You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवऱ्यानं सोडल्यानंतर मी स्वत:च्या प्रेमात पडले
माझा नवरा ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या प्रेमात पडला. ही सहकारी आवडली म्हणून त्यानं मला सोडून दिलं आणि तिच्याशी लग्न केलं. एका झटक्यात माझा 15 वर्षांचा संसार संपुष्टात आला.
त्या रात्री नवरा घरातून निघून गेला आणि माझं अवघं विश्व हादरलं. खूप मोठं संकट कोसळल्यासारखं वाटलं.
माझ्या मनात सुरू असलेल्या कोलाहलाची बाहेर कुणालाही कल्पना नव्हती. आजूबाजूला होती ती फक्त काळजाचा थरकाप उडवणारी भयाण शांतता.
आम्ही दोघांनी 17 वर्षं सोबत घालवली होती. या 17 वर्षांतल्या कडू-गोड आठवणींना सोबत घेऊन माझ्या 10 वर्षांच्या मुलीबरोबर मी एकटी राहिले होते.
तो सोडून गेल्यावरही मी त्याला वारंवार फोन करत होते. पण "आपलं लग्न, आपलं नातं आता संपलं आहे," असं कोरडेपणानं म्हणून तो मोकळा झाला होता. त्याला यात काहीही चुकीचं वाटत नव्हतं.
तो आणि त्याची ऑफिसमधली सहकारी यांचं प्रेमप्रकरण सुरू आहे, असं मला त्याच्या मित्रांकडून फार उशीरा कळलं.
धक्का बसणे हा वाक्प्रचार तोकडा पडेल असं काहीसं वाटलं तेव्हा. पायाखालची जमीन सरकली. स्वत:ला संपवून टाकावंसं वाटलं. काहीही विचार न करता मी औषधाचा ओव्हरडोस घेतला. तेव्हाच संपले असते मी, पण वाचले!
त्याच्याविना मी आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हते. माझ्या आयुष्यभराच्या प्रेमाला मी दुसऱ्या स्त्रीसोबत असं बघू शकत नव्हते. पण मला ते सहन करावं लागत होतं.
हे सत्य असलं तरी ते स्वीकारायची मात्र माझी तयारी नव्हती. माझा पती दुसऱ्या स्त्रीसोबत वाटून घ्यायला मी अजिबात तयार नव्हते.
प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.
दु:ख आणि जळफळाटानं माझ्यावर ताबा मिळवला होता. या सगळ्यासाठी मी त्या स्त्रीला दोष देत होते, शिव्याशाप देत होते. पण मी हे विसरले होते की, माझा स्वत:चा नवराही यात तिच्याइतकाच दोषी होता.
पण हे काही अचानक घडून आलं नव्हतं. हळूहळू अनेक बाबी माझ्या लक्षात यायला लागल्या आणि मला या प्रकरणाचा उलगडला व्हायला लागला.
मागील काही दिवसांपासून त्यानं माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. मी दिसायला काही खूप सुंदर वगैरे नव्हते. तसंच खूप जास्त कमवतही नव्हते.
मी माझ्या नवऱ्यात होणारे बदल अनुभवत होते. 'मी नशिबवान आहे म्हणून तू मला भेटलीस' असं म्हणणारा तो आता 'तू माझ्या आयुष्यात असणं माझं दुर्दैव आहे' असं म्हणत होता.
'तू सुंदर दिसतेस' असं म्हणणारा तो आता 'माझ्याशेजारी उभं राहण्याची तुझी योग्यता नाही' असं म्हणायला लागला होता.
त्याच्या ऑफिसमधल्या प्रेयसीच्या तुलनेत मी कदाचित मॉडर्न नसेन किंवा मी त्याच्यासाठी तसे मॉडर्न कपडे घातले नसतील.
'तुला इंग्रजी बोलता येत नाही, कोण नोकरी देणार तुला?' असं बोलून तो मला हिणवायला लागला. यामुळे मी फक्त त्याच्याच नाही तर स्वतःच्या नजरेत सुद्धा उतरत चालले होते. त्याला आवडणाऱ्या स्त्रीच्या बरोबरीची मी नाही, असं मला वाटायला लागलं.
संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर टाकण्यात आली होती. किराणा माल आणण्यापासून ते कुणी आजारी असेल तर त्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व कामं माझ्यावर थोपण्यात आली होती. माझं जग घरापुरतंच मर्यादित ठेवण्यात आलं होतं.
पार्टी, डिनर आणि इतर कार्यक्रमांसाठी मला सोबत घेवून जाण्याचं नवऱ्यानं थांबवलं होतं.
ज्या व्यक्तीवर मी सर्वाधिक प्रेम केलं ती व्यक्ती माझ्यापासून दूर जात होती, मला सोडून जात होती. हळूहळू त्याचं माझ्यावरचं प्रेम संपुष्टात आलं.
नात्यातला ओलावा परत आणण्यासाठी मी प्रयत्न केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही आणि एका रात्री तो घर सोडून निघून गेला.
त्यानंतर तो दुसरीकडे राहायला गेला. मी आणि माझी मुलगी सासू- सासऱ्यांसोबत राहू लागलो.
सासू-सासऱ्यांना मी हवी होते अशातला भाग नव्हता. पण तो परत येईल या आशेपोटी मी तिथं राहत होते.
दरवाजावर पडलेल्या प्रत्येक थापेवर माझं लक्ष असे. आशा हीच होती की तो परत येईल. पण दरवाजावरची थाप कुरिअर घेवून येणाऱ्या मुलाची अथवा घरकाम करण्यासाठी आलेल्या बाईची असे. क्षणार्धात माझ्या आशेचं रुपांतर निराशेत होत असे.
माझं अवघं विश्व मी त्याच्याभोवती गुंफून ठेवलं होतं. माझं वय झालं होतं. नवीन सुरुवात करण्याची ही वेळ नव्हती.
मला वाटलं आमचं नातं वाचवण्यासाठी मी लढायला हवं आणि मी लढले देखील. मी अनुभवत असलेला मानसिक धक्का समजून घेण्यासाठी माझी मुलगी खूप लहान होती. त्यामुळे मी या लढाईत एकटीच होते.
माझं आरोग्य बिघडत होतं, त्याच्या खांद्यावर विश्रांती घेण्याची इच्छा होत होती. त्यानं केलेल्या जखमा भरून काढण्यासाठी मला तोच हवा होता.
त्यानं घटस्फोस्टासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. तरीही मी लढत होते. फार पूर्वीच संपलेलं लग्न वाचवण्यासाठी मी लढतेय, याची जाणीव होण्यासाठी मला तीन वर्षं लागली. अशा माणसासाठी मी लढत होते जो आता माझ्या आयुष्यात नव्हताच.
शेवटी मी थकले. कोर्टाच्या चकरा, वकिलांच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यासाठी येणारा खर्च हे सर्व करता करता मी थकले.
मी घटस्फोटासाठी तयार झाले आणि माझ्यावर घटस्फोटिता असा शिक्का बसला. असा एक शिक्का ज्याला पारंपरिक समाजात काहीही आदर नाही.
त्यावेळी माझं वय 39 वर्षं होतं. घर शोधणं माझ्यासाठी सर्वांत मोठं आव्हान होतं. तुझा नवरा कुठे आहे? तो काय कामधंदा करतो? अशा प्रश्नांना मला सामोरं जावं लागत होतं.
पण या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार नव्हते. शेवटी माझ्या मित्रमैत्रिणींनी मला यातून मुक्त केले. ते माझ्या आयुष्यात देवासारखे धावून आले. स्वत:ला सिंगल मॉम म्हणवून घेण्याचं धैर्य त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एकवटू शकले. हे काही सोपं काम नव्हतं.
तिकडे त्यानं त्या स्त्रीबरोबर संसार थाटला. जेव्हा मी त्या दोघांना एकत्र बघत असे, माझ्या जखमा परत भळभळायला लागत. माझ्या आई-वडिलांचं निधनही त्याच सुमारास झालं. सगळं वाईट एकाच वेळी घडत होतं.
घर सोडताना माझ्याजवळ फक्त दोनच गोष्टी होत्या. एक नोकरी आणि दुसरी माझी मुलगी.
मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि कॉर्पोरेट क्षेत्रात एकावर एक पायरी चढत गेले. स्वत:ला वाचन आणि लेखनात गुंतवून ठेवलं. मला लेखनाचा छंद असल्यानं ब्लॉग लिहायला सुरुवात केली.
मी हळूहळू बदलत होते. कात टाकत होते. नवऱ्यासाठी जेवण रांधणारी मी आता माझ्या मित्रांसाठी नवनवे पदार्थ बनवायला लागले. पार्टी करायला लागले, लहानलहान सहलींना जायला लागले आणि त्या फोटोंचा संग्रह करायला लागले. जुन्या अल्बमच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी मला हाच नवा संग्रह कामी आला.
त्याच्या अनुपस्थितीची पोकळी भरून काढण्यासाठी सोशल मीडियाच्या आभासी जगात नवीन नवीन मित्र बनवायला लागले. या दुनियेमुळे आणि त्यातल्या संवादामुळे मला माझ्या भोवताली मोठं जग असल्याचं लक्षात आलं.
फेसुबकवरच्या माझ्या पोस्ट्सना मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा एकटेपणा दूर झाला. माझं कुटुंब म्हणजे माझं विश्व आहे, असं मला पूर्वी वाटायचं. पण मी आता माझं विश्व विस्तारलं होतं.
जमेल तेव्हा मी वंचित मुलांसाठीच्या संस्थेत काम करू लागले. हीच बाब माझ्या सकारात्मक ताकदीचा मौल्यवान स्रोत बनली.
एव्हाना मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात परतले होते. माझ्या ताकदीची मला जाणीव झाली होती. मी माझी डॉक्टरेट पूर्ण केली. आयुष्यानं माझ्यापासून हिरावून घेतलेल्या गोष्टी मी परत मिळवल्या होत्या. शरमेनं घरी बसण्यापेक्षा मी संमेलनं, सोहळे यात भाग घेऊ लागले. चांगल्या साड्या नेसायला लागले. आनंदी राहू लागले. 'सिंगल वुमन'नं तेही घटस्फोटितेनं नेहमी दु:खी असायलं हवं, असं ज्यांना वाटतं त्यांना माझं हे उत्तर होतं.
यामुळे अनेकांच्या भुवया उंचावत होत्या आणि माझ्या डोळ्यांत मात्र प्रतिकाराचा तेजस्वीपणा येत होता. मी स्वत:चं घर घेतलं. कामानिमित्त परदेशात जायची संधीही मिळाली.
चार वर्षांनंतर मला नवीन नोकरी मिळाली. तेव्हा मी माझं ओळखीचं शहर सोडून नवीन शहरात जाण्याचा निर्णय घेतला. एक स्वतंत्र स्त्री म्हणून माझा पुनर्जन्म झाला होता.
मला आज कुणाच्याही खांद्याची गरज नाही. मी एकटी आयुष्याची अंधारी वाट चालू शकते याचा अगदी पूर्ण विश्वास आहे आता.
(दक्षिण भारतातल्या एका स्त्रीची ही कहाणी. बीबीसी प्रतिनिधी पद्मा मीनाक्षी यांनी हे वृत्तांकन केलं आहे तर दिव्या आर्य यांची ही निर्मिती आहे. स्त्रीच्या विनंतीवरून तिचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. )
हे वाचलंत का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)