You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांना प्रिन्स हॅरी यांच्या लग्नाचं आमंत्रण नाही?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाच्या आमंत्रणाविषयी काही माहीत नसल्याचं म्हटलं आहे.
19मे रोजी हे लग्न होत आहे. या लग्नाचं निमंत्रण मिळालं का, या प्रश्नाचं उत्तर देताना याबद्दल काही माहीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
अमेरिकन अभिनेत्री असलेल्या मेगन मार्कल यांनी 2016ला झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला होता. मार्कल यांनी ट्रंप यांच्यावर टीका करताना ते महिला विरोधी आणि वादग्रस्त असल्याचंही म्हटलं होतं.
आयटीव्हीवर पिअर्स मॉर्गन यांना मुलाखत देताना ट्रंप यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांची जोडी छान आहे, असं कौतुक केलं. पण विंडसर कॅसल इथं होणाऱ्या या लग्न समारंभाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "दोघांनी आनंदी राहावं अशीच माझी इच्छा आहे. दोघांची जोडी अगदी छान दिसते."
दावोस इथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेळी मॉर्गन यांनी ही मुलाखत घेतली. इथे ट्रंप यांची युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसमवेत मीटिंग झाली.
मॉर्गन यांची ट्वीट केलं आहे की, थेरेसा मे यांनी ट्रंप यांना यावर्षी दोन लंडन भेटींचं निमंत्रण दिलं आहे. ट्रंप यांनीच त्यांना ही माहिती दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण याला डाउनिंग स्ट्रीटने कोणताही दुजोरा दिलेला नाही.
मे यांच्यापेक्षा आपण कठोरपणे ब्रेक्झिटच्या तडजोडी हाताळल्या असत्या असंही ट्रंप यांनी म्हटलं आहे.
'द मेल'वर रविवारी प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीच्या संपादित भागात ही माहिती आहे. मॉर्गन यांनी ट्रंप यांना विचारलं होतं की, ब्रेक्झिटच्या विषयावर मे यांची स्थिती चांगली आहे का?
यावर ट्रंप म्हणाले, "तडजोड करण्याचीही काही पद्धत असते का? मी याप्रकारे कधीच चर्चा केला नसती. मी ही चर्चा वेगळ्या प्रकारे केली असती."
या मुलाखतीमध्ये मॉर्गन यांनी त्यांना त्यांच्या सोशल मीडियाच्या सवयींबद्दल विचारलं. ते म्हणाले, "मी नेहमी ट्वीट करत असतो. अंथरुणात असताना, ब्रेकफास्टवेळी आणि लंचच्या वेळीसुद्धा. काहीवेळा ट्वीट करण्याचं काम मी दुसऱ्यांवरही सोपवतो."
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीच्या भागात ट्रंप यांनी म्हटलं होतं की, ब्रिटनमधील उजव्या विचारांचा गट ब्रिटन फर्स्टच्या पोस्ट रीट्वीट केल्याबद्दल माफी मागण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
"तुम्ही जर म्हणत असाल की, ते लोक भयंकर आणि वंशभेदी आहेत, जर मी माफी मागावी असं तुम्हाला वाटतं असेल तर मी नक्की तसं करायला तयार आहे", असं त्यांनी म्हटलं होते.
पर्यावरण बदलाच्या पॅरीस करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "मला नक्कीच आवडेल. पण ते अमेरिकेसाठी चांगलं असलं तरच!"
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)