You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंगेझ खान : शेकडो मुलांचा बाप, पण मृत्यूच्या वेळी एकटाच
- Author, जफर सय्यद
- Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद
तेराव्या शतकाच्या सुरवातीला वायव्य आशियाच्या मैदानी प्रदेशातून एक असा माणूस पुढे आला ज्यानं साऱ्या जगाला हादरवून सोडलं. हा माणूस होता चंगेझ खान.
चंगेझ खानचे मंगोल सैनिक मृत्यू आणि विध्वंसाची दवंडी पिटत येत होते आणि बघता बघता शहरं, भूप्रदेश आणि देश त्यांच्या अधिपत्याखाली येत गेले.
अवघ्या काही दशकांच्या अवधीत भयानक रक्तपात आणि नरसंहार करत, हसत्या-खेळत्या शहरांची राख रांगोळी करत, बीजिंगपासून मास्कोपर्यंतची सत्ता चंगेझ खानच्या मालकीची झाली होती.
मंगोल राजवट तीन कोटी चौरस किलोमीटर इतक्या प्रचंड भूभागावर पसरली होती. आजच्या घडीला त्या भागातल्या एकूण लोकसंख्येपैकी तीन कोटी लोक मंगोल वंशाचे आहेत.
चंगेझ खानने केवळ लढाया करूनच यश संपादन केले असं नाही. कारण आणखी एका क्षेत्रात त्यानं मिळवलेला 'विजय' तेवढाच चक्रावून सोडणारा आहे.
काही वर्षांपूर्वी एका जनुकीय संशोधनातून समोर आलं की पूर्वेकडील मंगोल साम्राज्याच्या सीमा भागात राहणाऱ्या 8 टक्के पुरुषांच्या Y क्रोमोझोम्समध्ये एक मार्कर आहे. ही व्यक्ती मंगोल शासकाच्या वंशावळीशी संबंधित आहे, हे या मार्करवरून दिसतं.
जगातील 1 कोटी 60 लाख पुरुष - म्हणजे एकूण पुरुष लोकसंख्येच्या 0.5 टक्के लोक, चंगेझ खानच्या वंशावळीतले आहेत, हेही या संशोधनातून पुढं आलं.
पाकिस्तानात असाच मार्कर 'हजारा' जमातीमधील लोकांच्या डीएनएमध्येही सापडतो. हे लोक स्वतःला मंगोलच म्हणवतात. याशिवाय मुघल, चुगताई, मिर्जा नावाचे लोक स्वतःला मंगोल वंशीय म्हणवतात.
एका व्यक्तीची इतकी अपत्ये ?
जनुकीय संशोधनातून जसं हे पुढं आलं आहे, तसचं याबद्दल बरीच ऐतिहासिक माहिती आणि पुरावेही उपलब्ध आहेत.
चंगेझ खानने स्वतः डझनभर लग्नं केली होती आणि त्याला 200 च्यावर मुलं होती, असं सांगितलं जातं. नंतर त्यातल्या बऱ्याच मुलांनी अनेक राजवटींद्वारे राज्यकारभार केला. त्याचबरोबर 'हरम'ची व्यवस्था करून मोठ्या प्रमाणात वंशवृद्धी केली.
हरम म्हणजे असे स्थान जिथं अनेक स्त्रिया राहतात आणि या सर्व स्त्रियांचा शरीरसंबंध फक्त एकाच पुरुषाशी येतो. या संबंधांतून जन्मलेल्या सर्व मुलांचा पालक तो एकच पुरुष असतो.
प्रसिद्ध इतिहासकार अता मलिक जुवायनी यांनी 'तारीख-ए-जहांगुषा' हा ग्रंथ चंगेजखानच्या मृत्यूनंतर 33 वर्षांनी लिहिला. त्यात ते लिहितात "त्याकाळी त्याच्या खानदानातले 20 हजार लोक विलासी जीवन जगत होते. मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण वाचक, लेखकावर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करतील आणि म्हणतील इतक्या कमी वेळात एका माणसाची इतकी अपत्ये कशी जन्माला येऊ शकतात?"
या दरम्यान एक विचित्र घटना घडली होती. चंगेझ खानने वयाची साठी पार केली होती. त्याने आपल्या तंबूत पहिल्या बायकोपासून जन्माला आलेल्या चार मुलांची म्हणजे जोची, ओगदाई, चुगताई आणि तोली यांची खास बैठक बोलावली. या बैठकीत त्याचा उत्तराधिकारी कोण असेल, याचा निर्णय होणार होता.
चंगेझ खानने या बैठकीच्या सुरवातीलाच सांगितले, "जर माझ्या सर्वंच मुलांना सुलतान बनायचे असेल आणि एकमेकांच्या हाताखाली काम करायचे नसेल तर एक शेपटीवाला बहुमुखी साप आणि एक तोंड असलेला पण खूप शेपट्या असणाऱ्या दोन सापांची दंतकथा लक्षात ठेवली पाहिजे."
भूक लागल्यानंतर जेव्हा बहुमुखी साप शिकार शोधायला बाहेर पडायचा तेव्हा त्याच्या असंख्य तोंडांचे कोणीकडे जायचे यावर एकमत होत नसे. परिणामी बहुमुखी साप उपासमारीने मेला. तर भरपूर शेपट्या आणि एक तोंड असणारा साप मात्र विनासायास आयुष्य जगला, अशी ही दंतकथा आहे.
त्यानंतर चंगेझ खानने आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला म्हणजेच जोचीला बोलायला सांगितले. पहिल्यांदा बोलण्याची संधी देण्याचा अर्थ होता की अन्य भावांनी जोची याची सत्ता मान्य करावी.
ही गोष्ट दुसऱ्या मुलाला म्हणजे चुगताईला पटली नाही. त्याने वडिलांना विचारले "याचा अर्थ असा की तुम्ही जोचीला उत्तराधिकारी बनवत आहात. पण आम्ही अशा बेकायदेशीर वारसाला प्रमुख कसे मानू?"
40 वर्षांपूर्वीची एक घटना
चुगताईचा इशारा 40 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेकडे होता. तेव्हा चंगेजखानच्या पहिल्या बायकोचे म्हणजेच बोरता खातूनचे शत्रूजमातीने अपहरण केलं होतं. बोरताचा जन्म 1161 मध्ये ओलखोंद जमातीत झाला होता. ही चंगेझ खानच्या बोरजिगन जमातीची मित्र जमात होती.
बोरता आणि चंगेझ खान यांचा साखरपुडा त्यांच्या लहानपणीच झाला होता. नंतर बोरता 17 वर्षांची तर चंगेझ 16 वर्षांचा असताना त्यांचे लग्न झाले.
लग्नानंतर थोड्याच दिवसांत शत्रू जमातीने चंगेझ खानच्या तळावर आक्रमण केलं. त्यावेळी तैमुजीन म्हणजेच चंगेझ खान भावंडं आणि आईसह पळून गेला पण त्याची पत्नी मागेच राहिली. ही शत्रूजमात बोरतासाठीच आली होती.
चंगेझ खानची आई मूळची एका शत्रू जमातीतली होती. चंगेझ खानच्या वडिलांनी तिचं अपहरण करून तिच्याशी लग्न केले होतं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांना बोरताला पळवून न्यायचे होते. बोरता एका बैलगाडीत लपून बसली होती. शत्रू जमातीने तिला शोधून पळवून नेलं.
चंगेझ खान बायकोला शोधण्याचा प्रयत्न करत होता. बोरताला पळवून नेणारी ती भटकी जमात होती. आशियामधल्या हजारो मैल पसरलेल्या पठारांवर ही जमात भटकत असे. चंगेझ खान त्यांच्या मागावर होता. त्याने माणसांची जमवाजमवही सुरू केली होती.
तो म्हणायचा, "त्या जमातीने फक्त माझा तंबूच रिकामा नाही केला, तर माझं हृदयच पळवून नेलं आहे."
सरतेशेवटी ही शत्रूजमात चारशे किलोमीटर दूर सैबेरियाच्या बैकाल झीलजवळ पोहोचली तेव्हा चंगेझ खानने छापा घालून बोरताला सोडवलं.
काही इतिहासकारांच्या मते ही तैमुजीनच्या म्हणजेच चंगेझ खानच्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेने त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. कारण पुढे चंगेजखानने मोठ्या भूभागावर सत्ता स्थापन केली.
बोरताला सोडवून आणण्यात आठ महिने निघून गेले होते आणि त्यानंतर थोड्याच काळात जोची जन्माला आला.
त्यावेळी अनेकदा शंकाकुशंकाचं पेव फुटलं, पण चंगेझ खानने जोचीला स्वतःचा मुलगा मानलं. म्हणूनच आयुष्याच्या शेवटच्या काळात जोचीला उत्तराधिकारी ठरवण्याचा चंगेझ खानचा मानस होता.
चंगेझ खानला वाटलं नव्हतं की चाळीस वर्षांपूर्वीची ही घटना आपल्यावरच उलटेल आणि आपलीच मुलं आपल्या मोठ्या मुलाच्या पालकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करतील.
भावाभावांमध्ये तंटा
चुगताईने केलेला आरोप ऐकून जोची शांत बसू शकला नाही. दोघेही मुद्द्यावरून गुद्द्यांवर उतरले. बैठकीला आलेल्या लोकांनी दोघांना दूर केलं.
चंगेझ खाननं ओळखलं की त्याच्या पश्चात धाकटे भाऊ जोचीला राजा म्हणून कधीच मान्य करणार नाहीत. उलट आपापसात भांडून त्याची राजवट उलथून लावतील.
आता चुगताईनं जोची ऐवजी तिसरा भाऊ ओगदाईला बादशहा बनवण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला धाकट्या भावांनी लगेच पाठिंबा दिला.
चंगेझ खानन मनातून खूप दुःखी झाला होता, पण काही इलाज नव्हता. अखेर तो मुलांना म्हणाला, "पृथ्वीवर अमर्याद जमीन आणि अमाप पाणी आहे. एकमेकांपासून दूर आपापला तंबू उभारा आणि आपापल्या सल्तनतीवर राज्य करा."
आज ज्या व्यक्तीची अपत्यसंख्या कोटींच्या घरात आहे, त्याच्याच मुलांनी, त्याने उत्तराधिकारी ठरवलेल्या एका मुलाला त्याचा मुलगा मानण्यासही नकार दिला होता. हा इतिहासातला एक मोठा विरोधाभासच आहे.
18 ऑगस्ट 1227 रोजी अखेरचा श्वास घेताना चंगेझ खानला सर्वांत जास्त दुःख याच गोष्टीचं झालं असेल, हे मात्र नक्की.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)