You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पद्मावत : रजपूत खरंच शूरवीर होते का?
- Author, हरबंस मुखिया
- Role, मध्ययुगीन भारताचे इतिहासकार
साहित्यातल्या पद्मावतीच्या पात्रावरून सध्या टीव्हीवर रजपूतांच्या अस्मितेचं रक्षण करण्याची चर्चा सुरू आहे. पण प्रश्न निर्माण होतो की खरोखरच इतिहासात राजपूती शान वगैरे असं काही अस्तित्वात होतं का? आणि जर असेल तर त्यात किती सत्य आणि किती भ्रम होता?
रजपूतांचा युद्धात कधीच पराभव होत नाही, असा साधारण समज आहे. तसंच रजपूत पाठ दाखवून पळत नाहीत, असंही समजलं जातं.
एकतर ते युद्ध जिंकतात अथवा प्राणाची आहुती देतात, असं समजलं जातं. पण याला जर सत्याच्या कसोटीवर उतरवून पाहिलं तर इतिहासात असे अनेक प्रसंग दिसतात ज्याआधारे हा समज खोटा ठरतो.
सन 1191 मध्ये तराईनच्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. 1192 साली पुन्हा याच ठिकाणी झालेल्या युद्धात मात्र पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर रजपूतांच्या मुघल, मराठे आदींबरोबर अनेक वेळा लढाया झाल्या, पण त्यांना विजय मिळवता आला. हे एक ऐतिहासिक तथ्य आहे.
पराभव आणि पळ
पृथ्वीराज चौहानसारखा महान योद्धा, ज्यांना शूरतेचं प्रतीक मानलं जातं, तेसुद्धा दुसऱ्यांदा झालेलं युद्ध हरले होते आणि त्यानंतर त्यांना कैद करण्यात आलं होतं.
याचा अर्थ पृथ्वीराज चौहान यांनाही वीरमरण प्राप्त झालेलं नव्हतं. इतकंच नाही तर महाराणा प्रताप यांनाही हल्दी घाटीतल्या युद्धात अकबराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनाही युद्धभूमीवरून चेतक घोड्यावर स्वार होऊन पळ काढावा लागला होता.
औरंगजेबाच्या काळात महाराजा जसवंत सिंह यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
दिलेला शब्द खरंच पाळतात?
तसंच रजपूतांबद्दल दुसरा भ्रम आहे की, रजपूत दिलेलं वचन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतात आणि कुणालाही फसवत नाहीत. याचाही दाखला इतिहासात बघायला मिळत नाही.
प्रत्यक्षात, याउलट एक उदाहरण पाहायला मिळतं. खरं तर हे एक त्रासदायक असं उदाहरण आहे.
1659च्या आसपास दाराशिकोहची पत्नी नादिरा हिनं राजस्थानचे राजे सरूप सिंह यांना तिच्या स्तनांतून दुधाऐवजी पाणी पाजलं होतं. नादिरा यांनी सरूप सिंह यांना मुलगा मानलेलं होतं.
असं सांगतात की, याच नादिराला सरूप सिंहने धोका दिला. औरंगजेबाच्या सांगण्यावरून स्वरूप सिंहनं नादिराचा मुलगा सुलेमान शिकोह याला मारलं होतं.
यामुळे रजपूत वचनाचे पक्के असतात, असंही म्हणता येत नाही.
रजपूतांचं योगदान काय?
बाबर म्हणायचा की रजपूतांना मरायला जमतं, पण जिंकायला नाही जमत. इतिहास कधीच आख्यायिकांना खरं म्हणून दाखवण्याच्या फंदात पडत नाही. तो आख्यायिकांच्या आधारावर सांगितलाही जात नाही.
इतिहास नेहमीच आख्यायिकांना आणि ऐकीव गोष्टींना बाजूला ठेवून सांगितला जातो.
पण अनेकदा रंजक आख्यायिकांची त्यात पेरणी केली जाते. ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं जातं. रजपूत शासक वर्गात मोडत असल्यानं त्यांच्याविषयी बनलेल्या आख्यायिकांवर आश्चर्य वाटायला नको. आधुनिक भारताच्या निर्माणातही रजपूतांची काही ठोस अशी भूमिका नव्हती.
इतिहासातल्या रजपूतांच्या भूमिकेचं मूल्यांकन केल्यास दिसून येईल की, अकबराच्या काळापासून मुघलांच्या साम्राज्याच्या स्थिरतेसाठी आणि प्रसारासाठी रजपूतांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
रजपूत मुघल साम्राज्याचा अतूट हिस्सा बनले होते. सुरुवातीला तर रजपूत अकबराविरोधात युद्धच करत होते.
जवळपास 300 वर्षं रजपूतांनी अनेक सुलतानांविरोधात युद्धं केली होती.
पण रजपूतांना सोबत घेण्याचं धोरणं अकबरानं स्वीकारलं आणि याच धोरणाचा फायदा त्याला साम्राज्याच्या स्थिरतेसाठी आणि विस्तारासाठीही मिळाला.
अकबर आणि औरंगजेबाच्या महत्त्वाच्या योद्ध्यांत महाराजा जय सिंह आणि जसवंत सिंह यांचा समावेश होता.
औरंगजेबाच्या काळात केरळ वगळता संपूर्ण भारतात मुघलांचं राज्य होतं. त्यात रजपूतांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
याच औरंगजेबाने 1679मध्ये पुन्हा एकदा (बिगर मुस्लीम जनतेवर) जिझिया कर लावला. तो नंतर बहादूर शाह औव्वलनं संपुष्टात आणला होता. शेवटपर्यंत रजपूत मुघलांसोबत होते.
मुघलांसोबतच्या संबंधात काही गैर वाटत नाही
रजपूत त्यांच्या साहित्यात मुघलांसोबतच्या संबंधांचा गौरवपूर्ण असा उल्लेख करतात.
रजपूतांनी मुघलांची साथ दिली याची त्यांना काही लाज वाटत नाही.
'बघा मुघल आणि आम्ही किती जवळ आहोत आणि खांद्याला खांदा लावून चालत आहोत,' असं रजपूतांच्या साहित्यात सांगण्यात आलं आहे.
मोहता नैनसी महाराज जसवंत सिंह यांचे सहाय्यक होते. मोहता नैनसी यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. एक मारवाड विगत आणि दुसरं नैनसी दी ख्यात.
या पुस्तकांत रजपूतांनी मुघलांची साथ दिली, याबद्दल काहीही पश्चाताप व्यक्त करण्यात आलेला नाही.
रजपूतांच्या या अभिमानास बगल देण्याचं काम इंग्रज अधिकारी जेम्स टॉड यानं केलं. जेम्स टॉडनं असा समज परसवला की रजपूत मुघलांचे गुलाम होते आणि इंग्रजांनी त्यांना या गुलामीतून मुक्त केले. ही कथा बंगालपर्यंत पोहचवण्यात आली.
पद्मावतीच्या कथित जोहरची गोष्ट तर रजपूतांच्या साहित्यात कुठेच नव्हती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात रजपूत कुठे?
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही रजपूतांची विशेष अशी भूमिका नव्हती. उलट रजपूत राजांनी इंग्रजांचीच साथ दिली.
जेवढे राजे होते, त्यातले तीन-चार वगळता एकानंही इंग्रजांविरोधात लढण्याचं धैर्य दाखवलं नाही.
लक्ष्मीबाईसुद्धा शेवटी नाईलाजास्तव इंग्रजांविरोधात लढल्या. सुरुवातीला लक्ष्मीबाईंनी इंग्रजांसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आलं नाही, म्हणून मग त्यांनी इंग्रजांविरोधात लढण्याचा पर्याय निवडला. लक्ष्मीबाई काही सुरुवातीपासून बंडखोर वृत्तीच्या नव्हत्या.
लक्ष्मीबाई देशासाठी धारातीर्थी पडल्या, असा समज आपण तयार करून ठेवला आहे. हे सर्व समज स्वातंत्र्य युद्धादरम्यान पेरण्यात आले होते.
खरं तर तेव्हा सर्व राजे आपापल्या राज्यांसाठी लढाई लढत होते. देशासाठी कुणी लढत नव्हतं, हे जाहीर आहे.
आपण जातीच्या आधारावर कुणाला श्रेष्ठ अथवा शूर ठरवू शकत नाही. आपण रजपूतांना शूर म्हणू शकत नाही, तसंच ब्राह्मणांनाही विद्वान म्हणू शकत नाही.
यामागे ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वार्थ असतो आणि याच आधारे शासक काम करत असतात.
जातींविषयीच्या आख्यायिका सत्यापासून बऱ्याच लांब असतात. या आख्यायिकांना इतिहासात काहीच जागा नसते.
रजपूती रक्त
वैद्यकीय क्षेत्रात सध्या DNA टेस्टसारखी गोष्ट समोर आली आहे. भारतात कुणी शूद्र असो, ब्राह्मण असो अथवा रजपूत 98 टक्के लोकांचं रक्त एकसारखचं असतं. रजपूती रक्त आणि शुद्धतेची बाब तर निरर्थक आहे.
कोणतीही एकच जात रजपूत बनलीय असं नव्हे. बऱ्याच जातींनी रजपूतांचा दर्जा मिळवला आहे. रजपूतांत खूप साऱ्या जातींचा समावेश आहे. मिश्र रक्त तर सुरुवातीपासूनच आहे.
ही प्रक्रिया तर आताही सुरू आहे आणि आपल्याला याचा अभिमान वाटायला हवा. वंश शुद्धीकरणाची गोष्ट तर हिटलर करत होता.
रजपूत मुघलांसाठी लढले असले, तरी ते शौर्याने लढले हे विशेष. त्यांच्यामुळे मुघलांची संस्कृतीही प्रभावित झाली.
(बीबीसी प्रतिनिधी रजनीश कुमार यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारित हा लेख आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)