You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपानमध्ये कोट्यवधीच्या डिजिटल करन्सीची चोरी
हॅकिंगद्वारे 3395 कोटी रुपयांच्या व्हर्च्युअल रकमेची चोरी झाली असल्याचं कॉइनचेक या जपानच्या डिजिटल करन्सी एक्सचेंजनं म्हटलं आहे.
कॉइनचेक हे जपानमधल्या सगळ्यांत मोठ्या डिजिटल करन्सी एक्सचेंजपैकी एक आहे. त्यांनी बिटकॉईन व्यतिरिक्त बाकी सर्व क्रिप्टो करन्सीतले व्यवहार बंद केले आहेत.
NEM नावाच्या या व्हर्च्युअल करन्सीमुळे झालेल्या नुकसानाची मोजदाद सुरू आहे.
गुंतवणुकदारांचे पैसे परत करणं कदाचित शक्य होणार नाही, असं कंपनीच्या प्रतिनिधींनी जपानी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं आहे.
या चोरीचा हा आकडा खरा ठरल्यास ही आजवरची सर्वांत मोठी डिजिटल रकमेची चोरी ठरणार आहे.
टोकियोतल्या एमटीगॉक्स या आणखी एका एक्सचेंजनं 2014मध्ये त्यांच्या नेटवर्कमधून 2544 कोटींची चोरी झाल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर या एक्सचेंजमधले व्यवहार ठप्प झाले होते.
कशी झाली चोरी?
कॉइनचेकमधून चोरण्यात आलेली व्हर्च्युअल रक्कम ही इंटरनेटशी संलग्न असलेल्या 'हॉट वॉलेट'मध्ये ठेवण्यात आली होती. त्याशिवाय 'कोल्ड वॉलेट'मध्येही व्हर्च्युअल रक्कम ठेवण्यात येते. हे खातं ऑफलाईन नेटवर्कवर असतं.
चोरण्यात आलेली रक्कम कोणत्या डिजिटल खात्यांवर पाठवण्यात आली, त्याची माहिती आपल्याकडे असल्याचं कॉइनचेकचं म्हणणं आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हॅकरनं शुक्रवारी सकाळी नेटवर्कमध्ये घुसखोरी केला होती. मात्र, ही चोरी झाल्यावर आठ तासांनी त्यांच्या ते लक्षात आलं.
सुमारे 3395 कोटींच्या NEMची चोरी झाल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी युसूके ओतसूका यांनी सांगितलं.
या हॅकिंगचा फटका किती ग्राहकांना बसला, हा हल्ला कुठून करण्यात आला, याचा माहिती कॉइनचेक घेत आहे.
ही सगळी रक्कम कुठे पाठवण्यात आली, याचा शोध घेण्यात आला आहे. ही सगळी रक्कम पुन्हा मिळवता येईल, असा विश्वास ओतसूका यांना वाटतो.
या चोरीची माहिती कॉइनचेकनं पोलीस आणि इतर संस्थांना दिली आहे.
ब्लूमबर्ग एजन्सीनुसार, जगातली दहाव्या क्रमांकाची क्रिप्टो करन्सी असलेल्या NEMच्या बाजारभावात 11 टक्क्यांची घट झाली आहे. त्याची किंमत 87 सेंट एवढी कमी झाली आहे.
त्याचवेळी बिटकॉईनच्या दरात 3.4 टक्के तर रिप्पलच्या दरात 9.9 टक्क्यांनी घट झाली आहे.
2012 मध्ये टोकियोमध्ये स्थापन झालेल्या कॉइनचेकया कंपनीत ऑगस्ट-2017 पर्यंत 71 कर्मचारी कार्यरत होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)