मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'तो' व्हीडिओ पाकिस्तानातला

गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात मुलं पळवून नेणाऱ्यांच्या टोळीविषयी अफवेवरून अनेक हत्या झाल्या आहेत.

यात सर्वांत भयंकर घटना ही बंगळुरूमध्ये घडली. 25 वर्षीय कालू राम यांना जमावानं इतकं मारलं की त्यात त्यांचा मृत्यू झाला.

कालू राम हे मुलं पळवून नेणाऱ्या टोळीतले आहेत, असा लोकांना संशय होता.

त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात राज्यातही असेच प्रकार समोर आले होते. पण आता हा व्हीडिओ पाकिस्तानच्या कराची शहरातला असल्याचं समोर आलं आहे.

हा व्हीडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की किडनॅपिंगच्या हेतूनं नव्हे तर मुलांच्या सुरक्षिततेसाठीच्या सोशल कॅम्पसाठी तो तयार करण्यात आला होता.

पण या व्हीडिओतील शेवटचा भाग काढून टाकत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं गेलं.

कराचीतल्या एका कंपनीनं या व्हीडिओची निर्मिती केली होती.

कंपनीशी संबंधित असरार आलम सांगतात की, "भारतात या व्हीडिओचा गैरवापर होत आहे, ही धक्कादायक गोष्ट आहे. हे ऐकून मला कसं वाटतं आहे, मी सांगू शकत नाही. मला त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याची इच्छा आहे, ज्यानं वाईट हेतूसाठी आमच्या व्हीडिओचा वापर केला."

तर मोहम्मद अली सांगतात, "आम्ही जागरुकता निर्माण करण्यासाठी हा व्हीडिओ बनवला होता. पण लोक त्याचा गैरवापर करत आहेत. यामुळे अनेकांचा जीव जात आहे. याला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई व्हायला हवी."

महाराष्ट्रातही घडल्या घटना...

महाराष्ट्रातल्या औरंगाबादमध्ये प्रक्षुब्ध जमावाच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याने, 400 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबादमधीलच वाळुंज एमआयडीसीमध्ये बहुरूपी खेळ करणारे एक दाम्पत्य त्यांना राहण्यासाठी घराचा शोध घेत असता, त्यांना मुले पकडणारे म्हणून मारहाण करण्यात आली. योग्य वेळी पोलीस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पोलीस दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

गोंदिया शहरात एका वेडसर व्यक्तीला त्याच्या विक्षिप्त वागण्याने लोकांना भलताच संशय आला आणि मारहाण करण्यात आली. एक पोलीस कर्मचाऱ्याने सदर प्रकार बघितला आणि सदर व्यक्तीस जमावाच्या तावडीतून सोडवले. सदर व्यक्ती तालुक्यातीलच एका गावाची आहे.

(बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनी कराची आणि प्रवीण ठाकरे यांनी महाराष्ट्रातून दिलेल्या माहितीवर आधारित)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)