आता व्हॉट्सअॅपने पैसे सुद्धा पाठवता येणार

    • Author, देविना गुप्ता
    • Role, बीबीसी व्यापार प्रतिनिधी

व्हॉट्सअॅप हे भारतातलं सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. या महिन्याच्या अखेरीस तुम्ही व्हॉट्सअॅप द्वारे एकमेकांना पैसेही पाठवू शकाल.

व्हॉट्सअॅपनं पैशांचे व्यवहार करण्याची सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. सध्या काही लोक या सेवेचा वापर करत आहेत. आणि या नव्या सेवेमुळे सध्या भारतातल्या 400 अब्ज डॉलर (2 लाख 60 हजार कोटी रुपयांच्या) मोबाइल वॉलेट क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो.

भारतात मोबाइलचा वापर संपर्कापुरता मर्यादित न राहता इंटरनेटद्वारे जगाशी जोडण्यासाठी केला जातो. व्हॉट्सअॅप हे कदाचित त्याचं सर्वांत लोकप्रिय माध्यम.

सध्या भारतात अंदाजे 20 कोटी व्हॉट्सअॅप युजर्स आहेत आणि भविष्यात ही संख्या आणखी वाढू शकते.

दुसरीकडे Paytm ही भारतातली सर्वांत मोठी मोबाइल ई-वॉलेट कंपनी आहे. व्हॉट्सअॅपच्या या निर्णयामुळे Paytmची चिंता वाढली आहे.

"सरकारने मोबाइल पेमेंटसाठी आखलेल्या अनेक नियमांची व्हॉट्सअॅपकडून पायमल्ली केली जात आहे. ज्या नियमांमुळे ग्राहकांना सुरक्षिततेची हमी मिळते त्याच नियमांना व्हॉट्स अॅपने बगल दिल्याचं दिसतं," असं Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा सांगतात.

Paytm मध्ये जपानच्या सॉफ्ट बॅंक आणि चीनच्या अलिबाबानं गुंतवणूक केली आहे, म्हणून Paytm ची मालकी काही अंशी या कंपन्यांकडे आहे. सध्या Paytm वर 30 कोटी ग्राहकांनी नोंद आहे आणि दररोज 50 लाख लोक Paytm द्वारे व्यवहार करत आहेत.

2016 मध्ये जेव्हा नोटाबंदी करण्यात आली होती, तेव्हा Paytm च्या वापरकर्त्यांची संख्या एका रात्रीत वाढली होती. Paytm च्या ट्रॅफिकमध्ये 700 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर अॅपचं डाउनलोडचं प्रमाण 300 टक्क्यांनी वाढलं होतं, असं कंपनी सांगते.

Paytmचं काय म्हणणं आहे?

फेसबुकने Free Basics ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप Paytm ने केला आहे. व्हॉट्सअॅपची मालकी फेसबुककडे आहे.

Free Basics हे फेसबुकचं एक अॅप्लिकेशन होतं, ज्यामुळे इंटरनेटवरच्या काही निवडक कंपन्यांची सुविधा ग्राहकांना मोफत मिळणार होती.

पण Free Basics नेट न्यूट्रॅलिटीचे नियम पायदळी तुडवत आहे, असा आरोप भारतात अनेकांनी करत फेसबुकच्या या प्रोग्रामला विरोध केला.

"जेव्हा फेसबुक व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंटची सोय बाजारात आणेल, तेव्हा ते बाजारावर आपली एकाधिकारशाही गाजवण्याचा प्रयत्न करतील. ते इतर अॅप्सला लॉक करण्याचा प्रयत्न करू शकतात," अशी भीती Paytmचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अबॉट यांनी व्यक्त केली. पण सर्वच कंपन्या दीपक यांच्याशी सहमत नाहीत.

"या क्षेत्राच्या विस्तारासाठी भरपूर संधी उपलब्ध आहे. सध्या बाजारात केवळ 5 ते 10 टक्केच लोक डिजिटल व्यवहार करताना दिसतात. तेव्हा एखादा मोठा स्पर्धक या क्षेत्रात येणं ही सकारात्मक बाब आहे," असं MobiKwik चे संस्थापक बिपिन प्रीत यांनी म्हटलं.

"MobiKwik सारख्या कंपन्यांकडे जागतिक कंपन्यांच्या तुलनेत भारतामध्ये जास्त मनुष्यबळ उपलब्ध आहे. जर पेमेंट करताना काही अडचणी आल्या तर त्या आम्ही सोडवू शकतो. त्यामुळे बाहेरील कंपन्या आमच्याशी थेट स्पर्धा करू शकत नाहीत," असं प्रीत म्हणतात.

व्हॉट्स अॅप पेमेंट कसं काम करणार?

व्हॉट्सअॅपमध्ये 'युनिफाइड पेमेंट इंटरफेस' (UPI) या यंत्रणेचा वापर केला जातो. यामध्ये पैसे पाठवणाऱ्यांचं बॅंक अकाउंट त्यांच्या मोबाइलशी जोडलेलं असतं. युजर्सना आपलं बॅंक अकाउंट मग या पेमेंट अॅपशी जोडावं लागतं.

सध्या भारतात अंदाजे 20 कोटी लोक व्हॉट्सअॅप वापरतात. या सोयीनंतर हे सर्व जण व्हॉट्सअॅपचा वापर आर्थिक व्यवहारासाठी करू शकतील. त्यामुळे व्हॉट्सअॅपला नवे ग्राहक शोधावे लागणार नाहीत.

याचा Paytm वर काय परिणाम होईल?

भारतामध्ये Paytmचा वापर बराच वाढला आहे. छोट्या विक्रेत्यांकडे तसेच फेरीवाल्यांकडे Paytmची सुविधा दिसू लागली आहे.

पैशांचे व्यवहार करण्याव्यतिरिक्त तिकीट विक्री आणि इतर सुविधाही Paytmवर उपलब्ध आहेत. तेव्हा व्हॉट्सअॅप पेमेंट गेटवे Paytmला कशी टक्कर देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सध्या Paytmने बॅंकेसोबत व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे आणि भविष्यात त्यांचा विमा क्षेत्रातही शिरकाव होऊ शकतो.

व्हॉट्सअॅपची जमेची बाजू ही आहे की त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी भरपूर राखीव निधी आहे. जर व्हॉट्सअॅपने ही सुविधा सुरू केली तर अनेकांसाठी हा प्लॅटफॉर्म वापरणं सुलभ ठरेल. अद्याप फेसबुकनं यावर काही भाष्य केलेलं नाही.

"आम्ही व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यास सज्ज आहोत," असं Paytmचे दीपक अॅबॉट सांगतात.

"अद्याप 90 टक्के युजर्स UPI मॉडेलबद्दल अनभिज्ञ आहेत. आम्ही देखील व्हॉट्स अॅपप्रमाणेच ग्राहकांना आकर्षित करून बाजारात पाय रोवण्याचा प्रयत्न करू. भारतीय बाजारपेठ खूप मोठी आहे. ज्यांची सेवा चांगली आहे त्यांच्याकडे ग्राहक जातील. जर बाजारात आणखी मोठे स्पर्धक आले तर ती चांगली गोष्ट आहे," असं दीपक यांनी सांगितलं.

जसं अलिबाबा कंपनीसोबत घडलं तसं Paytm सोबत घडण्याची शक्यता आहे, असं म्हटलं जातं.

चीनच्या अलिबाबानं 2009 साली 'अलीपे' नावाचा पेमेंट प्लॅटफॉर्म सुरू केला होता. त्यावेळी या अॅपची चीनमध्ये एकाधिकारशाही होती. पण नंतर टेन्सेंट नावाचं अॅप बाजारात आलं आणि 'Alipay'चा वापर कमी झाला. Alipayचा पेमेंट प्लॅटफॉर्म बाजारातला 80 टक्के सहभाग होता पण Tencentच्या येण्यामुळे तो 53 टक्क्यांवर आला. आपली पण स्थिती Alipay सारखी होऊ नये, अशी Paytm ला चिंता असू शकते.

हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)