व्हॉट्सअॅप फॉर्वर्डमुळे होणाऱ्या हत्या रोखणारी पोलीस अधिकारी

मार्च महिना. उन्हाळ्याचे दिवस होते. तेलंगणातील गावांमध्ये संध्याकाळ होताच भयाण शांतता पसरायची. गावंही थोडीथोडकी नाही तर चारशेहून जास्त. संध्याकाळ व्हायच्या आतच बायाबापडे शेतातून घरी यायचे. दारं बंद व्हायची. दिवेसुद्धा बंद व्हायचे.

रात्री उशिरापर्यंत बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांनासुद्धा घरात हाकललं जायचं. उन्हाळ्यात चांदण्यांखाली अंगणात थंड हवा घेत झोपणारे पुरुषही आता घरातच थांबायचे. रस्ते निर्मनुष्य व्हायचे. आणि बघता बघता टाचणी पडल्याचाही आवाज होईल, इतकी स्तब्धता गावात पसरायची.

गावकऱ्यांचं असं वागणं खूप विचित्र होतं. गावात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी ही सर्व माहिती वरिष्ठांना दिली.

गडवाल जिल्ह्यातली ही घटना. रेमा राजेश्वरी तिथल्या पोलीस अधिकारी होत्या. त्या सांगतात, "अंधार पडताच या गावांमध्ये जणू सर्वकाही ठप्प व्हायचं. पोलीस शिपाई सांगायचे, त्यांनी असं पूर्वी कधीच बघितलेलं नव्हतं."

हा काय प्रकार आहे, हे शोधण्यातच पुढचे काही दिवस गेले. त्यानंतर जी माहिती पुढे आली त्याने तर पोलिसांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या गावकऱ्यांना व्हॉट्सअॅपवर काही व्हिडिओ आणि ऑडियो मेसेज मिळाले होते, ज्यामुळे ते पुरते हादरले होते.

या अत्यंत क्रूर अशा व्हीडियोमध्ये एका माणसाच्या पोटातल्या सर्व आतड्या बाहेर आल्या होत्या. सोबतच्या ऑडियो मेसेजमध्ये एका पुरुषाचा तेलुगुतला आवाज होता. तो सांगत होता, "काही वर्षांपूर्वी महामार्गांवर लूट करणाऱ्या लुटारूंची टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे आणि यावेळी ते मानवी अवयवांची तस्करी करत आहेत."

साक्षरता नाही, पण स्मार्टफोन आहेत

पोलिसांनी गावकऱ्यांचे मोबाईल तपासले तेव्हा त्यांना व्हायरल झालेले 30-35 व्हीडियो आणि फोटो सापडले. त्यातला खूपच व्हायरल झालेला व्हीडियो हा लहान मुलाच्या अपहरणाचा होता. तो व्हीडियोही फेक होता. पाकिस्तानमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी म्हणून जी फिल्म बनवण्यात आली होती, त्यातला महत्त्वाचा भाग कट करून हा अपहरणाचा व्हीडियो तयार करण्यात आला होता.

या व्हिडियोसोबत ऑडियो मेसेजही होता - "लहान मुलांचं अपहरण करणारे आपल्या गावात येत आहेत. ते तुमच्या दारावर दगड मारतील. दार उघडू नका आणि तुमच्या मुलांनाही घराबाहेर पडू देऊ नका. हा मेसेज जास्तीत जास्त व्हायरल करा."

गडवाल आणि वनपर्ती हे देशातील अतिशय मागास जिल्ह्यांपैकी एक आहेत. कापूस आणि भात इथली मुख्य पिकं. जिल्ह्यातील अनेक जण भूमीहीन आहेत. अनेक जण नोकरीसाठी मोठ्या शहरात गेले आहेत. फारफार तर निम्या लोकांना लिहिता वाचता येतं.

मात्र प्रत्येक घरात एकतरी स्मार्टफोन आहे. सोशल मीडिया साक्षरता शून्य असल्याने व्हॉट्सअॅपवर येणारा प्रत्येक मेसेज खरा मानला जातो. त्यामुळे अपहरण आणि खुनांच्या या व्हीडियोंमुळे चारशेहून अधिक गावातले गावकरी धास्तावले होते.

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी

तेव्हा या फेक न्यूजचा सामना करण्यासाठी रेमा राजेश्वरी यांनी योजना आखली. प्रत्येक गावात एक पोलीस शिपाई नेमला जो दारोदारी जाऊन हे व्हीडियो आणि मेसेज कसे बनावट आहेत, हे सांगायचा. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन लोकांना करण्यात आलं.

खोट्या बातम्या पसरवणं हा कायद्याने गुन्हा असल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. रात्रीची गस्त वाढवण्यात आली. गावकऱ्यांना पोलीस शिपाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन नंबर दिला. इतकंच नाही तर भिंतींवर नंबर लिहून ठेवले.

जवळपास दीड महिना राजेश्वरी शांत झोपूही शकल्या नाही. सतत फोन वाजायचे.

एका रात्री एका गावकऱ्याचा फोन आला. कुणीतरी आपल्या घरावर दगड फेकत आहे आणि मुलांना पळवणारी टोळी गावात आली आहे, असं तो सांगत होता. पोलीस शिपायाने जाऊन तपासणी केली तेव्हा असं काहीच घडलेलं नसल्याचं त्याने कळवलं.

मात्र राजेश्वरी यांनी स्वतः जाऊन बघण्याचा निर्णय घेतला. "मी गेले तेव्हा कळलं एका गावकऱ्याने दारू पिऊन तो व्हिडियो बघितला आणि इतका घाबरला की त्याला वाटलं खरंच ती टोळी गावात आली आहे. म्हणून त्याने पोलिसांना फोन केला होता."

एप्रिलमध्ये एका गावात एक धार्मिक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात गाणं गाणाऱ्या दोन महिलांची रात्रीची शेवटची बस चुकली. म्हणून त्या रात्री देवळातच थांबल्या.

जवळपास मध्यरात्री एका दारुड्याने त्यांना पाहिलं आणि मुलं पळवणाऱ्या बायका आल्याची आवई पिटली. काही मिनिटांतच सर्व गावकरी जमले. त्यांनी त्या दोन महिलांना झाडाला बांधलं आणि बेदम मारहाण केली. मात्र एका जागरूक नागरिकाने तात्काळ पोलिसांना फोन लावल्याने मोठा अनर्थ टळला.

काही दिवसांनंतर एका गावात एक तरुण झाडांच्या मागे आपल्या प्रेयसीची वाट बघत थांबला होता. काही गावकऱ्यांनी त्याला बघितलं आणि हाच तो मुलं पळवणारा असल्याचं म्हणतं त्याला मारहाण केली. यावेळीही पोलिसांना लगेच फोन आल्यामुळे त्या तरुणाचा जीव वाचला.

त्याच दरम्यान एका गावात एका गुराख्याचं दोन मुलांशी भांडण झालं. त्या मुलांनी गुराख्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर टाकून हाच मुलं पळवणारा असल्याचा मेसेज पसरवला. मोबाईलवर हा मेसेज बघून त्याच दिवशी शेजारच्या गावातील लोकांनी गुरख्याला पकडलं आणि त्याला मारहाण केली.

पोलिसांना कळताच त्यांनी तपास केला आणि त्या पोरांना पकडलं. गुराख्याशी भांडण झाल्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी आपण हे सर्व केल्याचं मुलांनी कबूल केलं.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अशा प्रकारच्या तब्बल 13 घटना आसपासच्या गावात घडल्या. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की गावकऱ्यांनी स्वतःच लाठ्या-काठ्या, दगड घेऊन रात्री पहारा द्यायला सुरुवात केली होती. अशा वेळी पोलिसांना गावातले वडीलधारी आणि स्थानिक नेत्यांना हाताशी धरून फेक न्यूजविषयी जनजागृतीचे कार्यक्रम या सर्व गावांमध्ये राबवले.

बनावट मेसेजेसला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोलीस शिपायांनी स्वतःचा नंबरही अॅड केला. गावात दवंडी पिटणाऱ्याचीही मदत घेण्यात आली. तोही घरोघरी जाऊन खोट्या बातम्यांविषयी सांगायचा.

पोलिसांनी सांस्कृतिक गट स्थापन केले. त्यांना गावागावांत घेऊन गेले आणि फेक न्यूजचे धोके याविषयी गाणी, नाटकं सादर केली.

याच खोट्या व्हॉट्सअॅप व्हिडियो आणि मेसेजमुळे एप्रिल महिन्यात देशभरात जवळपास 25 जणांना जमावाने ठार केलं. केंद्र सरकारनेही या सर्व प्रकरणाची दखल घेत व्हॉट्सअॅपद्वारे बेजबाबदार आणि स्फोटक मेसेजेसच्या प्रसारावर आळा घालण्याचे निर्देश व्हॉट्सअॅप व्यवस्थापनाला दिले.

मात्र तेलंगणातील त्या चारशे गावांमध्ये एकही जीव गेला नाही.

रेमा राजेश्वरी यांच्या अथक प्रयत्नांमुळे या गावांमध्ये आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. गावकऱ्यांमधली भीती दूर झाली आहे. आता कोणता व्हॉट्सअॅप मेसेज खरा, कोणता खोटा, याची समज गावकऱ्यांना आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)