुमच्या सेवा सुरू करा नाहीतर शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व्हिस करा," असंही टोपे यांनी सांगितलं.
"आमची अपेक्षा आहे की मुंबईमध्ये लष्कराचे वेगवेगळे स्टेशन्स आहेत, त्यांचे स्वतंत्र हॉस्पिटल्स आहेत, ते त्यांनी राज्य सरकारला उपलब्ध करून दिले पाहिजेत," असंही टोपे यांनी सांगितलं.
राज्यातील, विशेषतं मुंबई महानगर क्षेत्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विलगीकरणाची पुरेशी व्यवस्था व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
"पण केंद्र सरकारने म्हटलंय की तुम्ही लष्कराची ठिकाणं हा शेवटचा पर्याय ठेवा. मात्र रेलवेच्या अख्त्यारित ज्या आरोग्य सुविधा केंद्र येतात, त्यांच्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतला आहे आणि म्हटलंय की ते लगेचच महाराष्ट्र सरकारकडे सोपवण्यात यावे," असंही टोपे म्हणाले.
मुंबईत कुठेकुठे व्यवस्था
मे महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता केंद्र शासनाने व्यक्त केल्यानंतर, राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये आयसोलेशन आणि ICU बेड्सचं मोठ्या प्रमाणावर नियोजन केलं आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रुग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकुल आदि ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केल्या आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं.
4 मेपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्यानंतर आता इतर राज्यांमधून नागरिक महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आहे, तसेच परदेशांतूनदेखील भारतीयांना आणण्याची प्रक्रिया 7 मेपासून सुरू होणार आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)