You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या भावाच्या मृत्यूचा तपास करा': तरुणाचे 800 दिवसांपासून आंदोलन
- Author, अशरफ पदन्ना
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पोलीस कोठडीमध्ये झालेल्या आपल्या भावाच्या मृत्यूची चौकशी व्हावी, या मागणीसाठी गेले 800 दिवस एक तरुण आंदोलन करतोय. त्रिवेंद्रममध्ये केरळच्या सचिवालयाच्या बाहेर आंदोलन करणारा हा तरुण सोशल मीडियावर स्टार झाला आहे.
त्याचं नाव आहे एस. आर. श्रीजीत. 22 मे 2015पासून त्याचं हे आंदोलन सुरू आहे. श्रीजीतकडं यापूर्वी कुणाचं लक्ष गेलं नव्हतं. पण गेल्या काही दिवसांत सोशल मीडियामुळे त्याच्या आंदोलनाला पाठिंबा वाढला आहे.
रणरणतं उन, थंडी आणि पाऊस याची कसलीही तमा न बाळगता त्याचं हे आंदोलन सुरूच आहे.
त्याचा 26 वर्षांचा भाऊ श्रीजीव याचा पोलिसांनी खून केला, असा त्याचा आरोप आहे. तर पोलिसांच्या मते श्रीजीवला मोबाईल चोरताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली.
पण त्याचे कुटुंबीय म्हणातात श्रीजीवचं एका महिलेवर प्रेम होतं. ही महिला एका पोलीस अधिकाऱ्याशी संबधित असल्यानं श्रीजीवचा खून करण्यात आला. या महिलेचं लग्न दुसऱ्या एका तरुणाशी ठरवण्यात आलं होतं. तिच्या लग्नाच्या एक दिवस आधीच श्रीजीवला अटक करण्यात आली होती.
पोलिसांच्या नोंदीनुसार त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं.
श्रीजीत म्हणाला, "सरकारी हॉस्पिटलमध्ये श्रीजीवला पलंगाला बांधल्याचं मी पाहिलं आहे. त्याला ऑक्सिजन मास्क लावण्यात आला होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण पोलीस कर्मचाऱ्यानं मला त्याच्यापर्यंत जाऊचं दिलं नाही. त्याच्या अंगावर जखमा स्पष्टपणे दिसत होत्या."
या इमारतीत येणाऱ्या आमदारांशी होणारी जुजबी चर्चा वगळता श्रीजीतच्या आंदोलनाकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. पण आता सोशल मीडियावर त्याची दखल घेतली जात आहे.
त्याच्या आंदोलनाचे फोटो फेसबूक आणि ट्विटरवर शेअर केले जात आहेत. हे फोटो शेअर करणाऱ्यांमध्ये सेलेब्रिटींचाही समावेश आहे.
'अय्या'फेम आणि प्रसिद्ध मल्याळी अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यानं श्रीजीतबद्दल लिहिलं आहे. तर अभिनेता टोविनो थॉमस यानंही श्रीजीतची आंदोलनस्थळी भेट घेतली.
#JusticeForSreejith हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय गीतकार गोपी सुंदर यांनी या विषयावर गाणं लिहिलं आहे. 17 जानेवारीला हे गाण अपलोड केल्यानंतर त्याला 5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
या आंदोलानाचा श्रीजीतच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. व्यावसायिक बॉडीबिल्डर असलेल्या श्रीजीतचं वजन 49 किलोनं कमी झालं आहे.
बीबीसीशी बोलताना त्यांनं त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
दबाव वाढू लागल्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणाच्या पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. पण श्रीजीतनं या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
श्रीजीतनं धरणं आंदोलनचं रूपांतर बेमुदत उपोषणात करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला मिळणारा पाठिंबा वाढतोच आहे. अनेकांनी साखळी उपोषण करून त्याला पाठिंबा दिला आहे.
श्रीजीतला पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फेसबुक ग्रुपचे निमंत्रक अखिल डेविस यांनी श्रीजीतला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फार लांबून लोक येत आहेत. जोपर्यंत सीबीआय चौकशी सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही."
मे 2016मध्ये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणानं हा प्रकार कोठडीत क्रूर मारहाणीचा असल्याचं म्हटलं आहे.
त्यावेळी या प्राधिकरणाचे प्रमुख असलेले के. नारायण कुरूप बीबीसीशी बोलताना म्हणाले, "या प्रकरणाच्या तपासासाठी टॉक्जिकॉलॉजिस्ट, फॉरेन्सिक, हस्ताक्षरतज्ज्ञ यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं होतं. हा म्हणजे कोठडीतल्या खुनाचा प्रकार असल्याची माझी पूर्ण खात्री आहे."
राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचं मान्यही केलं आहे. पण सीबीआयनं वाढत्या कामाच्या व्यापाचं कारण देत हे प्रकरण तपासाठी हाती घेतलेलं नाही.
तर गेल्याच आठवड्यात केरळ उच्च न्यालायलयानं हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. तर काही माध्यमांनी सीबीआयनं या प्रकरणाचा तपास हाती घेतल्याच्या बातम्याही दिल्या आहेत.
पण जोपर्यंत सीबीआयनं तपास हाती घेतल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं श्रीजीतनं म्हटलं आहे.
तो म्हणाला, "राजकारणी आणि पोलीस अधिकारी यांना त्यांच्या सोयीचा तपास करायचा आहेत. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. ज्या क्षणी सीबीआय तपास सुरु करेल त्यावेळी मी आंदोलन मागे घेईन."
भारतात कोठडीतल्या मृत्यूंचे प्रकार नवे नाहीत. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्यूरोनं 2010 ते 2015 या काळात त्याची संख्या 519 असल्याचं म्हटलं आहे.
ह्यूमन राईट वॉच या संस्थेनं ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात पोलीस कोठडीतला मृत्यू लपवण्यासाठी आत्महत्या आणि आजारपण या कारणांचा वापर होत असल्याचं म्हटलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)