बॉडी क्लॉक च्या संशोधनाला नोबेल? आहे तरी काय हे जैविक घड्याळ?

शरीरातील जैविक घड्याळ अर्थात बॉडी क्लॉक या प्रणालीवर मूलभूत संशोधनाबद्दल अमेरिकेतील त्रिकुटाला औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

जेफ्री हॉल (72), मायकेल रॉसबॅश (73) आणि मायकेल यंग (68) अशी या तिघांची नावं आहेत.

क्रोनोबायॉलॉजी नावानं ओळखल्या जाणाऱ्या या विज्ञानशाखेत शरीराच्या जैविक घड्याळाचा अभ्यास केला जातो.

शरीराचं जैविक घड्याळ कार्यरत असल्यानं आपल्याला विशिष्ट वेळी झोप येते. शरीराचं चलनवलन आणि आपलं वागणं हे जैविक घड्याळानुसार बदलतं.

माणसाचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं हे संशोधन निर्णायक असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे.

मानवी शरीर, झाडं, प्राणी, कीटक, बुरशीजन्य पेशी हे सगळं जैविक घड्याळानुसार कार्यरत असतात.

स्वभावात दररोज होतो बदल

आपला स्वभाव, हॉर्मोनची पातळी, शरीराचं तापमान आणि पचनप्रक्रिया या सगळ्यांमध्ये दररोज बदल होत असतो.

सकाळी हद्यविकाराच्या झटका येण्याची शक्यता जास्त असते. कारण रोज शरीर नव्या दिवसासाठी तयारी करत असतं.

जैविक घड्याळ शरीरातल्या हालचालींना नियंत्रित करतं. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल झाला तर आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो.

जेट लॅग अर्थात दोन विभिन्न टाइमझोनमधून प्रवास केल्यानंतर उडणारा गोंधळ आणि थकवा याचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

प्रदीर्घ काळ पोकळीसदृश वातावरणातून प्रवास केल्यानं प्रवास संपल्यानंतर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण होतं.

मधुमेह, कर्करोग आणि हद्यविकाराचा धोका

जैविक घड्याळाचं समीकरण बदललं तर स्मरणशक्ती संदर्भात अडचणी निर्माण होतात. मात्र याचा सगळ्यांत मोठा दुष्परिणाम म्हणजे मधुमेह, कर्करोग आणि हद्यविकार.

ऑक्सफर्ड विद्यालयाचे वैज्ञानिक आणि अध्यापक रसेल फोस्टर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "जैविक घड्याळाच्या कामकाजात अडथळा आणला तर आपल्या पचनावर विपरीत परिणाम होतो."

"अमेरिकेच्या तीन वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळणं अत्यंत आनंददायी आहे. शरीराचं काम कसं चालतं याबद्दलचं हे सखोल संशोधन आहे. हे त्रिकुट या पुरस्काराचे योग्य मानकरी आहेत."

संशोधन

जेफ्री हॉल आणि मायकेल रॉसबॅश यांनी डीएनएच्या एका तुकड्याला विलग करून जैविक घड्याळात बसवलं. याला पीरियड जीन म्हटलं जातं.

प्रोटीन अर्थात प्रथिनं निर्माण करण्याचं नियंत्रण पीरियड जीनकडे असतं.

या प्रोटीनला पीईआर म्हटलं जातं. पीईआरची पातळी वाढत जाते तसं तो स्वत:च निर्माणासंबंधी सूचना बंद करतो.

एका दिवसात अर्थात 24 तासांमध्ये पीईआरची पातळी कमी जास्त होत राहते. रात्रीच्या वेळी पीईआरची पातळी वाढते तर दिवसा कमी होते.

मायकेल यंग यांनी हे दोन जीन शोधले आहेत. यापैकी एकाला टाइमलेस तर दुसऱ्याला डबल टाइम म्हणतात. दोन्ही मिळून पीईआरची स्थिरता नियंत्रित करतात.

पीईआरची पातळी स्थिर असेल तर जैविक घड्याळ संथ गतीनं सुरु असतं. पीइआरच्या चढउतारात गतिमानता असेल तर जैविक घड्याळ वेगानं काम करतं.

पीईआरच्या स्थितीनुसार काही लोकांना सकाळी लवकर उठणं आवडतं तर काहींना रात्री उशिरापर्यंत जागं राहायला आवडतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)