You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विध्वंसक भूकंपाचा अंदाज खरंच वर्तवता येतो का?
- Author, मेगन लेन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भूकंप नेमका कधी होणार हे खरंच सांगता येऊ शकतं का?
हा अंदाज सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतो. हा अंदाज एका स्वयंघोषित वैज्ञानिकानं व्यक्त केला होता. या वैज्ञानिकाचं 1979 साली निधन झालं.
पण, 11 मे 2011 ला दिवंगत राफेल बेंडानी यांनी भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे अनेक लोकांनी रोमपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लिखाणात कोणत्याही भौगोलिक ठिकाणाचा, महिन्याचा किंवा दिवसाचा उल्लेख नव्हता हे विशेष.
अनेक पद्धती
न्यूझीलंडमध्ये सुद्धा एका माजी जादूगारानं असाच एक अंदाज वर्तवल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
क्राईस्टचर्चमध्ये फेब्रुवारी 2011 ला 6.3 इतक्या तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर केन रिंग यांनी लगेचच 20 मार्चला असा आणखी एक भूकंप येण्याचा अंदाज वर्तवला. मून शॉट पृथ्वीच्या केंद्रस्थानातून गेल्यामुळे हा भूकंप झाल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे या भीतीपोटी अनेकांनी शहर सोडलं.
भूकंपाचा अंदाज बांधणं हे कायमच वादग्रस्त असतं. असं ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हेतील सेस्मॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. ब्रायन बाप्टी यांनी सांगितलं.
"भूकंपाची उत्तम जाण आणि अभ्यास असूनसुद्धा भूकंप कधी, कुठे होणार, किती तीव्रतेचा असणार याचा उत्तम अंदाज बांधलेलं कोणतंही उदाहरण डोळ्यासमोर नाही." ते सांगत होते.
भूकंपाचा अंदाज वर्तवण्याबाबच्या अनेक पद्धती विश्वासार्ह नाहीत असं त्यांनी सांगितलं. रोममध्ये जो अंदाज वर्तवला गेला त्याला कोणताच आधार नव्हता आणि त्यामुळे लोकांना त्याचं गांभीर्य कळलं नाही.
बीबीसीचे विज्ञानविषयक प्रतिनिधी जोनाथन अमोस यांनी सांगितलं की, "भूकंपतज्ज्ञ हे सतत भूकंप प्रवण केंद्राच्या आसपास खडकांच्या हालचालीची पाहणी करत असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी दबाव निर्माण होतो त्याची माहिती त्यांना मिळते म्हणून शेवटच्या क्षणी धोक्याची सूचना मिळते.
"जपान आणि कॅलिफोर्निया या ठिकाणचे वैज्ञानिक खडकांमध्ये भूकंपाचा इशारा देणारे सिग्नल शोधत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष भूकंपाच्या तीस सेकंद आधी सूचना मिळू शकतो. इतक्या वेळात आपत्कलीन यंत्रणा आपापल्या ठिकाणाहून निघून जिथे भूकंप झाला आहे त्या ठिकाणी पोहोचू शकतात." असंही त्यांनी सांगितलं.
पण, मोठ्या क्षेत्रावर पसरणाऱ्या भूकंपाचा अंदाज बांधणं कठीण आहे.
अमोस सांगतात, "हे म्हणजे एखाद्या मातीच्या ढिगाऱ्यावर सतत वाळू टाकत राहणे आणि कोणत्या बाजूच्या कोणत्या वाळूच्या कणामुळे तो ढिगारा कोसळला याचा अंदाज बांधण्यासारखं आहे. या पद्धतीत खूप वैविध्य आहे आणि लोक अनेक शतकांपासून ही पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत."
जपानच्या भूकंपप्रवण बेटांभोवतालच्या भूकवचाखालील भेगांवर सर्वांचं लक्ष आहे.
बेडकाचा इशारा
पण, एका गृहितकानुसार प्राण्यांनुद्धा भूकंपाचा अंदाज वर्तवता येतो.
2010 साली जर्नल ऑफ झुलॉजीनॆ बेडकांच्या संख्येसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार इटलीत लाक्विलामध्ये 2009 साली 6.3 इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला तेव्हा तिथले बेडूक त्याआधीच त्यांची प्रजननाची जागा सोडून निघून गेले होते. त्यांचं हे वर्तन अतिशय अनाकलनीय होतं.
ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हेतील सेस्मॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. ब्रायन बाप्टी सांगतात, "या क्षणी आम्हाला जगात जिथं सतत भूकंप होतात असेच काही भाग माहीत आहेत."
यामुळे भूकंपतज्ज्ञांना भूगर्भात होणाऱ्या हालचाली, भूकंप आणि त्याचे परिणाम यांचा अंदाज वर्तवता येतो. "पण तरी भूकंपाचा तंतोतंत अंदाज वर्तवण्यापासून हे दूरच आहे."
आणि जी संतमंडळी नैसर्गिक आपत्तींचा अंदाज सांगतात त्यांचं काय?
"इंडोनेशिया आणि जपानच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र भूकंप होत असतात. त्यामुळे हवेत अंदाज बांधणं फारसं कठीण नाही." असं बाप्टी सांगतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)