स्वप्नवत दुबई उभारणारे भारतीय कामगार तिथे कसे राहतात?

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी हिंदी

युनायटेड अरब अमिराती (UAE) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात उंच इमारती, अत्याधुनिक मॉल्स, सुंदर कारंजी आणि विस्तीर्ण रस्ते. यामुळं UAE मधली शहरं स्वप्नाहून सुंदर दिसतात. अबू धाबी असो वा दुबई, इथे इमारतींचं बांधकाम सतत होताना दिसतं. पण या शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे कामगार कसे राहतात? बीबीसीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी घेतलेला आढावा.

कतार आणि सौदी अरेबियामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर हजारो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. बदललेल्या वातावरणात आपली देखील नोकरी जाईल की काय? अशी भीती UAEमध्ये राहणाऱ्या कामगारांना वाटत आहे.

UAEचं सौदी अरेबियाला समर्थन आहे त्यामुळं त्यांना अशी भीती वाटत आहे. सुदैवानं UAEमध्ये अद्यापही भारतीय कामगारांना चांगली मागणी आहे. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांना नोकरीच्या अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत.

नुकताच मी दुबईमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांची भेट घेतली. कामगारांसाठी इथं वसाहत तयार करण्यात आली आहे. इथं अगदी मोजक्या सुविधा उपलब्ध आहेत. या वसाहतीला 'लेबर कॅम्प' म्हटलं जातं.

मी कतारमध्ये श्रमिकांसाठी असणाऱ्या शिबिरांची छायाचित्रं पाहिली. या शिबिरांची अवस्था दयनीय आहे. मला वाटलं, कदाचित दुबईतल्या वसाहतींची अवस्था देखील अशीच असेल.

पण इथे गेल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण भारतामध्ये जिथे मजूर वर्ग राहतो ती ठिकाणं झोपडपट्ट्यांसारखी असतात. पण दुबईत तसं नाही. भारतातील मध्यमवर्गीय जशा वसाहतींमध्ये राहतात तशीच ही वसाहत आहे, असं मला जाणवलं.

हे निवासी शिबीर चार मजली इमारतीमध्ये आहे. या ठिकाणी 304 खोल्या आहेत, ज्या आतून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासारख्या वाटतात.

एका खोलीमध्ये साधारणतः तीन-चार जण राहतात. तिथं सामान ठेवण्यासाठी देखील जागा आहे. तसंच प्रत्येक रूममध्ये एक फ्रीज आहे आणि एसी आहे. स्वच्छतागृह आणि स्वयंपाक घर अशा सर्व सुविधांनी सज्ज आहे. यांचा वापर सर्वजण करतात.

"एकत्र राहण्याचा आम्हाला आनंद आहे, त्यामुळं घरापासून दूर राहिल्याचं दुःख थोडं हलकं होतं," असं या ठिकाणी राहणारे कामगार म्हणतात. मी या ठिकाणी काही जणांना भेटलो. ते बिहारच्या सिवन जिल्ह्यातून आले होते. इथं येण्यासाठी त्यांना 60 ते 75 हजार रुपये उसने घ्यावे लागले. कष्टाचं काम करणाऱ्यांसाठी ही रक्कम खूप आहे.

"हे खरं आहे, की हे ठिकाण राहण्यासाठी आदर्श नाही. पण मला कष्ट पडल्यामुळं माझ्या कुटुंबातील दहा जणांची स्थिती बदलत असेल तर हे कष्ट घ्यायची माझी तयारी आहे," असं सोनू यादव निर्विकारपणे म्हणाले.

अशा श्रमिक शिबिरांची संख्या दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशा शिबिरांमध्ये साधारणतः 20 लाख भारतीय मजूर राहतात. या ठिकाणी काम करणारा मजूर महिन्याला साधारणतः 36,000 रुपये कमवतो तर ड्रायव्हरला अंदाजे 56,000 रुपये पगार मिळतो. भारतामध्ये कंपन्यांमध्ये ड्रायव्हरचं काम केल्यास जास्तीत जास्त 30,000 रुपये मिळू शकतात आणि खासगी चालकांना तर 15,000 रुपयापर्यंत मिळतात.

"या ठिकाणी काम करणाऱ्या पांढरपेशा वर्गाला तुलनेत जास्त पगार मिळतो. पांढरपेशा व्यावसायिकांना महिन्याला साधारणतः 1,80,000 रुपये मिळतात. भारतीय लोकांची पसंती जास्त पांढरपेशा व्यवसायांना असते आणि कष्टाची कामे करायला येणाऱ्यांच्या तुलनेत त्यांची संख्या अधिक असते," असं नोकर भरती करणाऱ्या एका एजन्सीचं म्हणणं आहे.

"इथं अनेक भारतीय नोकरीसाठी येतात. बहुतेकांना इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते," असं अझहर नावेद अवान यांचं म्हणणं आहे. अझहर हे व्हीडिओ ब्लॉगर आहेत.

"जगभरात कार्यरत असलेल्या क्रेनपैकी 30 टक्के क्रेन या दुबईत आहेत. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की दुबईत किती काम होत आहे. त्यामुळं या ठिकाणी अभियंत्यांची प्रचंड मागणी आहे. या ठिकाणी काम करणाऱ्यांपैकी बहुसंख्य भारतीय आहेत. दुबईतल्या मोठ्या कंपन्या बघा, जसं की एमार. त्या ठिकाणी तुम्हाला कामगारांपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत भारतीय दिसतील," असं अझहर म्हणतात.

"भारतातून UAE मध्ये येणाऱ्या महिलांचे प्रमाण देखील भरपूर आहे," असं अझहर यांच्या सहकारी फातिमा म्हणतात. "या महिला उच्चपदांसाठी अर्ज करताना दिसत आहेत. UAE हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत चांगला देश आहे. इथं येणाऱ्या महिलांना सहकार्य करण्यास आम्ही तत्पर असतो. त्यांना आम्ही राहण्यासाठी जागा शोधून देतो किंवा त्यांना जी काही मदत हवी आहे ती आम्ही करतो."

UAE, विशेषतः दुबई तर सिमेंट-काँक्रिटचं जंगलंच वाटतं. तरीही इथे सतत काम सुरूच असतं.

निश्चलनीकरण आणि GSTचा फटका भारतीय बांधकाम व्यवसायाला बसला आहे. त्यामुळं तिथं नोकऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. पण दुबईमध्ये मात्र भारतीयांना मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी नोकरी आणि वेतन दोन्ही सुरक्षित आहे," असं बांधकाम व्यावसायिक तौसिफ खान यांचं म्हणणं आहे.

एकीकडे भारतात नोकऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे तर दुसरीकडे UAE मध्ये भारतीय उमेदवारांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)