You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पद्मावत रिव्ह्यू : 'राजपूतांच्या या गौरवगाथेने भावना का दुखावल्या?'
- Author, राजेश जोशी
- Role, रेडिओ एडिटर, बीबीसी हिंदी
सध्याच्या वातावरणात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत'चा राजकीय संदर्भ काय आहे, याबाबत सांगत आहे बीबीसी हिंदी रेडिओचे संपादक राजेश जोशी.
संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात भव्य सेट आहे, भरपूर रंगीबेरंगी दृश्यं आहेत आणि आणखी बऱ्याच गोष्टी :
- भाले-काठ्या आणि ढाल-तलवारी हातात घेऊन एकमेकांच्या जीवांवर उठलेले हजारो घोडेस्वार
- धुळीने काळवंडलेले महाकाय हत्ती युद्धाच्या मैदानात आगगोळे ओकणाऱ्या तोफा ओढत आहेत
- आकाशाला भेदणारे तुतारीचे स्वर
- राजपूत आणि सल्तनतच्या संपदेचं दर्शन घडवणारे, डोळ्यांचं पारणं फेडणारे, कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले भव्य सेट
- अद्भूत पण विश्वसनीय असं संगीत
दिल्लीतील एका थिएटरमध्ये काही लोकांसाठी एक शो आयोजित करण्यात आला होता. थ्री डी चष्मा लावून हा शो पाहिल्यावर असं वाटत होतं की आपणही या सिनेमातले एक अदृश्य पात्र असून या कथेचे आणि घटनांचे साक्षीदार आहोत.
ही तर झाली भन्साळींच्या कलात्मक आणि तंत्र कौशल्याची कमाल. पण जर पद्मावत सिनेमाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या सिनेमात असलेल्या भोजनाच्या दृश्यांकडं बारकाईनं पाहायला हवं. आपल्याकडे तर हल्ली खानपानाच्या आवडीनिवडींवरूनच हिरो कोण आणि व्हिलन कोण, हे ठरवलं जात आहे.
'पद्मावत'मध्ये एकीकडे मांसावर तुटून पडण्याआधी जनावराप्रमाणं त्याचा वास घेणारा अल्लाउद्दीन खिलजी आहे, तर दुसरीकडे एखाद्या साधकासारखं शांत चित्ताने बसून सात्त्विक जेवण खाणाऱ्या नम्र पण शिस्तप्रिय पतीला पंख्यानं वारा घालणारी पद्मावती आहे.
एका बाजूला, मोठ्या प्राण्याला आचेवर भाजून त्याचं मांस ओरबडून खाणारे, आपल्या शत्रूंच्या पाठीत धोक्यानं खंजीर खुपसणारे पाशवी हल्लेखोर मुसलमान आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपलं वचन पाळण्यासाठी प्राणांची आहुती देण्यासाठी तयार असलेले हिंदू राजपूत राजा रतन सिंह आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मुस्लिमांची जी साचेबद्ध प्रतिमा तयार केली गेली आहे, त्याचा वापर संजय लीला भन्साळी यांनी आपल्या चित्रपटात केला आहे. त्यांनी राजपुतांना वचन पाळणारे नायक आणि मुस्लीम हल्लेखोरांना कावेबाज व्हिलन दाखवलं आहे. पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आणि राजपूत हिंसेच्या जोरावर सिनेमा बंद पाडण्याची धमकी देऊ लागले.
ज्या काळात मोहम्मद अखलाक, पहलू खान आणि जुनैदसारख्या लोकांना मुस्लीम असल्यामुळं जिवानिशी मारलं गेलं. सामान्य मुस्लीम माणसाला काश्मीर आणि पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादावरून हिणवलं जात आहे, नको ती उत्तरं मागितली जात आहेत. मिशी काढून दाढी ठेवणाऱ्या लोकांकडे संशयानं पाहिलं जात आहे, या पार्श्वभूमीवर दैत्यासारख्या खिलजींविरुद्ध राजपुतांच्या संघर्षाची कहाणी या सिनेमात मांडली गेली आहे.
पहिली झलक
अफगाणी पगडी आणि डोळ्यांत काजळ घातलेला पहाडासारखा धिप्पाड माणूस मांस खात आहे. एखाद्या जल्लादासारखा दिसणारा हा माणूस दिल्लीचा भावी सुलतान आहे, त्याचं नाव जलालुद्दीन खिलजी.
जलालुद्दीन खिलजी ज्या दालनात उभा आहे त्याच दालनाच्या कोपऱ्यात एक मोठ्ठा प्राणी आचेवर भाजला जात आहे. त्याच्या आजूबाजूला पगडी घातलेले आणि मिशी छाटलेले पण दाढी असलेले 10-12 दरबारी आहेत. हे अफगाण लुटारू आहेत, जे दिल्लीवर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करत आहेत.
शहामृगाला कुत्र्यासारखं साखळीला बांधून एक उंच आणि गर्विष्ठ तरुण त्या दालनात प्रवेश करतो. हा आहे जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी. त्याच्या चुलत बहिणीने त्याला शहामृगाचं पंख मागितलं तर त्याने पूर्णच शहामृग आणलं. का? तर त्याला आपल्या चुलत बहिणीशी लग्न करायचं आहे. जगातल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्यांची मालकी आपल्याकडे असावी, असं अल्लाउद्दीन खिलजीला वाटतं.
सिंहल बेटांवरची (श्रीलंका) राजकुमारी पद्मावती ही तिच्या आरसपानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या पद्मावतीचं लग्न त्यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या मेवाडचा राजा रतन सिंह सोबत थाटामाटात लावून दिलं जातं.
मग चक्र फिरवून 'ऊँ मणि पद्मे हुम्'चा जप करणारी ही बौद्धकन्या लग्नानंतर एका राजपूत महिलेचं रूप धारण करते. ती तिच्या नव्या भूमिकेत इतकी समरसून जाते की तलवार हीच क्षत्रिय महिलेची बांगडी आहे, असं ती म्हणते आणि चित्रपटाच्या शेवटी जोहर करण्यासाठी ती शेकडो क्षत्रिय महिलांसोबत आगीत उडी मारते.
या कहाणीत राजा रतन सिंह यांच्या राजगुरूंना पद्मावती आपल्या राज्यातून हाकलून देते. हाच राजगुरू अल्लाउद्दीन खिलजीकडे जातो आणि पद्मावतीच्या सौंदर्याची स्तुती करतो.
मग पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडावर चाल करून येतो आणि चित्तोडगढाला चहुबाजूंनी सैन्याने वेढतो. अल्लाउद्दीन खिलजी आत्मसमर्पण करण्याच्या बहाण्यानं किल्ल्यात प्रवेश मिळवतो. सर्वकाही पद्मावतीची एक झलक दिसावी म्हणून.
पण त्यात त्याला यश येत नाही, आणि अखेर तो राजा रतन सिंहाला आपल्या छावणीत येण्यासाठी निमंत्रण देतो.
आणि मग दोघांमध्ये युद्ध सुरू होतं.
थ्री डी तंत्रज्ञान
संजय लीला भन्साळी हे चित्रपटांच्या भव्यतेसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या या तंत्रकौशल्याने अगदी हुबेहूब भव्य रणांगण उभं केलं. थ्री डी तंत्रज्ञानामुळं तर असं वाटतं की जणू आपण रणांगणातच उभे आहोत.
भेदक तुताऱ्यांनी रणांगण दुमदुमून जातं आणि तलवारींच्या खणखणाटानं सुरू होते राजपुतांच्या स्वाभिमानाची कहाणी -
- मुंडकं छाटलं गेलं तरी बेहत्तर पण कुणासमोरही झुकायचं नाही
- राजपूत आपला शब्द पाळण्यासाठी सर्व गोष्टींवर पाणी सोडायला तयार असतो
- जर राजपुताने एकदा कुणाचा पाहुणचार केला तर त्याच्यावर तो तलवार उगारणार नाही हा त्याचा नियम
- आपल्या शत्रुच्या तावडीत जरी राजपूत सापडला तरी तो तह करत नाही
- राजपूत आपल्या शत्रूलाही धोका देत नाही
- क्षत्रिय महिला आपल्या शील आणि लज्जेचं रक्षण करण्यासाठी प्राणाची आहुती सुद्धा देऊ शकते.
हा सिनेमा पाहून राजपूत हे सुपरह्युमन आहेत, असं वाटतं. हे पाहून तर एखाद्या राजपुताने तर खूश व्हायला हवं. सिनेमाच्या शेवटी राजपूत महिला जोहर करतात. राजस्थानमध्ये असे अनेक लोक भेटतील की जे अजूनही सती प्रथेचं गुणगान करताना दिसतील.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल 30 वर्षांपूर्वी राजस्थानच्या देवरालामध्ये रूपकुंवर नावाच्या युवतीला तिच्या पतीच्या चितेवर जाळण्यात आलं होतं. त्या वेळी जे लोक सती प्रथेला विरोध करत होते, त्यांच्याविरोधात अनेक राजपूत संघटनांनी दंड थोपटलं होतं. सध्या जसा करणी सेनेचा सूर आहे तसाच सूर त्या वेळी या राजपूत संघटनांचा होता.
या सर्व गोष्टींचा समावेश असूनही राजपूत करणी सेनेच्या नेमक्या कोणत्या भावना दुखावल्या जात आहेत?
खिलजीला बदमाश, खूनशी, धूर्त, कावेबाज, निर्घृण आदी दाखवलं आहे. पण यामुळं कुण्या मुस्लीम व्यक्तीनं आपल्या भावना दुखावल्याची तक्रार केल्याचं माझ्या ऐकण्यात तरी आलं नाही.
भारतातला कुणी मुस्लीम स्वतःला खिलजींचा वंशज मानत असेल का? जरी कुणी मानत असला तरी अल्लाउद्दीन किंवा जलालुद्दीन खिलजीला निर्घृण दाखवल्यामुळं त्याला काही फरक पडला असेल का?
मग मला हेच कळत नाही जर करणी सेनेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यावर मलमपट्टी करण्यासाठी चार राज्यामधली सरकार का उतावीळ झालं आहे?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सिंहल बेटांवरील बौद्धकन्येला राष्ट्रमाता म्हणत आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं तर पद्मावतीचा रोल करणाऱ्या दीपिका पदुकोणचं डोकं छाटून आणणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
सर्व हरकतींना बाजूला सारून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पद्मावतच्या रिलीजसाठी अखेर 25 जानेवारी ही तारीख जाहीर केली. पण या गोष्टीशी भाजप सरकारांना काही देणं-घेणं नाही.
पण खरी घालमेल संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या फायनांसर्सची झाली आहे. त्यांनी राजपूतांची गौरवगाथा बनवली पण ते राजपूतच त्यांच्यावर नाराज झाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)