You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका गोळीबार: 'एका लसणाच्या खाद्योत्सवात कुणी का गोळ्या झाडेल?'
कॅलिफोर्नियामधील एका फूड फेस्टिव्हलमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत.
हा गोळीबार करणाऱ्या एकाला पोलिसांनी ठार केलं असून आणखी एखादी बंदुकधारी व्यक्ती इथे आहे का, याबद्दल खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.
कॅलिफोर्नियमधला गिलरॉय गार्लिक फेस्टिव्हल (लसूण महोत्सव) रविवार संध्याकाळी संपत असतानाच इथे गोळीबार करण्यात आला.
"पस्तीशीच्या आसपासच्या एका गोऱ्या माणसाने रायफलच्या फैरी झाडल्या," असं तिथे हजर असणाऱ्या जुलिस्सा काँट्रेरस यांनी NBCला सांगितलं.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सॅन होजेच्या 48 किलोमीटर दक्षिणेला सुरू असलेल्या या फूड फेस्टिव्हलच्या जागेपासून लोक दूर पळताना दिसत आहेत.
या व्हिडिओत एक महिला "काय चाललंय कळेना! अशा लसूण महोत्सवात कुणी का गोळीबार करेल?" असं विचारताना ऐकू येतेय. या ठिकाणी अजूनही घडामोडी घडत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
"हे फार भयंकर आहे " कॅलिफोर्नियाचे गर्व्हनर गेव्हिन न्यूसम यांनी ट्वीट केलंय.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही याविषयी ट्वीट करत लोकांना 'काळजी घेण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं' आवाहन केलं आहे.
यामध्ये तीन जण ठार झाल्याची माहिती गिलरॉयचे सिटी काऊन्सिलर डायन ब्राको यांनी अमेरिकन मीडियाला दिली.
तर 11 जखमींवर उपचार करण्यात येत असून त्यातल्या काहींची तब्येत गंभीर असल्याचं सँटा क्लारा व्हॅली पब्लिक हेल्थ सिस्टीमच्या प्रवक्यांनी सांगितलं.
CBSन्यूजने दिलेल्या माहितीनुसार सँटा क्लारा काऊंटी मेडिकल सेंटरमध्ये आतापर्यंत 5 जणांना दाखल करण्यात आलं आहे. तर दोन जणांवर स्टँनफर्ड विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचं CNNने म्हटलंय.
...आणि लोक सैरावैरा पळू लागले
या खाद्यमहोत्सवामध्ये हॅट् विकणाऱ्या 72 वर्षांच्या मायकल पाझ यांनी सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलला सांगितलं की त्यांनी रॅपिड फायर असॉल्ट रायफलने गोळीबार करणाऱ्या या हल्लेखोराला पाहिलं.
"तो गोळीबार करण्याच्या तयारीनेच आला होता कारण त्याने संरक्षक जॅकेट घातलं होतं. कुठलाही नेम न धरता तो इतस्ततः गोळीबार करत होता."
पोलिसांनी या हल्लेखोरावर चाल करत गोळ्या झाडल्यावर या फेस्टिव्हलसाठी आलेल्या लोकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जमिनीवर लोळण घेतल्याचं मायकल पाझ सांगतात.
"जोरदार गोळीबार होत होता. त्याला चहुबाजूंना फैरी झाडताना मी पाहिलं. तो कुणावरही नेम धरून गोळ्या झाडत नव्हता," जुलिस्सा काँट्रेरस यांनी NBC बे एरियाशी बोलताना सांगितलं. "तो आधी डावीकडून उजवीकडे गोळ्या झाडायचा, मग उजवीकडून डावीकडे. तो जे काही करत होता, ते करायच्या तयारीने आलेला होता."
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा गोळीबार झाल्यावर गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा पळू लागले. 13 वर्षांची इव्हिनी रियस त्या लोकांमध्येच होती.
"आम्ही निघतच होतो तेवढ्यात पायाला बंडाना बांधलेला एका माणूस आम्ही पाहिला. त्याला पायाला तिथे गोळी लागली होती," सॅन होजे मर्क्युरी न्यूजशी बोलताना तिने सांगितलं.
द गिलरॉय गार्लिक फेस्टिव्हल हा वार्षिक खाद्योत्सव 1979पासून आयोजित केला जातोय. जिथे हा खाद्योत्सव होतो, त्या ख्रिसमस हिल पार्कमध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्र आणण्यास बंदी असल्याचं या फेस्टिव्हलच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)