You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UAEचा गोल्डन व्हिसा: कुणाला मिळणार? काय आहेत फायदे?
- Author, बीबीसी हिंदी टीम
- Role, नवी दिल्ली
UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थाईक झालेल्या भारतीयांना गोल्डन व्हिसा मिळत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
आता अशी चर्चा आहे की भारतीय उद्योगपती लालू सॅम्युएल यांना हा व्हिसा देण्यात आलाय. ते किंग्सटन होल्डिंग्स नावाच्या कंपनीचे मालक असून ही कंपनी मध्य पूर्वेतल्या उत्पादन क्षेत्रातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाते.
दुबईत स्थायिक झालेले उद्योगपती पी. ए. इब्राहिम हाजी यांनाही असं गोल्डन कार्ड देण्यात आलं. मलबार ग्रुप या सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कंपनीचे को-चेअरमन आहेत.
मे महिन्यापासून आतापर्यंत UAEच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय उद्योगपतींना हा गोल्डन व्हिसा देण्यात आलेला आहे.
दुबईमधल्या रत्नांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचे मालक शेखर पटनी, रीगल ग्रुप ऑफ कंपनीजचे वासू श्रॉफ, खुशी ग्रुप ऑफ कंपनीजच्या खुशी खाटवानी, डॅन्यूब ग्रुपचे रिझवान सजन, अबुधाबीमधले उद्योगपती एम. एस. युसुफ अली या भारतीय उद्योगपतींना गोल्डन व्हिसा मिळाल्याच्या बातम्या आल्या आहेत.
काय आहे गोल्डन व्हिसा?
गोल्डन व्हिसा हा 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे, जो यावर्षीच जाहीर करण्यात आला.
UAEचे उपराष्ट्राध्यक्ष आणि दुबईचे नेते शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी 21 मे रोजी गोल्डन कार्ड व्हिसा जाहीर केला. गुंतवणूकदार, निवडक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वैज्ञानिक आणि कलाकारांना पर्मनंट रेसिडन्सी (PR) देण्यासाठी ही गोल्डन कार्ड योजना सुरू करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
असं सांगण्यात येतंय की UAEमध्ये पैसा ओतणाऱ्या वा इतर प्रकारे गुंतवणूक करणाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मोठ्या कंपन्यांच्या मालकांना, महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना, विज्ञान संशोधक आणि हुशार विद्यार्थ्यांना UAEच्या विकासामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
गोल्डन व्हिसाचे फायदे
गोल्डन व्हिसाधारकांना अनेक सुविधा मिळतील. सगळ्यांत महत्त्वाची सुविधा म्हणजे ते इतर कोणाही व्यक्तीच्या वा कंपनीच्या मदतीशिवाय UAEमध्ये आपला पती वा पत्नी आणि मुलांसोबत राहू शकतील.
यापूर्वी यासाठी एखाद्या स्पॉन्सरची आवश्यकता असायची.
सोबतच हा व्हिसा असणाऱ्या व्यक्ती तीन कर्मचाऱ्यांना स्पॉन्सर करू शकतील. शिवाय त्यांना स्वतःच्या कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यासाठी रेसिडेंसी व्हिसादेखील मिळवता येईल.
हा व्हिसा अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 70पेक्षा जास्त देशांमधल्या 6,800 लोकांना फायदा होणार आहे.
UAEच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की सात हजार अर्जांपैकी किमान 400 लोकांना गोल्डन व्हिसा देण्यात आलेला आहे.
10 वर्षांनंतर नूतनीकरण
UAEच्या रेसिडेन्सी आणि परदेशी बाबींकडे लक्ष देणाऱ्या GDRFAचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद अल मारी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगितलं होतं की या गोल्डन कार्ड व्हिसाचा कालावधी 10 वर्षांचा असेल. यानंतर हा व्हिसा रिन्यू करावा लागेल.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय प्रवाशांची संख्या सर्वांत जास्त असल्याचं सांगितलं जातं. देशाच्या 90 लाखांच्या लोकसंख्येमध्ये भारतीयांची संख्या किमान 30 टक्के आहे.
भारतीय दूतावासाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार UAEमध्ये राहणारे बहुतेक भारतीय नोकरी करतात, पण यामध्ये सुमारे 10 टक्के लोक हे कामगारांवर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)