पूर्व आणि पश्चिम - केवळ दिशाच नव्हे तर विचारांची तोंडंही परस्परविरुद्ध का?

    • Author, डेव्हिड रॉबसन
    • Role, बीबीसी फ्युचर

पूर्व आणि पश्चिम या ना केवळ विरुद्ध दिशा आहेत, पण त्या नेहेमीच एकमेकांच्या विरोधात असतात. शास्त्रोक्त सिद्धांतानुसार पूर्व आणि पश्चिम विचारसरणीत फरक पडत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

1871 साली होक्काइडो बेटांजवळच्या प्रदेशातून प्रवास करत असताना हॉरेस कॅप्रन हे सतत तिथल्या विस्तीर्ण कुरणांमध्ये, ओसाड जमिनींवर आणि भयावह पर्वतांमध्ये मानवी अस्तित्वाच्या खुणा शोधत होतो. ते लिहितात की, "त्या भव्य पटलावर मृत्यूच्या स्तब्धतेचंच राज्य होतं. पानांचा सळसळाट नाही, पक्ष्यांचं कूजन नाही आणि कुठल्याही जीविताची चाहूल नाही."

त्यांना वाटलं की हा जणू काही इतिहासपूर्व काळातून आलेला एक कालशून्य प्रदेश होता.

"हा संपन्न आणि सुंदर प्रदेश, जो जगातल्या सर्वांत जुन्या आणि दाट लोकसंख्येच्या देशाची संपत्ती आहे, आफ्रिकन वाळवंटांप्रमाणेच इतका काळ अज्ञात आणि निर्वासित कसा राहिला, याचंच आश्चर्य वाटतं," असंही ते म्हणाले.

ही जपानची हद्द होती... अगदी अमेरिकेच्या 'वाईल्ड वेस्ट'प्रमाणे. होक्काइडो हे जपानी बेटांमधलं उत्तरेकडील दूरवरचं एक बेट. पलीकडे असलेलं हाँशू बेट आणि होक्काइडो यांच्यात खवळलेला समुद्र होता. हे अंतर पार करू पाहणाऱ्या प्रवाशांना जीवघेण्या थंडीला, कणखर ज्वालामुखीय प्रदेशाला आणि रानटी श्वापदांना सामोरं जावं लागायचं. यामुळेच जपानच्या सरकारनं हे बेट शिकार आणि मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिथल्याच आयनू लोकांच्या भरवशावर सोडलं होतं.

हे सगळं 19व्या शतकाच्या मध्यावर बदलणार होतं. रशियन आक्रमणाच्या भीतीनं जपान सरकारने त्यांच्या उत्तरेतला हा प्रदेश पुन्हा वसवण्याचं ठरवलं, आणि होक्काइडो वसवण्याची जबाबदारी समुराय असणाऱ्यांना दिली. त्यानंतर इथे तेजीने वस्ती वाढत गेली. शेती, बंदरं, रस्ते आणि रेल्वेचं जाळं या बेटांवर पसरलं. नवीनच वसलेल्या या लोकांना उत्तम शेती करण्याचं मार्गदर्शन करण्यासाठी कॅप्रनसारख्या अनेक अमेरिकन कृषीतज्ज्ञांची नियुक्ती झाली. अवघ्या सत्तर वर्षांतच बेटाची लोकसंख्या काही हजारांवरून २० लाखांवर गेली. नवं सहस्रक सुरू होताना हा आकडा साठ लाख इतका झाला होता.

होक्काइडोमध्ये राहणाऱ्या मोजक्याच लोकांवर या रानटी आणि ओसाड प्रदेशावर मात करण्याची वेळ आली असावी. तरीसुद्धा 54 किलोमीटरवर असलेल्या हाँशू बेटांवर राहणाऱ्या लोकांपेक्षा इथल्या लोकांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या विचारसरणीवर अग्रणी जिद्दीचा आणि चिकाटीचा प्रभाव दिसतो. ते अधिक स्वयंभू, मानी आणि स्वतःच्या प्रगतीविषयी महत्त्वाकांक्षी आहेत. आपल्या भोवतालच्या लोकांशी ते कमी जोडलेले आहेत. इतर देशांशी तुलना करता, ही कॉग्निटिव्ह प्रोफाईल म्हणजे जाणिवा-नेणिवांची जडणघडण जपानच्या मनोवृत्तीपेक्षा अमेरिकन मनोवृत्तीकडे झुकणारी आहे.

सामाजिक वातावरण आपल्या बुद्धीला कसं वळण देतं, हे दाखवणारी होक्काइडोची कथा अशा अनेक अभ्यासांपैकी एक आहे.

पूर्व आणि पश्चिमेमधील ठळक फरक असोत किंवा अमेरिकेतल्या राज्यांमधील सूक्ष्म वैविध्य, आपला इतिहास, भूगोल, संस्कृती आपल्या विचारांवर आणि आपल्या दृष्टीवर इतकंच नाही तर आपल्या आकलनावर अज्ञातपणे आणि आश्चर्यकारक परिणाम करू शकतात हेच यातून दिसून येतं. आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या पिकांचा आपल्या विचारांवर प्रभाव असू शकतो, तसंच एखादी नदी दोन भिन्न आकलन शैलींची सीमारेषा ठरू शकते.

आपण कुठेही राहिलो तरी, या सगळ्या ताकदींची जितकी अधिक जाणीव आपल्याला होईल, तेवढया जास्त प्रकर्षांनं आपण स्वतःच्या मनाच्या खोलीचा अंदाज घेऊ शकू.

'WEIRD' मनं

अगदी आतापर्यंत विचारसरणींतल्या वैश्विक विविधतेकडे शास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केलं. 2010साली 'बिहेवेरिअल अँड ब्रेन सायन्सेस' या प्रतिष्ठित नियतकालिकातील एका लेखात असं म्हटलं आहे की, मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी आलेल्या लोकांपैकी बहुतांश लोक हे "Western, Educated, Industrialised, Rich and Democratic", म्हणजेच 'WEIRD' होते. यातील 70% लोक अमेरिकन होते आणि त्यातील बहुतांश हे पदवीचं शिक्षण घेणारे, वरखर्चाला पैसे मिळावे किंवा कोर्स क्रेडिट मिळावं या उद्देशानं या संशोधनात भाग घेणारे विद्यार्थी होते.

यामागे असं गृहितक होतं की, हा समूह मानवी स्वभावातील 'सगळी माणसं सारखीच असतात' या मूलभूत सत्याचं प्रातिनिधिक रूप असेल. हे जर खरं असतं, तर या अभ्यासात दिसलेला पाश्चिमात्य कल गौण ठरला असता. तरीही, ज्या थोडक्या अभ्यासांमध्ये इतर संस्कृतींमधल्या लोकांचा सहभाग होता त्यानुसार हे सत्यापासून दूर आहे असं वाटतं. असाच एक अभ्यास करणारे जोसेफ हेन्रिक ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटी इथे बोलताना म्हणतात, "पाश्चिमात्य विशेषतः अमेरिकन लोक त्यातून वेगळे करता येतात."

काही अत्यंत महत्त्वाचे फरक हे व्यक्तीवाद आणि समूहवादाशी निगडीत आहेत. म्हणजेच एखादी व्यक्ती स्वतःला स्वतंत्र आणि स्वावलंबी समजते की इतर लोकांशी जोडलं गेलेलं मानते, तसंच ती व्यक्ती स्वतःपेक्षा समुहाला अधिक महत्त्व देते का असे हे दोन मोठे फरक दिसून येतात. सर्वसाधारणपणे पाश्चिमात्य देशांतील लोक जास्त व्यक्तीनिष्ठ; तर भारत, जपान, चीन यासारख्या आशियाई देशांमधले लोक अधिक समूहवादी असलेले दिसून येतात. अर्थात याला अपवाद आहेत.

अनेक वेळा याचे परिणाम अपेक्षेप्रमाणेच दिसले. प्रवृत्ती आणि वर्तनासंबंधातल्या प्रश्नांच्या उत्तरांतून असं दिसलं की, पाश्चात्य देशांतील लोक गटाच्या यशापेक्षा वैयक्तिक यशाला जास्त महत्त्व देतात. याचा थेट संबंध स्वाभिमान आणि वैयक्तिक सुख मिळवण्याशी आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्याची ही मानसिकता अनेकदा फाजील आत्मविश्वासाचं रूप धारण करते. अनेक अभ्यासांमधून हे दिसून आलं की, 'WEIRD' गटात सहभागी असणाऱ्या लोकांचा स्वतःच्या क्षमतांचं अवाजवी मूल्यमापन करण्याकडे कल होता. उदाहरणार्थ, अमेरिकन प्राध्यापकांना त्यांच्या योग्यतेबद्दल विचारलं असता त्यापैकी 94% प्राध्यापकांनी आपल्या क्षमता सरासरीपेक्षा अधिक चांगल्या आहेत, असं मत व्यक्त केलं.

स्वतःच्या क्षमतांचा उदो-उदो करण्याची वृत्ती पूर्व आशियातील अभ्यासांमध्ये आढळून आली नाही. काही अभ्यासांमध्ये तर सहभागी झालेले लोक आपल्या क्षमतांना कमी लेखताना दिसून आले. व्यक्तीवादी समाजात राहणारे लोक खासगी आवड-निवड आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर अधिक भर देताना आढळून आले.

आपल्या सामाजिक कलाचा आपल्या तार्किक क्षमतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. समूहवादी समाजात राहणारे लोक समस्यांवर अधिक सर्वंकष उपाय शोधताना दिसतात. हे लोक परस्परसंबंध आणि संदर्भाचा विचार करताना दिसतात, याउलट व्यक्तीवादी समाजात राहणारे लोक स्वतंत्र घटकांवर अधिक भर देताना आणि प्राप्त परिस्थितीत बदल होणार नाहीत असं मानताना दिसून येतात.

उदाहरण म्हणून अशी कल्पना करा की एखादी उंचपुरी व्यक्ती एका लहान दिसणाऱ्या व्यक्तीला धमकावते आहे असं चित्र आपण पाहिलं. याव्यतिरिक्त कोणतीही अधिक माहिती दिली नाही तर, पाश्चात्य लोक ती मोठी दिसणारी व्यक्ती धाकदपटशाहीच करणारी आहे असा विचार करण्याची शक्यता अधिक असते. प्राध्यापक हेन्रिक म्हणतात, "पण जर तुम्ही सर्वंकष विचार केलात तर त्या दोन व्यक्तींमध्ये इतर अनेक गोष्टी घडण्याची शक्यता आहे, कदाचित तो मोठा दिसणारा माणूस लहान दिसणाऱ्या व्यक्तीचा साहेब किंवा पिताही असू शकेल".

विचार करण्याची ही पद्धत आपल्या निर्जीव वस्तूंच्या वर्गीकरणातही डोकावते. जर तुम्हाला "ट्रेन, बस आणि ट्रॅक" या तीन शब्दांमधील परस्परसंबंधी शब्द सांगण्यास सांगितलं तर तुम्ही कोणते शब्द निवडाल? याला "ट्रायाड टेस्ट" असं म्हणतात. पाश्चिमात्य लोकांचा कल बस आणि ट्रेन हे दोन शब्द निवडण्याकडे असतो, कारण ते दोन्ही वाहनांचे प्रकार आहेत. सर्वंकष विचार करणारी व्यक्ती मात्र ट्रेन आणि ट्रॅक हे शब्द निवडते, कारण त्यांच्या एकमेकांशी असलेल्या कार्यकारी संबंधावर ती व्यक्ती भर देत असते.

आपल्या दृष्टीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मिशिगन युनिव्हर्सिटीमधील रिचर्ड निस्बेट यांनी हाती घेतलेल्या आय ट्रॅकिंग स्टडीमध्ये असं दिसून आलं की, पूर्व आशियातील लोक एखाद्या चित्राच्या पार्श्वभूमीकडे, त्याचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी अधिक लक्ष देतात. मात्र अमेरिकन लोक चित्राच्या प्रमुख विषयवस्तूकडे अधिक आकृष्ट होतात. हाच फरक जपान आणि कॅनडामधल्या मुलांच्या चित्रांमधून सुद्धा दिसून येतो. यातून असंच कळतं की, माणसाच्या दृष्टीतील फरक हे त्याच्या बालवयातच घडत असतात. याचा थेट संबंध आपण एखाद्या घटनेतील किंवा दृश्यातील नेमके काय लक्षात ठेवतो याच्याशी आहे.

प्राध्यापक हेन्रिक म्हणतात, "जे आपण पाहतो तेच आपण होत असू आणि आपण जर निरनिराळ्या गोष्टींकडे लक्ष देत असू तर आपण वेगवेगळ्या जगांमध्ये जगत असतो."

आपला सामाजिक कलावर जनुकीय घटकांचाही प्रभाव असतो असं काही लोक म्हणत असले तरी आजपर्यंत मिळालेले पुरावे याची साक्ष देत नाहीत. एक्सटर युनिव्हर्सिटी येथील अॅलेक्स मेसोडी यांनी लंडनच्या पूर्व भागात राहणाऱ्या ब्रिटिश-बांगलादेशी कुटुंबांच्या विचारपद्धतीचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की, एका पिढीच्या फरकानेच स्थलांतरितांच्या मुलांनी व्यक्तीवादी भूमिका स्वीकारायला आणि सर्वंकष भूमिकेपासून दूर जायला सुरुवात केली होती. माध्यमांचा वापर हा या बदलातील सगळ्यात मोठा आणि स्वाभाविक घटक होता. "शाळेत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षाही त्याचा प्रभाव अधिक होता."

विचारसरणीतल्या या फरकांचं कारण काय होतं? याचं एक स्वाभाविक उत्तर हेच की त्या विचारसरणींवर त्या प्रदेशातील समकालीन विचारधारांचा पगडा होता. निस्बेट म्हणतात, पाश्चिमात्य विचारवंतांनी कायमच स्वातंत्र्याची पाठराखण केली, मात्र ताओवादासारख्या पौर्वात्य विचारपरंपरांनी संघटनेच्या संकल्पनेवर अधिक भर दिला आहे. उदाहरणार्थ, कन्फ्युशिअसने राजा-प्रजा, पालक-पाल्य, नवरा-बायको, मोठा भाऊ-लहान भाऊ तसंच मित्रा-मित्रांमधील कर्तव्यांचा उल्लेख केला. जगाकडे बघण्याच्या या वैविध्यपूर्ण तऱ्हांचं मूळ त्या संस्कृतीतल्या साहित्यात, शिक्षणात आणि राजकीय व्यवस्थांमध्ये आहे. यामुळेच या कल्पना अंगभूत झाल्या आहेत, त्यांचा मानसिक प्रक्रियांवर मोठा पगडा आहे यात नवल नाही.

असं असूनही, देशा-देशांतील असणाऱ्या सूक्ष्म फरकांवरून असंच लक्षात येतं की, यात इतर अनेक आश्चर्यकारक घटक काम करत आहेत.

'आघाडी'वर असताना

अमेरिकेचं उदाहरण घ्या, सर्व पाश्चात्य समाजांपैकी तो सर्वाधिक व्यक्तीवादी समाज आहे. फ्रेडरिक जॅक्सन टर्नर यांच्यासारख्या अनेक इतिहासकारांनी असं प्रतिपादन केलं आहे की, पश्चिमेकडील नवीन प्रदेशांचा शोध आणि विस्तार यांमुळे तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना बळकट झाली. याचे मुख्य कारण असे की, प्रत्येकालाच तिथल्या खडतरपणावर आणि प्रसंगी एकमेकांवर स्वतःच्या अस्तित्वासाठी मात करावी लागली. या प्रतिपादनावर आधारित अलिकडच्या मानसशास्त्राच्या अभ्यासांतून असं दिसलं आहे की, सीमेच्या जवळ राहणाऱ्या राज्यांमधले लोक अधिक व्यक्तीवादी असतात. "व्हॉलंटरी सेटलमेंट थिअरी" म्हणजेच स्वेच्छेने वसाहती स्थापन झाल्याचा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी मात्र मानसशास्त्रज्ञांना दुसऱ्या एखाद्या स्वतंत्र अभ्यासाचा आधार घ्यावा लागेल.

याच कारणासाठी होक्काइडो बेट अधिक आकर्षक ठरतं. इतर पौर्वात्य आशियाई देशांप्रमाणेच जपानमध्ये सुद्धा समूहवादी आणि सर्वंकष प्रवृत्ती आढळून येते. तरीही, जपानच्या उत्तरेतील प्रदेशांत स्थलांतर होत असल्यामुळे तिथल्या वसाहतीचा कल अमेरिकेच्या "वाईल्ड वेस्ट" प्रमाणेच होत आहे का असा प्रश्न पडतो. राजे मेजींच्या सरकारने वसाहतींमधल्या जमिनींवर लागवड करण्यासाठी हॉरेस कॅप्रन यांच्यासारख्या अमेरिकन कृषीतज्ञांची नियुक्ती केली होती. व्हॉलंटरी सेटलमेंट थिअरी योग्य असती तर होक्काइडो येथे प्रथम स्थिरावलेल्या लोकांमध्ये उर्वरित जपानच्या तुलनेत व्यक्तीवादी प्रवृत्ती अधिक प्रमाणात रुजली असती.

मिशिगन युनिव्हर्सिटीतल्या शिनोबू कितायामा यांच्या मते, जपानमधील इतर प्रदेशांतील लोकांपेक्षा होक्काइडोमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये स्वातंत्र्य आणि वैयक्तिक यश याला इतर लोकांच्या आपल्याबद्दलच्या मतांपेक्षा जास्त महत्त्व आहे, तसंच स्वाभिमानासारख्या भावनेला मोठं स्थान आहे.

अभ्यासात सहभागी लोकांना एक सोशल रिझनिंग टेस्ट म्हणजेच सामाजिक तर्काची चाचणी घ्यायला सांगितलं गेलं. यामध्ये त्यांना आपला खेळ सुधारण्यासाठी अंमली पदार्थ वापरणाऱ्या एका खेळाडूबद्दल चर्चा करण्यास सांगितलं गेलं. एका बाजूला जपानच्या इतर प्रदेशातील लोकांनी खेळाडूवर यश मिळवण्यासाठी असणाऱ्या दबावासारखे विविध पैलू ध्यानात घेऊन या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार केला, तर दुसऱ्या बाजूला होक्काइडो बेटावरील लोकांच्या मते हा दोष त्या खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा नीतीमत्तेचा होता. यावरून हेच दिसून येतं की व्यक्तीच्या गुणदोषांना दोष देणारी ही प्रवृत्ती अमेरिकेतल्या सर्वसाधारण प्रतिक्रीयेच्या जवळ जाणारी म्हणजेच व्यक्तीवादी आहे.

जर्म सिद्धांत

असाही एक समज आहे की, ह्या परस्परविरोधी मनोवृत्ती म्हणजे व्यक्तींच्या आजूबाजूच्या जिवाणूंचा अंदाज घेत उत्क्रांत झालेल्या प्रतिक्रिया आहे. वॉरविक युनिव्हर्सिटीत कार्यरत असलेल्या कोरी फिंचर यांनी काही सहकाऱ्यांसह 2008 साली साथीच्या रोगांविषयक जागतिक माहिती संकलित करून त्याचा व्यक्तीवादी आणि समूहवादी मनोवृत्तीशी कसा संबंध आहे याचा अभ्यास केला.

या अभ्यासातून असं निष्पन्न झालं की, संसर्गाची शक्यता जितकी जास्त तितकी एखादी व्यक्ती अधिक समूहवादी असते. इतरांशी जुळवून घेण्याच्या आणि इतरांचा विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे समूहवाद रोगराई पसरवेल अशा वर्तनापासून लोकांना परावृत्त करतो. समाजातील परस्परसंबंधांवर राष्ट्राच्या संपत्तीसारख्या घटकांचा प्रभाव नसतो हे सिद्ध करणं अवघड आहे. तरीही, प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमधून या विचाराला काही आधार मिळतो. जेव्हा मानसशास्त्रज्ञ लोकांना रोगराईचं भय घालतात तेव्हा त्या लोकांच्या वागण्या-बोलण्यात इतरांशी जुळवून घेण्याची वृत्ती अधिक बळकट झालेली दिसते.

पण सगळ्यात आश्चर्यकारक सिद्धांत उपजला तो शेतीतून. शिकागो विद्यापिठातील थॉमस टॅलहेल्म यांनी चीनच्या 28 प्रांतांचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की तिथल्या विचारसरणीवर स्थानिक शेतीचा प्रभाव असतो.

टॅलहेल्म म्हणतात त्यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या अनुभवांचा मोठा प्रभाव आहे. उत्तर चीनमध्ये बिजींगमधून प्रवास करत असताना त्यांना असं दिसलं की तिथले लोक पुढाकार घेणारे आणि तिऱ्हाइतांशी जुळवून घेणारे होते. "मी जेवताना जर एकटाच असलो तर तिथले लोक माझ्याशी येऊन बोलत." याउलट दक्षिणेत ग्वांगझू मधले लोक आपण इतरांची गैरसोय किंवा त्यांचा अपमान करू की काय या भावनेने ग्रासलेले आणि म्हणून अलिप्त राहणारे होते.

इतरांशी जुळवून घेण्याची ही वृत्ती लक्षात घेता या समूहवादाचं मूळ कशात आहे हे शोधण्याची इच्छा टॅलहेल्म यांना झाली. उत्तर-दक्षिणेतील हा फरक संपत्ती किंवा आधुनिकीकरणाशी जोडलेला नव्हता. टॅलहेल्म यांना जाणवलं की हा फरक कदाचित त्या-त्या प्रदेशातील स्थानिक कृषी उत्पन्नामुळे आहे, कारण दक्षिणेकडील बहुतांश प्रदेशांमध्ये तांदुळ होतो तर उत्तरेत गव्हाचं पीक घेतलं जातं. टॅलहेल्म म्हणतात "यांगत्से नदीचा प्रवाह ही सरळसरळ विभागणी करतो."

भाताची शेती करणं यात मोठ्या प्रमाणावर इतरांच्या सहकार्याची आवश्यकता असते. यामध्ये माणसाचे शारिरिक कष्ट अधिक प्रमाणावर असतात तसंच अनेक शेतांना उपयोगी पडेल अशी गुंतागुंतीची सिंचन व्यवस्था वापरावी लागते. याउलट गव्हाचं उत्पन्न घेण्यासाठी याच्या अर्धे कष्ट लागतात, तसेच सिंचनापेक्षा पावसावर अवलंबित्व जास्त असतं. त्यामुळे शेतकऱ्यांना इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही आणि प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेताकडे एकटाच लक्ष देऊ शकतो.

हे फरक समूहवाद अथवा व्यक्तिवादाचे मूळ होऊ शकतात का? चीनमधील शास्त्रज्ञांसोबत काम करत असताना टॅलहेल्म यांनी भात आणि गव्हाची शेती असणाऱ्या प्रदेशातील १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी सर्वंकष विचाराची 'ट्रायाड टेस्ट' उपयोगात आणली. या अभ्यासादरम्यान त्यांनी लोकांना त्यांच्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी असलेले त्यांचे संबंध चित्र स्वरुपात मांडायला सांगितले. यात असं दिसलं की, व्यक्तीवादी समाजात राहणाऱ्या लोकांनी स्वतःची आकृती आपल्या मित्रांच्या आकृतीपेक्षा मोठी काढली होती. मात्र समूहवादी समाजात राहणाऱ्या लोकांनी चित्रातील सर्वच लोकांच्या आकृत्या समसमान काढल्या होत्या. अमेरिकन लोकांचा स्वतःच्या आकृती खूप मोठ्या काढण्याकडे कल आहे," असं टॅलहेल्म म्हणतात.

गव्हाचं पीक घेणारे लोक अधिक व्यक्तीवादी दिसले तर भात शेती करणाऱ्यांचा कल समूहवादाकडे आणि सर्वंकष विचार करण्याकडे होता. दोन प्रदेशांच्या सीमांवर राहणाऱ्या लोकांसंदर्भातही हे खरं होतं. जवळजवळ असलेल्या गावांमध्ये राहणारे लोक घ्या, त्यातले काही भातशेती करतात तर काही गव्हाची. तरीही आपल्याला त्यांच्यात सांस्कृतिक फरक दिसतो.

त्यांनी हे प्रमेय जेव्हा भारतातील लोकांसंदर्भात तपासलं तेव्हाही त्यांना सारखेच निष्कर्ष मिळाले. यात गव्हाची आणि भाताची शेती करणाऱ्या लोकांमध्ये स्पष्ट फरक दिसून आले. ज्यांना त्यांनी प्रश्न विचारले त्यांचा शेतीशी थेट काही संबंध नसला तरी त्यांच्या परंपरा आजही त्यांच्या विचारपद्धतीला वळण देत आहेत असं दिसलं. "संस्कृतीत काहीशी शिथीलता आहे."

आकलनाचा कॅलिडोस्कोप

हे नमूद करणं गरजेचं आहे की, हे केवळ अनेक लोकांच्या वर्तनावर आधारित ढोबळ कल आहेत. प्रत्येक समूहाचा अभ्यास करत असताना त्याच्या अनेकविध छटा दिसल्या असतील. "मानववंशशास्त्रीय दृष्टीने विचार करून, या प्रवृत्तींची दोन तटांत विभागणी करता येणार नाही" असं एडिनबरा युनिव्हर्सिटी मधल्या डेल्वर हुसेन या मानववंशशास्त्रज्ञांचं मत आहे. त्यांनी लंडनमधील ब्रिटीश-बांगलादेशी समाजाचा मेसोडी यांच्या सोबतीनं अभ्यास केला. हुसेन यांचं असं म्हणणं आहे की, पूर्व आणि पश्चिमेकडील देशांमध्ये, ऐतिहासिक संबंध असतात, म्हणजेच त्यामधले काही लोक दोन्ही प्रकारे म्हणजेच सर्वंकष आणि व्यक्तिवादी पद्धतीनं विचार करतात. यात वय आणि वर्गासारख्या घटकांचा सुद्धा परिणाम होतो.

हेन्रिक यांनी 'WEIRD' या संकल्पनेवर आधारित प्रबंध 2010 साली प्रकाशित केला होता. आतापर्यंत त्याला कायमच सकारात्मक प्रतिसाद आला आहे. त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की, टॅलहेल्म सारख्या संशोधकांनी विचारांचा आणि आकलनाचा हा कॅलिडोस्कोप समजून घेण्याचं मोठं काम हाती घेतलं आहे. "वेगवेगळ्या समूहांची मनोवृत्ती भिन्न का असते हे समजवण्यासाठी आपल्याला एका व्यापक सिद्धांताची गरज आहे."

पण हेतू चांगला असला तरी या क्षेत्रातील प्रगती संथ गतीने सुरू आहे. माणसाच्या वृत्तीचा अभ्यास जागतिक पातळीवर करत असताना त्यात लागणारा वेळ आणि पैसा यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणूनच आजही अनेक संशोधकांवर त्यांच्या अभ्यासात विविधता आणण्यापेक्षा 'WEIRD' लोकांना सहभागी करून घेण्याची वेळ येते.

"आजार कोणता यावर आपलं एकमत आहेच. प्रश्न असा आहे की यावर उपाय काय."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)