राज-उद्धव ठाकरेंना राहुल गांधी अचानक जवळचे का वाटतायत?

    • Author, रवींद्र मांजरेकर
    • Role, बीबीसी मराठी

सहा वर्षांपूर्वी मोदींच्या निमंत्रणावरून गुजरातला जाणाऱ्या राज ठाकरेंनी आता हे कार्टून काढलंय, यावरून एकच गोष्ट म्हणता येईल - राजकारणात काहीही अशक्य नसतं.

राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रसिध्द केलं. गुजरात निवडणुकांच्या निकालावर एका महिन्यानंतर भाष्य करताना राज यांनी राहुल गांधींची स्तुती केली आहे. दुसऱ्या नंबरवर असले तरी राहुल मोदींपेक्षा मोठे आहेत, असं या व्यंगचित्रात दाखवलं आहे.

व्यंगचित्राखाली राज ठाकरे लिहितात, "सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' व्यंगचित्रं तुम्ही पाहिलं असेलच. पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी होते. त्यातलेच काही माझे फटकारे."

2014च्या निवडणुकांनंतर राज यांच्या लक्षात आलं की मोदी आणि त्यांच्या पक्षासोबत युती होणं कठीण आहे. त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली. गुजरातच्या निवडणुकांदरम्यान पहिल्यांदा त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल यांची स्तुती केली.

"नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरले," असं विधान त्यांनी केलं.

विरोधक एकत्र येतील?

'शत प्रतिशत भाजप' या अमित शहांच्या धोरणामुळे शिवसेना आणि मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे. भाजप आता भरवशाचा मित्र नाही, असं या दोन्ही पक्षांना वाटू लागलं आहे.

म्हणूनच शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसबद्दलची त्यांची भूमिका तुलनेनं मवाळ झालेली दिसते.

"भाजपला पराभूत करायचं असेल, तर काही एक वेगळं धोरण ठरवावं लागेल, याची जाणीव सगळ्या विरोधी पक्षांना झालेली आहे. त्यातून भाजपला शह देण्यासाठी परस्परपूरक राजकारण केलं जाईल," अशी शक्यता पत्रकार संदीप प्रधान व्यक्त करतात.

राज ठाकरे हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेमके कसं वागतील, याचा अंदाज बांधता येत नाही, असं ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र सांगतात. राज यांना मित्रपक्षाची गरज लागेल हे नक्की, त्यामुळे काँग्रेस त्यांचा वापर करू शकेल, अशी शक्यता मिश्र व्यक्त करतात.

"राज यांचं हे भाष्य हे भेदक आणि मार्मिक आहे. मात्र ते तात्कालिक आहे. त्यावरून ते काँग्रेसच्या जवळ जात आहेत, असं म्हणता येणार नाही. शिवाय, हे व्यंगचित्र म्हणजे त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असंही मानता येणार नाही."

शिवसेनेचं राहुल प्रेम?

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी शिवसेनेनं 2019 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

'मोदींनी अहमदाबादमध्ये पतंग उडवण्यापेक्षा श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवावा', 'नौदलात जे शौर्य आहे, ते 56 इंच छातीत नाही', 'गाय मारणं पाप आहे, तसंच थापा मारणं पाप आहे' असं म्हणत त्यांनी मोदींचा पराभव करण्याचं आवाहन केलं. पण त्यांचा पक्ष भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत कायम राहणार आहे की नाही, याविषयी त्यांनी सोयीस्कर मौन बाळगलं.

जाहिरातबाजी करणाऱ्या या सरकारपेक्षा काँग्रेसचा गोंधळ बरा होता, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'रोखठोक' या त्यांच्या सदरात राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली होती.

'विकास व भ्रष्टाचार याबाबत राहुल गांधी यांनी काही मूलभूत प्रश्न गुजरात प्रचारात उभे केले. त्यांची उत्तरं शेवटपर्यंत मिळाली नाहीत. राहुलनी त्यांचा घोडा रणाच्या मध्यभागी नेला व ते लढले. लोक लढणाऱ्याच्या मागे उभे राहतात. मी काँग्रेसचा समर्थक नाही, पण राहुलच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष उभा राहत असेल तर त्यांचे स्वागत असो.'

पण गेल्या तीन दशकांतलं शिवसेनेचं पूर्ण राजकारण काँग्रेसच्या विरोधावर बेतलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जवळ येण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांना पटत नाही.

"शिवसेनेला सोबत घेतलं तर काँग्रेसला त्याचे परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणवतील. त्यामुळे अशी आघाडी संभवत नाही," असं प्रधान म्हणतात.

तर अंबरीश मिश्र म्हणतात, "उध्दव ठाकरे यांना काहीही करून भाजपला सत्तेवरून खाली खेचायचं आहे. पण त्यासाठी त्यांना काँग्रेससोबत जाणं उपयोगाचं होईल असं वाटत नाही. त्यांचा नैसर्गिक सहयोगी मनसे आहे. पण ते एकत्र न येण्याची अनेक कारणे आहेत."

काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांना दिसत नसली, तरी 2014 नंतर भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळेच आधी सेनेवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींनी बाळ ठाकरेंचं स्मरण केलं आहे.

पण भाजपविरुद्ध बडी आघाडी हे रेखाटन चांगलं आहे, पण त्यात रंग भरता येणार नाहीत, असं मिश्र यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)