You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शनीच्या उपग्रहावर जीवसृष्टीची शक्यता, काही मूलद्रव्य सापडण्याचा अवकाश
- Author, मॅरी हाल्टन
- Role, सायन्स प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
माणसाला इतर कोणत्या तरी ग्रहावर वसती करायची असेल तर काय पर्याय आहेत? मंगळावरील वातावरण मानवी जीवनाला पोषक आहे का यावर संशोधन सुरू असताना शास्त्रज्ञांना दुसरा एक आशेचा किरण सापडला आहे. तो म्हणजे शनीचा उपग्रह इन्सेल्डस.
इन्सेल्डस या शनीच्या उपग्रहावरील पाण्यात शास्त्रज्ञांना कार्बनवर आधारीत काही रेणूंचा शोध लागला आहे.
ही कार्बन संयुगं यापूर्वी पृथ्वी काही अशनींवर सापडली आहेत.
या उपग्रहाच्या पृष्ठभागावरील महासागरातलं पाणी आणि गरम खडक यांच्यात प्रक्रिया झाल्यानं ही संयुगं बनली असावीत असं शास्त्रज्ञांना वाटतं.
अर्थात ही संयुगं असणं म्हणजे जीवसृष्टीचा पुरावा नाही. पण त्याचं अस्तित्व म्हणजे इन्सेल्डस जीवसृष्टीला पुरक ठरू शकतो, असं मानलं जात आहे.
कॅसिनी या अवकाश यानानं मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
हा अभ्यास करणारे संशोधक डॉ. फ्रॅंक पोस्टबर्ग म्हणतात, "एक मोठा रेणू फार जटिल असतो. अनेक रेणूंपासून तो बनलेला असतो."
पृथ्वी बाहेरील पाण्याच्या जगातून असा शोध लागण्याची ही पाहिलीच घटना आहे. पृथ्वीवर हे रेणू जैविक प्रक्रियेतून बनतात. पण इन्सेल्डसबद्दल असंच घडलं असेल असं काही नाही. पण जीवसृष्टीसाठी हे आवश्यक असतं.
ते म्हणाले, "या उपग्रहावरील ही संयुगं जीवसृष्टीच्या अनुषंगानं किती संयुक्तिक आहे, तिथं काही जीवन आहे का किंवा काही प्रिबॉयोटिक केमिस्ट्री आहे का, हे सांगता येण कठीण आहे."
जीवसृष्टीसाठी काय काय लागतं
1. द्रव रूपातील पाणी
2. उर्जा
3. कार्बन असणारी संयूगं
4. काही ठराविक मूलद्रव्यांचा गट (कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि सल्फर)
इन्सेल्डसवर फॉस्फरस आणि सल्फर आहे का हे तपासण्यात आलेलं नाही, पण या उपग्रहावर बाकीच्या इतर बाबी आहेत.
पुढं काय?
द कॅसिनी मिशन गेल्या सप्टेंबरमध्ये संपलं. शनीच्या वातावरणात कोसळल्यानंतर या मिशनचा शेवट झाला. पण शनीवर जीवसृष्टी शोधण्यासाठी हे मिशन बनवण्यात आलं नव्हतं.
इन्सेल्डसच्या दक्षिण धृवावर पाण्याचे झरे आहेत, हे संशोधकांना या मोहिमेपूर्वी माहीत नव्हतं. 2005मध्ये कॅसिनीनं हे झरे शोधले होते.
पोस्टबर्ग म्हणाले, "खरं तर पुढचा टप्पा म्हणजे इन्सेल्डसवर मोहीम आखणं आणि तिथं जीवसृष्टी आहे का हे पाहणं हाच आहे."
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)