You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुख्यात ड्रग माफिया अल चॅपोच्या मुलाचं अमेरिकेकडे प्रत्यार्पण
अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली कुख्यात ड्रग माफिया अल चॅपो याच्या मुलाचं अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आलं आहे, अशी माहिती अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी दिली.
ड्रग माफिया अल चॅपो याचा मुलगा ओव्हिडिओ गुझमन-लोपेझ त्याच्या भावासह वडिलांनी स्थापन केलेल्या 'सिनालोआ ड्रग कार्टेल' या संघटनेचं नेतृत्व करत असल्याचा संशय आहे.
ओव्हिडिओवर एका गायकाच्या हत्येचा आदेश दिल्याचाही आरोप आहे. या गायकाडनं त्याच्या लग्नात सादरीकरण करण्यास नकार दिला होता.
ओव्हिडिओला जानेवारीमध्ये मेक्सिकोच्या उत्तरेकडील सिनालोआ राज्यात अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो कोठडीत आहे. त्याला अमेरिकेत नेण्यात मदत केल्याबद्दल गारलँड यांनी मेक्सिकन सरकारचे आभार मानले.
मेक्सिकन अधिकार्यांनी प्रत्यार्पणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सिनालोआ कार्टेलचं नेतृत्व केल्याबद्दल ड्रग्ज माफिया अल चॅपो हा सध्या कोलोरॅडोमधील सुपरमॅक्स तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
हिसांचारानंतर ओव्हिडिओची सुटका आणि पुन्हा अटक
ओव्हिडिओला याला 'द माऊस' म्हणूनही ओळखलं जातं. त्याच्यावर सहा महिन्यांची पाळत ठेवून, एका कारवाई दरम्यान कुलियाकन शहराबाहेर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गोळीबारात 29 लोक मरण पावले होते आणि त्याच्या कार्टेलच्या सदस्यांनी पोलीस बंदोबस्त शहरात पोहोचू नये म्हणून शहरातील रस्ते रोखण्यासाठी बस आणि कार जाळल्या होत्या.
ओव्हिडिओला हेलिकॉप्टरनं मेक्सिको सिटीला नेण्यात आलं. कारण प्रशासनाला भीती होती की, त्याला रस्ते मार्गानं नेलं तर त्याचे हिटमॅन ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याची भीती होती.
'द माऊस'
गुझमन-लोपेझला 'द माऊस' या टोपणनावानं ओळखलं जातं. त्यानं त्याच्या वडिलांच्या कुख्यात सिनालोआ कार्टेल या ड्रग तस्करी गटाचं नेतृत्व केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, असं संरक्षण मंत्री लुईस क्रेसेन्सियो सँडोव्हल यांनी सांगितलं. सिनालोआ कार्टेल ही जगातील सर्वांत मोठ्या ड्रग ट्रॅफिकिंग संघटनांपैकी एक आहे.
2019 मध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर 'एल चापो' गुझमन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मेक्सिकोचे ड्रग कार्टेल कसं चालतात याचे काही क्रूर तपशील त्याच्या चौकशीत उघड झाले आहेत.
गुझमन-लोपेझला पकडण्यासाठी सहा महिने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. या ऑपरेशनला अमेरिकन अधिकार्यांचा पाठिंबा होता, असं संरक्षण मंत्री सँडोव्हल यांनी सांगितलं.
सोशल मीडियावरील व्हीडिओंमध्ये कुलियाकानमध्ये रस्त्यावर जाळणाऱ्या बसेस दिसत आहेत.
कुलियाकानपासून मेक्सिको सिटीला जाण्यासाठी नियोजित आणि टेक ऑफच्या तयारीत असलेल्या विमानाच्या फ्युसेलेजला गुरुवारी सकाळी गोळीबाराचा फटका बसला, असं मेक्सिकन एअरलाइन एरोमेक्सिकोनं सांगितलं.
या हल्ल्यात कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी जखमी झाला नाही. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये प्रवासी त्यांच्या जागेवर दबून बसल्याचं आणि ओरडताना दिसत आहेत.
"आम्ही टेक-ऑफसाठी वेग वाढवत असताना, आम्हाला विमानाच्या अगदी जवळून बंदुकीच्या गोळ्यांचा ऐकू आला आणि तेव्हाच आम्ही सर्वांनी स्वतःला जमिनीवर झोकून दिलं," असं डेव्हिड टेलेझ या विमानातील एका प्रवाशानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
कुलियाकानमध्ये हवाई दलाच्या विमानावरही हल्ला झाल्याचं मेक्सिकोच्या नागरी विमान वाहतूक संस्थेनं सांगितलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पुढील आठवड्यात उत्तर अमेरिकन नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी मेक्सिकोला जाणार आहेत. ते आता एक दिवस आधी पोहोचतील, असं मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी ट्विट केलं. पण ते लवकर का येत आहेत, याचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाहीये.
दरम्यान, सशस्त्र दल गुरुवारी पहाटेपासून कुलियाकानमध्ये यासाठीचं ऑपरेशन करत होतं, असं महापौर रुबेन रोचा मोया यांनी ट्विटरवर सांगितलं.
शहरातील विविध भागात नाकेबंदी करण्यात आली असून रहिवाशांना घरीच राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक दुकानंही लुटण्यात आली आहेत.
गुरुवारच्या दुपारपर्यंत सुरक्षा दल आणि कार्टेल टोळीतील सदस्यांमध्ये गोळीबार सुरूच होता, असं बातम्यांमध्ये आलं आहे.
शुक्रवारी संपूर्ण सिनालोआ राज्यात सर्व शाळा बंद राहतील, असं शिक्षण विभागानं सांगितलं होतं.
मेक्सिकन सुरक्षा दलांनी 2019 मध्ये गुझमन-लोपेझला अटक केली होती. पण, त्याच्या टोळीकडून त्यावेळी हिंसाचार भडकावण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे हा हिंसाचार टाळण्यासाठी त्याला सोडून देण्यात आलं होतं.
यूएस स्टेट डिपार्टमेंटनुसार, गुझमन आणि त्याचा भाऊ जोआकिन सध्या सिनालोआ राज्यातील जवळपास अकरा मेथॅम्फेटामाइन प्रयोगशाळा चालवत आहेत. यातून दरमहा जवळपास 1,300 ते 2,200 किलो ड्रग्ज तयार केले जातात.
त्यांनी असंही म्हटलंय की, गुझमन-लोपेझनं ड्रग्जची माहिती देणारे, ड्रग तस्कर आणि त्याच्या लग्नात गाण्यास नकार दिल्यामुळे लोकप्रिय मेक्सिकन गायक, अशा अनेकांच्या हत्येचा आदेश दिला होता.
डिसेंबरमध्ये अमेरिकेनं गुझमन-लोपेझ आणि त्यांच्या तीन भावांना अटक होईल यासाठी त्यांची माहिती पुरवणाऱ्याला 5 मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
'ड्रग तस्करांचा अब्जाधीश गॉडफादर' अल चॅपोला जन्मठेप
मेक्सिकोचा कुख्यात ड्रग माफिया ख्वाकीन 'अल चॅपो' गझमन याला अमेरिकेच्या एका कोर्टाने जन्मठेप आणि 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.
मेक्सिकोमध्ये दोन वेळा पोलिसांना गुंगारा देऊन तुरुंगातून पळून गेलेला अल चॅपो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अखेर त्याची रवानगी अमेरिकेत करण्यात आली होती. तेव्हापासून तो "आधुनिक काळातला सर्वांत कुख्यात गुन्हेगार" म्हणून ओळखला जाऊ लागला.
अमेरिकेचे पोलीस 20 वर्षांपासून त्याच्या मागावर होते. इतकंच नाही तर शिकागो क्राईम कमिशनने सर्वांत कुख्यात गुन्हेगारांची जी पहिली यादी बनवली त्यात अल चॅपोचा क्रमांक सर्वात वर होता. त्याला पब्लिक एनिमी नंबर 1 म्हणण्यात आलं आहे.
त्याच्या हस्तांतरणाच्या जवळपास दोन वर्षांनंतर आता हा खटला सुरू झालेला आहे. सिनालोआ कार्टल या गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख असल्याचा आणि 14 अब्ज डॉलर्सचे अंमली पदार्थ, ज्यात कोकेन आणि हिरोईन यांचाही समावेश आहे, अमेरिकेत तस्कारी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गुन्हेगारी, हिंसाचार, हत्या आणि विध्वंस करण्यातच आयुष्य घालवलेल्या या 61 वर्षांच्या कैद्याला त्याचं उरलेलं आयुष्य अमेरिकेतल्या सर्वाधिक सुरक्षा असलेल्या तुरुंगात घालवावं लागेल, यासाठीचे पुरेसे पुरावे आपल्या हाती असल्याचा अमेरिकी सरकारी वकिलांचा दावा आहे.
अल चॅपो म्हणजेच बुटका हे टोपण नाव असलेल्या ज्योकीनविरोधात अकरा गुन्हे दाखल आहेत. त्यात अंमली पदार्थांची तस्करी, अवैधपणे बंदूक बाळगणे आणि पैशांची अफरातफर यांचा समावेश आहे. त्यानं आपण दोषी नसल्याचं म्हटलं आहे.
हा खटला चार महिन्यात निकाली निघेल, असा अंदाज आहे. सोमवारपासून खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. सोमवारी न्यायमूर्तींची निवड करण्यात आली तर मंगळवारी पहिली सुनावणी झाली.
अल चॅपोचा हा खटला वैशिष्ट्यपूर्ण असण्यामागे चार कारणं आहेत.
1. पैसा
अल चॅपोवर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे आणि त्याची 14 अब्ज डॉलरची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे, अशी सरकारी वकिलांची मागणी आहे. यात कार्टल चालवण्यासाठी लागणारा खर्च गृहित धरलेला नाही, असं काही विश्लेषकांना वाटतं.
2009 साली फोर्ब्स मासिकानुसार अल चॅपोची संपत्ती 1 अब्ज डॉलर होती. शिवाय सिनालोआ कार्टलकडून त्याला दरवर्षी तीन अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त महसूल मिळायचा.
त्याकाळी मेक्सिकोतून अमेरिकेत होणाऱ्या अंमली पदार्थांच्या एकूण तस्करीपैकी तब्बल 25% तस्करी याच कार्टलकडून व्हायची.
अल चॅपोमुळे हेरोईन, कोकेन, अफू आणि मेथामफेटामिन यांसारख्या अंमली पदार्थांची जगभरात मोठ्या प्रमाणावर तस्करी होऊ लागली, असंही सरकारी वकिलांचं म्हणणं आहे.
2. आरोप
एल चॅपोविरोधातला हा खटला अंमली पदार्थांच्या अमेरिकी इतिहासातला सर्वांत मोठा खटला मानला जात आहे.
या खटल्यात सरकारी वकील हजारो कागदपत्रं, फोटो आणि जवळपास एक लाख सतरा हजार ऑडियो रेकॉर्डिंग्ज सादर करणार आहेत. जवळपास 33 हत्यांमध्ये त्याचा हात असल्याचे आरोप आहेत.
मात्र एकूण किती हत्यांमध्ये अल चॅपोचा हात आहे, याची नेमकी आकडेवारी वकिलांनी सादर करावी, असे आदेश न्यायमूर्ती ब्रायन कोगन यांनी प्राथमिक सुनावणीत दिले होते.
न्यूयॉर्क टाईम्सनुसार न्या. कोगन म्हणाले, "हा अंमली पदार्थ तस्करीचा खटला आहे. ज्यात हत्याही झाल्या आहेत. त्यामुळे मी अंमली पदार्थांचा समावेश असलेला हत्येचा खटला म्हणून याची सुनावणी होऊ देणार नाही."
या सुनावणीला वारंवार विलंब होत गेला. सरकारी वकिलांनी चौदा हजार पानांचे पुरावे दिले आहेत. त्यामुळे ही सुनावणी आणखी पुढे ढकलण्याला न्यायमूर्तींनी गेल्याच आठवड्यात नकार दिला होता. मात्र एवढ्या पुराव्यांची पडताळणी करणं अशक्य असल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं आहे.
सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष दोघांनाही समज देत न्यायमूर्ती म्हणाले, "या खटल्याची सुनावणी सुरू व्हावी, असं आमच्यापेक्षा जास्त कुणालाच वाटत नसेल."
3. सुरक्षा
एल चॅपो यापूर्वी दोन वेळा तुरुंगातून पळून गेला आहे. शिवाय त्याच्या गुन्हेगारी संघटनेचा धोका लक्षात घेता चार महिन्यांच्या या सुनावणीदरम्यान अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
12 मुख्य न्यायमूर्ती आणि सहा वैकल्पिक न्यायमूर्तींना कोर्टात ने-आण करण्याची जबाबदारी अमेरिकेतल्या मार्शल्सवर सोपवण्यात आली आहे. कोर्टाच्या सुरक्षेसाठी कोर्टाबाहेर सशस्त्र पोलीस अधिकारी आणि बॉम्बनिरोधक श्वानपथकं खडा पहारा देत आहेत. प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.
अल चॅपोच्या प्रत्यार्पणानंतर त्याला दक्षिण मॅनहॅटनमधल्या सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. त्याला दिवसातले 23 तास स्वतंत्र सेलमध्ये एकटं ठेवलं जातं.
प्रत्यक्ष खटला सुरू होण्यापूर्वी ब्रुकलीनमध्ये काही सुनावण्या झाल्या. त्यावेळी न्यूयॉर्कमधल्या दोन भांगाना जोडणारा पूल सामान्य जनतेसाठी बंद असायचा. अल चॅपोला घेऊन जाणाऱ्या पोलीस ताफ्यासोबत कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी सर्वांत प्रभावी समजली जाणारी लॉस एंजेलिसची SWAT टीम आणि एक अॅम्ब्युलंसही असायची. या संपूर्ण ताफ्यावर हेलिकॉप्टरच्या मदतीने देखरेख ठेवली जायची.
ही सगळी कसरत पुन्हा करावी लागू नये, यासाठी सुनावणीदरम्यान अल चॅपोला कोर्टाच्या परिसरातच ठेवलं जाण्याची शक्यता आहे.
या कुख्यात ड्रग्ज तस्कराने दोन वेळा मेक्सिकोच्या तुरुंगातून पळ काढला होता. एकदा लॉन्ड्रीच्या गाडीत लपून तर दुसऱ्यांदा तुरुंगातल्या बाथरुममधल्या टनेलमधून तो पळून गेला होता.
4. जनतेचं लक्ष
न्या. कोगन यांनी न्यायाधिशांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी, यासंबंधी दिलेल्या निकालात म्हटलं आहे, "एका अर्थानं हा खटला अभूतपूर्व असा आहे. अगणित लोकांचं लक्ष या खटल्याकडे लागून आहे."
न्यायमूर्तींनी त्या प्रकरणांचाही दाखला दिला ज्यात लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये सुनावणी सुरू होण्याआधीच त्याच्यावरचे आरोप रंगवून सांगण्यात आले होते.
अल चॅपोच्या आयुष्याने अनेक चित्रपट निर्माते आणि केट डेल कॅस्टिलो आणि सिन पेन सारख्या कलाकारांनाही भुरळ पाडली होती. त्याचा दाखला न्यायमूर्तींनी दिला होता.
पेन यांनी 2016 सालच्या रोलिंग स्टोन मुलाखतीसाठी अल चॅपेलची भेट घेतली होती. या भेटीमुळेच तपास अधिकाऱ्यांना तुरुंगातून पळून गेलेल्या या कुख्यात ड्रग तस्कराचा ठावठिकाणा पुन्हा शोधता आला होता.
न्यूयॉर्क सिटी विद्यापीठाच्या जॉन जे स्कूल ऑफ क्रिमिनल जस्टिसमधले सहायक प्राध्यापक असलेले फ्रित्झ अम्बाक यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "हा केवळ एका गुन्हेगाराचा किंवा अंमली पदार्थाविरोधी मोहिमेचा मुद्दा नाही तर तो (अल चॅपो) फोफावत चाललेल्या पॉप कल्चरचा हिरो बनला होता."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)