You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोट्यधीश तरुणाने का केला स्वतःच्याच वडिलांचा आणि गर्लफ्रेंडचा खून?
- Author, रॉबिन लेविंसन-किंग
- Role, बीबीसी न्यूज, टोरंटो
कॅनडामध्ये सध्या डेलेन मिलार्ड हे नाव फार चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. कोट्यधीश असलेल्या या तरुणानं स्वतःच्याच वडिलांचा खून केला. मात्र डेलेनची ही कहाणी याहूनही क्रूर आहे.
डेलेन मिलार्ड, 29 वर्षांचा वेगवान आयुष्य आवडणारा कोट्यधीश तरुण...
वयाच्या 14व्या वर्षी त्यानं एकट्यानं हेलिकॉप्टर आणि त्यानंतर त्याच दिवशी विमान उडवलं आणि कॅनडाचा सर्वांत लहान पायलट हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. वयाच्या 27व्या वर्षी तो कोट्यधीश झाला. लक्झरी कारचा ताफा त्याच्याकडे होता.
विमानांशी संबंधीत व्यापार करणाऱ्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यात 1985मध्ये डेलेनचा जन्म झाला. पण त्याच्या जन्मनंतर त्याच्या वडिलांची ही कंपनी हळूहळू डबघाईला आली होती. तरूण वयातच डेलेन आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करू लागला.
उद्योग रसातळाला जात असला तरी डेलेनच्या विलासी जगण्यात काहीच फरक पडला नव्हता. तो दर शनिवार-रविवारी आपल्या आलीशान बंगल्यात मित्रांना पूलसाईड पार्टी द्यायचा. त्याला ऑफरोड रेसिंगची आवड होती.
त्याच्या या चैनी आयुष्याची एक काळी बाजूही होती. तो अगदी तरुण असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता आणि 2012च्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याचे वडिल पलंगावर मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती.
पोलिसांच्या चौकशीत डेलेन म्हणाला, "माझ्या वडिलांच्या आयुष्यात काहीतरी मोठं दुःख होतं. त्या दुःखाचं ओझं ते आयुष्यभर वागवत राहिले. पण मला कधीच त्याची कल्पना दिली नाही." त्याच्या या जबाबानंतर त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली असावी, असंच सर्वांना वाटलं.
मात्र 14 मे 2013 रोजी टीम बोस्मा नावाच्या एका व्यक्तीच्या खुनात डेलेनचं नाव मुख्य संशयित म्हणून आलं आणि सर्वांनाच धक्का बसला.
लवकरच डेलेनविरोधात एक नाही तर तीन खुनाचे खटले सुरू झाले. पहिला टिम बोस्माच्या खुनाचा, दुसरा त्याची एक्स-गर्लफ्रेंड लॉरा बॅबोकच्या खुनाचा आणि तिसरा त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या खुनाचा...
सगळ्यांना आत्महत्या वाटत असलेला डेलेनच्या वडिलांचा मृत्यू हा खून होता, हे उघड होण्यामागे कारण ठरला एक ट्रक...
32वर्षांचा टीम बोस्मा याला आपला एक ट्रक विकायचा होता आणि त्यासाठी त्याची पत्नी शर्लीन बोस्मा हिनं ऑनलाईन जाहिरात दिली. टीमला दोन वर्षांची एक मुलगी होती. त्यांना आणखी एक बाळ हवं होतं. मात्र घरी पैशांची चणचण होती. त्यामुळे ट्रक विकून काही तजवीज करावी, असा बोस्मा दांपत्याचा विचार होता.
6 मे 2013 रोजी डेलेन त्याचा मित्र मार्क स्मिचसोबत टीम बोस्माकडे गेला आणि टेस्ट ड्राईव्ह घ्यायची म्हणून सांगितलं. टीमही त्यांच्यासोबत गेला. पण परत कधी आलाच नाही. शर्लीननं टीमला अनेक कॉल केले, मेसेज टाकले. मात्र एकालाही उत्तर मिळालं नाही.
त्यानंतर मात्र शर्लीनने टीम हरवल्याची तक्रार नोंदवली. तिने टीमला शोधण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम उघडली आणि बघता बघता शेकडो लोक रस्त्यावर उतरले. हताश शर्लीनने 8 तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि अपहरणकर्त्यांना आवाहन केलं, "एका ट्रकसाठी असं करू नका. तुम्हाला टीमची गरज नाही. पण मला आहे. माझ्या मुलीला तिचे वडील हवे आहेत."
पोलिसांनीही कसोशीने प्रयत्न केले. चार दिवसांनंतर टीमचा ट्रक डेलेनच्या आईच्या प्लॉटवर सापडला. ट्रकची मोडतोड करण्यात आली होती. मात्र बंदुकीच्या गोळ्यांची पावडर आणि टीमच्या रक्ताचे काही डाग ट्रकच्या आत सापडले. काही दिवसांनंतर डेलेनच्या शेतावरच्या भट्टीत मानवी शरिराचे अवशेष सापडले. मात्र ते इतके जळालेले होते की डीएनए चाचणीवरूनही ते टीमचेच आहेत का, याची शहानिशा करता येत नव्हती.
डेलेन आणि त्याचा मित्र मार्कवर बोस्माच्या खुनाचे आरोप ठेवण्यात आले. डेलेनच्या अटकेनंतर पोलीस त्याच्याशीच संबंधित इतर दोन प्रकरणांमध्ये डेलेनचे धागेदोरे सापडतात का, याचा शोध घेऊ लागले.
पहिलं प्रकरण होतं डेलेनची एक्स-गर्लफ्रेंड बॅबोकच्या बेपत्ता होण्याचं... ती जुलै 2012पासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता होण्यापर्यंतचं तिचं आयुष्य फार कठीण गेलं होतं. तिचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी सांगितलं, ती उत्साही असली तरी आयुष्याचा बराच काळ तिनं नैराश्याचा सामना केला होता.
2008-09मध्ये डेलेन आणि ती जवळ आले. लवकरच दोघे वेगळेसुद्धा झाले. त्यानंतर क्रिस्टिना नोडगा त्याच्या आयुष्यात आली. मात्र त्यानंतरही डेलेन आणि बॅबोक यांचे शारिरीक संबंध असल्याचं तिचे मित्र सांगतात.
2016मध्ये बोस्माच्या प्रकरणात पुरावे मिटवण्याच्या आरोपाखाली क्रिस्टीनाला शिक्षा झाली. बॅबोकनं तिला आपले आणि डेलेनचे अजूनही संबंध असल्याचे मेसेज पाठवले होते. त्यावरून दोघींचं भांडणही झालं होतं.
या प्रेमत्रिकोणातून बॅबोकला बाजूला करण्यासाठी डेलेननेच तिचा खून केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. त्यासाठी त्यांनी डेलेनचे क्रिस्टिनाला पाठवलेले मेसेज पुरावे म्हणून सादर केले. त्यात लिहिलं होतं, "मी तिचं काहीतरी बरंवाईट करणार आहे. आपल्या आयुष्यातून तिला काढून टाकेन."
मात्र डेलेनने हे एकट्याने केलेलं नव्हतं. त्याच्या सोबतीला नेहमीच मार्क असायचा. बॅबोक आणि बोस्मा दोन्ही खुनांच्या खटल्यात तोही दोषी आढळला होता.
मार्कच बोस्माचा ट्रक टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन गेला होता. बॅबोकच्या खुनाचा कटही त्यानेच रचला होता. शिवाय डेलेनच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी डेलेन आपल्याच घरी होता, असा जबाब त्याने दिला होता.
मार्क एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. त्याच्यावर अंमली पदार्थ घेणं, त्या नशेत गाडी चालवणं, असे काही गुन्हेसुद्धा दाखल होते. तो अंमली पदार्थ विकून पैसे कमवायचा. त्यातूनच 2006मध्ये डेलेन आणि त्याची ओळख झाली आणि हळुहळु ही मैत्री घट्ट होत गेली.
दोघंही मजा म्हणून चोऱ्या करायचे. झाडांपासून ते अगदी बांधकामाच्या सामानांपर्यंत काहीही चोरायचे. 2012मध्ये मार्क डेलेनच्या घराच्या बेसमेंटमध्ये राहायला गेला. मात्र खुनाच्या या प्रकरणांमुळे ही मैत्री तुटली आणि दोघांनी आपापले वेगवेगळे वकील केले आणि बोस्मावर गोळी मी नाही तर याने झाडली, असे आरोप दोघांनी एकमेकांवर केले.
वडिलांच्या जाण्यानंतर डेलेन त्यांच्या संपत्तीचा मालक झाला. मात्र त्याच्यावरच जेव्हा वडिलांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला तेव्हा सर्व संपत्ती सील करण्यात आली.
बोस्मा खून खटल्यात दोषी आढळल्यानंतर आणि बॅबोकच्या खुनाचा खटला लढवण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागल्यानंतर तो कंगाल झाला होता.
खुनाच्या आरोपात अडकल्यानंतर त्याने आपली बरीचशी संपत्ती आपल्या आईच्या नावे केली होती. त्यामुळे वकिलांना द्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. न्यायाधीशांनी कायदेशीर मदत नाकारली. नंतर त्याने स्वतःच खटला लढवला.
त्याच्या वडिलांशी त्याचे संबंधही तणावाचेच होते. सार्वजनिक जीवनात वागताना तो एका आज्ञाधारी मुलाप्रमाणे वागायचा. मात्र खाजगी आयुष्यात तो वडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला होता.
व्यवसाय डबघाईला आला असताना मुलाने वारेमाप खर्च करणं त्याच्या वडिलांना पटत नव्हतं. त्यामुळे आपल्या संपत्तीतून ते त्याचं नाव काढणार होते, अशीही चर्चा होती.
वडिलांचा मृत्यू झाला त्या रात्री आपण मार्क स्मिच याच्या घरी होतो, असं डेलेनने कोर्टाला सांगितलं होतं. सकाळी जेव्हा त्याने आपल्या वडिलांना बघितलं तेव्हा वैद्यकीय मदत मागवण्याऐवजी त्याने आपल्या घटस्फोटीत आईला फोन केला होता.
शिवाय डेलेन यानेच पोलिसांना आपले वडील निराश होते, असं सांगितलं होतं. मात्र डेलेनने सांगितलं त्या वेळेच्या कितीतरी आधीच तो त्याच्या घरी पोहोचला होता, असं त्याच्या मोबाईल रेकॉर्डवरून सिद्ध झालं.
ज्या बंदुकीने वडिलांचा जीव गेला त्यावर डेलेनचे डीएनए सापडले. शिवाय ती बंदुक डेलेन यानेच बेकायदेशीरपणे खरेदी केली होती. अखेर सर्व पुरावे बघता कोर्टाने त्याला बोस्मा आणि बॅबोकनंतर स्वतःच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपातही दोषी ठरवलं.
या निकालानंतर बॅबोकच्या वडिलांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली, "केवळ आम्ही किंवा शर्लीन बोस्मानेच आपले जीवलग गमावले नाही तर आता मिलार्ड कुटुंबालाही याच आठवणींसोबत जगायचं आहे की स्वतः डेलेननेच अत्यंत क्रूरपणे आपल्या वडिलांचा खून केला."
बोस्मा आणि बॅबोक दोघांच्याही खुनात डेलेन आणि मार्क दोघंही दोषी आढळले. त्यांना सलग दोन जन्मठेप सुनावण्यात आल्या आहेत.
वडिलांच्या खुनात डेलेन दोषी सिद्ध झाला आहे. त्याला अजून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. त्याला जन्मठेपच व्हावी, अशी विनंती सरकारी वकिलांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
वडिलांच्याच खुनात दोषी आढळल्याने डेलेनला त्याच्या वडिलांच्या संपत्तीतून बेदखलही केलं जाऊ शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)