सुपारीच्या व्यसनानं कसं बदललं पापुआ न्यू गिनीचं राजकारण!

    • Author, कॅथलिन प्रिओर
    • Role, पापुआ न्यू गिनी

पापुआ न्यू गिनीमसमोर नागरिकांत असलेलं सुपारीचं व्यसन हे मोठं संकंट बनलं आहे. या व्यसनामुळे या देशात तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाणही वाढू लागलं आहे. त्यामुळे या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात विविध पातळीवर उपययोजना केल्या जात आहेत.

पूर्वी शुभकार्यावेळीच सुपारी खाण्याचा प्रघात या देशात होता. पण सध्या पापुआ न्यू गिनीची निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या सुपारीच्या व्यसनात गुरफटली आहे.

अगदी सहा वर्ष वयाची लहान मुलं सुद्धा दिवसभर सुपारी खातानाच चित्र इथं सर्रास पाहायला मिळतं.

आशिया आणि प्रशांत महासागरातील काही देशांमध्ये सुपारी चघळणं हे सामान्य मानलं जातं.

पापुआ न्यू गिनीमध्ये सुपारीला स्थानिक लोकं 'बुआय' म्हणतात. इथं घुसळलेल्या चुन्यामध्ये मोहरीच्या काड्या बूडवून त्या सुपारीसोबत खाल्या जातात.

हे मिश्रण चघळल्यानंतर शरीरात उत्साह आणि सतर्कता संचारते, असं इथले लोक सांगतात.

प्रथा बनली व्यसन

या देशातील पूर्व न्यू ब्रिटन प्रांतातील वार्षिक सांस्कृतिक महोत्सवामध्ये सुपारी चघळणं ही सामान्य गोष्ट आहे. रस्त्यावर सगळीकडे सुपारीची टरफलं आणि सुपारीची पिंक इथं जागोजागी दिसते.

इथं सगळीकडेच महिला, लहान मुलं आणि वृद्धांचे ओठ आणि दात लालेल झालेले असतात.

या कार्यक्रमात बेनींग पर्वतरांगेतून आलेल्या एका जमातीत फिलोमेना तिच्या आठ ते 18 वर्षं या वयोगटातील पाच मुलांसह सहभागी झाल्या होत्या. ते सर्वच सुपारी चघळत होते.

"हे एक प्रकारचं उत्तेजक आहे. यामुळं तुम्हाला हवेत असल्यासारखं वाटतं. जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो, तेव्हा हेच मदतीला येतं," असं त्या सांगतात.

त्यानंतर ती जमिनीच्या दिशेनं तोंडातून लाल रंग मिश्रीत पिंक टाकते.

हाताचे हावभाव करत ती मोठ्यानं बोलते, "आता मी सुपारी चघळत आहे. मला उत्साह वाटतोय."

या देशात कमी वयातच अनेकांना सुपारीचं व्यसन जडतं.

"जर माझ्या मुलांना सुपारी खायची असेल तर ते खाऊ शकतात. मात्र त्याआधी त्यांनी काहीतरी जेवायला हवं. न जेवता तुम्ही सुपारी खाल्ली तर चक्कर येऊ शकते," असं फिलोमेना सांगतात.

त्यांची मुलगी सोपीया 18 वर्षांची आहे. तिला दहाव्या वर्षांपासूनच सुपारीचं व्यसन आहेत. ती जेव्हा बोलायला लागते, तेव्हा तिच्या तोंडातून लाल रंगाची लाळ बाहेर येते.

"सुपारी खाण्यामुळं मला आनंद मिळतो. मला माझे काम पूर्ण करण्यासाठी अधिकची उर्जाही मिळते. सुपारी खाल्ली नाही तर थकल्यासारखं होतं. हे आता आमच्या संस्कृतीचा एक भाग झाला आहे. कुटुंबातील प्रत्येकजण सुपारी खातो," असं फिलोमेना सांगतात.

चहा पिण्यासारखचं!

सुपारी मिश्रणातील सक्रीय अर्कोलिन हे मेंदूसाठी निकोटीनसारखंच काम करतं. त्याचं व्यसन जडतं. आणि मग त्यातून कर्करोगाचा धोका निर्माण होतो.

जगात पापुआ न्यू गिनीमध्ये तोंडाच्या कर्करोग होण्याच प्रमाण हा सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तोंड आणि घशाच्या कर्करोगाच्या प्रत्येक नवीन 500 रुग्णांपैकी एक हा पापुआ न्यू गिनीचा असतो.

हा या देशासाठी सर्वांत मोठा धोका आहे.

पश्चिम न्यू ब्रिटनमधील प्रांतातील किम्बे जनरल हॉस्पिटलमध्ये डॉ. इवान सपुरी यांच्याकडे प्रत्येक आठवड्याला तोंडाच्या कर्करोगचे 2 नवे पेशंट आलेले असतात.

हे आकडे कमीच असतील, अशी भीती त्यांना वाटते.

"आमच्याकडील आकडे फार अचूक नाहीत आणि कितीतरी प्रकरणांचं निदानही होत नाही. पण तोंडात जखमा असलेल्या संशयित कर्करोगांच्या पेशंटच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं मला आढळून आलं आहे," असं ते सांगतात.

या देशात तोकड्या आरोग्य सुविधा आहेत. वारंवार औषधांची टंचाई असते आणि कर्करोग तज्ज्ञांची संख्याही कमी आहे. पापुआ न्यू गिनीच्या एकमेव विशेष कर्करोग केंद्रात एकच रेडियेशन तज्ज्ञ होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्यावर्षीपासून रेडिओथेरपी ठप्प आहे.

"एकतर अनेक रुग्ण हे रुग्णालयात उशिराने येतात. त्यात आमच्या आरोग्य यंत्रणा कमकूवत आहे, त्यामुळे कर्करोगावरील उपचार सेवा सक्षमपणे कार्यरतच नसते. त्यामुळे पेशंट जगण्याच प्रमाणही कमी आहे," असं त्यांनी सांगितलं.

या देशातील सुपारी खाण्याची लोकांची वाढती आणि राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेवर कर्करोगाच्या उपचारासाठीचा दबाव हा कधीतर टाईमबाँबसारखा फुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

"पूर्वीच्या प्रमाणाशी तुलना केली तर आता मोठ्या संख्येने लोक सुपारी खात आहेत. प्रत्येकालाच माहीत आहे की हे आरोग्यासाठी घातक आहे. पण तरीसुद्धा लोक हे व्यसन करतात. लोकांना आता चहासारखं सुपारीची सवय जडली आहे," असं ते सांगतात.

जुनी सवय लवकर जात नाही

रस्त्याच्या कडेला विनफ्रेड चा एक छोटासा स्टॉल आहे. परसबागेतच उगवलेल्या सुपारी, मोहरीच्या काड्या आणि केळींची विक्री त्या करतात. त्यांनाही सुपारीच व्यसन आहे.

"आरोग्यासाठी हे हानिकारक असल्याचं माहीत असूनही मी ही सवय सोडू शकत नाही. परसबागेतच सुपारी उगवली जाते. आम्हाला फक्त ती कशी खायची इतकंच माहीत करून घ्यायचं असतं," असं त्या सांगतात.

"सुपारी कशी खायची हे माझ्या मुलांना वयाच्या सहा-सात वर्षांपासूनच माहिती होतं. मुलं लहान असल्यानं, मी त्यांना यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते सुपारी खातच लहानाचे मोठे झाले. सुपारी खाणं वाईट आहे, हे मुलांना शिकवण्याची गरज आहे," असं चार मुलांची आई असलेल्या विनफ्रेड सांगतात.

जास्तवेळ सुपारीचं मिश्रण तोंडात ठेवल्यानं त्यापासून होणाऱ्या धोक्यांत अधिकच भर पडते.

"जर लहान वयातच मुलांनी सुपारी खायला सुरूवात केली, तर वयाच्या तिशीपर्यंत त्यांना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते," असं पोर्ट मोर्सबी इथल्या सार्वजनिक रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. पाकी मोलूमी सांगतात.

बंदीसाठी सहकार्य

तातडीच्या उपाययोजना म्हणून पोर्ट मोर्सबी इथं गेल्या साडेतीन वर्षांपासून सुपारीच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. दर आठवड्याला राजधानीत सुपारीच्या व्यापारातून पाच लाख पौंडाची उलाढाल होत होती, असा अंदाज होता.

या निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी पुढाकार घेणारे शहराचे राज्यपाल पॉवस पार्कोप यांच्यांसाठी ही 'राजकीय आत्महत्या' ठरल्याचं मानलं जात. नंतर निवडणुकांमुळे ही बंदी शिथिल करण्यात आली.

आता इथं सुपारी विक्रीवर ठिकाणी मर्यादित परवानगी देण्यात आली आहे. याच्या अंमलबजावणीमध्ये पोलिसांनी केलेला बळाचा वापर केल्याचा आणि सुपारी पुरवठादारांचं जीवन उध्वस्त केल्याची टीका झाली होती.

एका खासदाराने या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेवरच प्रश्न उठवत न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

शहरावर लागलेला डाग

पापुआ न्यू गिनीच्या अनेक नागरिकांचं जीवनमान सुपारी विक्रीवर अवलंबून आहे. नगदी पिक असलेली सुपारी इथं 'ग्रीन गोल्ड' म्हणून ओळखली जाते. तसेच त्याची विक्री करमुक्त आहे.

बाजारपेठांमध्ये बहुतेकदा सुपारी विक्रेत्यांसाठी एक राखीव क्षेत्र असतं. एक सुपारी आणि मोहरीच्या काडीची किंमत 6 सेंट ते 1.30 डॉलरपर्यंत असते. त्यात स्थान, हंगाम अशा काही घटकांवर हा दर ठरतो.

नौरी यांच्यासाठी सुपारी विक्री हे उत्पन्नाचं एकमेव साधन आहे. त्या स्वतःच झाडांची निगा राखतात. सुपारीच्या फळांची विक्री त्याच करतात. विक्री चांगली झाली तर दिवसाला तिला 25 पौंडची कमाई होते.

"जे पैसे मी कमवते त्यातून माझा उदरनिर्वाह होतो. त्यातून मी साबण, मीठ अशी जीवनावश्यक गरजेच्या वस्तू खरेदी करू शकते," असं त्या म्हणतात.

सुपारीचं व्यसन असूनही नौरी यांचा सुपारीच्या बंदीला पाठिंबा आहे. "सरकारनं लोकांना सुपारी खाण्यापासून रोखलं पाहिजे. सुपारी खाऊन थुंकल्यानं परिसर खूप अस्वच्छ होतो. आरोग्यासाठीही सुपारीच सेवन घातक आहे," असं नौरी सांगतात.

या अस्वच्छतेपासून राजधानी स्वच्छ ठेवणे, हा सुद्धा या बंदीमागचा एक उद्देश होता.

लोकांच्या थुंकीतून संसर्गजन्य रोग झपाट्याने पसरतात. जगात क्षयरोगाच्या संक्रमणात पापुआ न्यू गिनीचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे थुंकण्याची सवय आरोग्याच्या दृष्टीनं संकटांना आमंत्रण देणारी ठरू शकते.

एका देशाचं भवितव्य

गेल्यावर्षी सुपारीविरहीत दिवस साजरा करण्यात आला होता. सुपारीच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल लोकांना शिक्षित करणं आणि तोंडाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांबाबत माहिती देणं हा यामागचा उद्देश होता.

यावर्षी निवडणुका आणि सुपारीविरहीत अभियानाची तारीख एकच आल्यानं, हा दिवस पुढे ढकलण्यात आला. या निवडणुकांत आरोग्यमंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

तोंडाच्या कर्करोगाचं निदान करणाऱ्या डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून बोलायचं तर उपाययोजना अपुऱ्या आहेतच, शिवाय त्यांना फार उशीरसुद्धा झालेला आहे.

"प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक जनजागृती अपुरी पडत आहे. सुपारी आता प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. पालकच त्यांच्या मुलांना सुपारी देत असल्याचं पाहून मन विषण्ण होतं," असं डॉ. सपुरी म्हणतात.

"सुपारी खाणं आता सर्वसामान्य झालं आहे आणि म्हणूनच लढा देणं अवघड आहे," असं ते म्हणतात.

(सर्व छायाचित्र कॉपीराईट)

हे वाचलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)