You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंगळ मोहीम: इनसाईट करणार मंगळावरील भूकंपाचा अभ्यास
- Author, जोनॅथन अॅमोस
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं 'इनसाईट' या मंगळावरील नवीन मोहिमेला सुरुवात केली आहे. कॅलिफोर्निया इथल्या वँडेनबर्ग हवाई तळावरून या मोहिमेतल्या यानाला घेऊन जाणारं अॅटलास रॉकेट शनिवारी तिथल्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी आकाशात झेपावलं.
मंगळ ग्रहाच्या अंतर्गत रचनेचा विशेष अभ्यास करण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे. इनसाईट मोहिमेतील यानासोबत असलेला प्रोब म्हणजेच ग्रहाच्या पृष्ठभागावर संशोधन करणारं स्वयंचलित यंत्र हे नोव्हेंबर महिन्यात मंगळाच्या पृष्ठभागावर उतरेल.
हा प्रोब सेझमोमीटर या भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या यंत्राद्वारे संशोधनास सुरुवात करणार आहे.
या यंत्रावर नोंद झालेले भूकंपाचे धक्के मंगळाच्या अंतर्गत भागातील खडकांची रचना जाणून घेण्यास उपयुक्त ठरतील. यातून मिळालेली माहिती आणि निष्कर्ष पृथ्वीच्या माहितीसोबत पडताळली जाणार आहे. या संशोधनामुळे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या ग्रहाच्या निर्मितीवर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे.
इनसाईट मोहीमेत सहभागी असलेल्या प्रमुख संशोधकांपैकी एक असलेले डॉ. ब्रूस बेनर्ड्ट यांनी मोहिमेविषयी अधिक माहिती बीबीसीसोबत बोलताना दिली.
ते म्हणाले की, "मंगळावर निर्माण झालेल्या भूकंपाच्या लहरी या अंतर्गत भागातील खडकांवर प्रभाव टाकत पुढे जातात. यातून निर्माण झालेली कंपनं सेझमोमीटर यंत्रावर स्पष्ट दिसतात. वैज्ञानिक या कंपनांचा अभ्यास करतात. ग्रहाच्या विविध भागांतून या कंपनांची माहिती गोळा झाल्यावर ती माहिती एकत्र करून मंगळाच्या अंतर्गत भागाचा त्रिमिती (3D) नकाशा तयार करता येईल."
1970मध्ये नासानं वायकिंग यानासोबत सेझमोमीटर मंगळावर पाठवलं होतं. पण, या यंत्रातून मंगळावरील कंपनं मोजण्यात अपयश आलं. कारण, हे यंत्र तेव्हाच्या यानावर बसवण्यात आलं होतं. पण, या वेळी हे सेझमोमीटर थेट मंगळावरील जमिनीत स्थापित करण्यात येणार आहे.
या यंत्रामार्फत जवळपास एक डझन भूकंप तरी वर्षभरात नोंदले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे भूकंप 3 रिश्टर स्केलपेक्षाही कमी असले तरी नोंदले जातील. पृथ्वीवर एवढ्या क्षमतेचे भूकंप सामान्यांना जाणवत देखील नाहीत.
मंगळाच्या गर्भात धातूंचं प्रमाण सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. परंतु, या धातूंचा थर नेमका कुठून सुरू होत असेल याबाबत मतं-मतांतरं आहेत.
सेझमोमीटरचा हा प्रयोग फ्रान्सच्या पुढाकारानं होत आहे. कमी क्षमतेची कंपनं मोजणारे ब्रॉडबँड सेन्सर्स हे युरोपीय राष्ट्रांनी पुरवले आहेत. तर, UKनं एक पाऊंडाच्या आकाराचे तीन छोटे सेझमोमीटर पुरवले असून जास्त क्षमतेची कंपनं यात नोंदणं शक्य होणार आहे. म्हणजे एखादा अशनी किंवा उल्का कोसळल्यानं होणारी कंपनं देखील यात नोंदली जाऊ शकतील.
फ्रान्स आणि ब्रिटीश संस्थांकडून पुरवण्यात आलेल्या यंत्रांमध्ये काहीशे किमी लांब असलेल्या भूकंपाच्या केंद्राची नोंदही करता येणं शक्य होणार आहे.
मंगळावरील भूकंपाचे पॅटर्न महत्त्वाचे असल्याचं इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनचे प्रा. टॉम पाईक यांनी सांगितलं.
पाईक पुढे सांगतात, "पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील टॅक्टोनिक प्लेट्स म्हणजेच भूगर्भातील मोठे खंड आणि त्यांच्या हालचाली याचा भूकंपाशी संबंध येतो. मंगळावरील या प्लेट्स कितपत कार्यान्वित असतील याबाबत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे मंगळावरील कंपनांमुळे येणारी माहिती ही आपल्यासाठी महत्त्वाची ठरेल."
मंगळाचा गाभा एकेकाळी द्रवरूप होता, असं काही संशोधकांना वाटतं. चुंबकत्वामुळे हे निर्माण झाल्याची शक्यताही त्यांना वाटते. कारण, आजही या ग्रहावरील काही खडकांमध्ये याचे पुरावे आढळतात.
जर एखाद्या खडकात असे द्रव पदार्थ आढळले तर इनसाईट मोहीमेचा प्रोब रेडीओ उपकरणांद्वारे त्याचा अभ्यास करेल. यातून मंगळाचे त्याच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यात बदल कसे झाले हे अभ्यासता येईल.
ही संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी इनसाईट प्रकल्पाचे उप-संचालक डॉ. सुझान स्मर्कर हे एक उदाहरण देऊन सांगतात की, "तुम्ही जर एखादे साधे अंडे आणि एक उकडलेले अंडे पृष्ठभागावर ठेऊन भिंगरीप्रमाणे गोल फिरवल्यास, त्यांच्या एकमेकांभोवती फिरण्यात भिन्नता आढळून येईल. कारण, त्यांच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यासाठीच्या प्रक्रियेत त्यांच्यात असलेल्या द्रवाच्या घनतेची भूमिका महत्त्वाची आहे."
स्मर्कर पुढे सांगतात, "त्यामुळे आपल्या यानाची मंगळावरील हालचाल निरखून अभ्यासल्यास या ग्रहाच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याबद्दल माहिती उपलब्ध होईल. यातून मंगळाच्या गाभ्याबद्दल सर्वाधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल."
पृथ्वीच्या कक्षेत काही आठवडे प्रवास केल्यानंतर हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. आजपासून 6 महिन्यांनी म्हणजे 26 नोव्हेंबरच्या सुमारास हे यान थेट मंगळावर उतरण्याची शक्यता आहे.
मंगळाच्या कक्षेत उतरण्याचं दिव्य सर्वप्रथम या यानाला पार पाडावं लागणार आहे. 6 किलोमीटर प्रति सेकंद वेगानं मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर यानाला ग्रहाच्या पृष्ठभागावर येऊन वेग पूर्णतः कमी करावा लागले. त्यानंतर यानाला अलगद जमिनीला स्पर्श करावा लागेल. मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतरची ही 7 मिनिटं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)