You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका: हिंदू पुजाऱ्यावर न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला, स्थानिकांमध्ये दहशत
- Author, सलीम रिजवी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, न्यूयॉर्कहून
अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या फ्लोरल पार्क भागात एक हिंदू पुजारी एका हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
शिवशक्तिपीठ मंदिराचे पुजारी हरीशचंद्र पुरी ऊर्फ स्वामी यांनी बीबीसीला सांगितलं की गेल्या आठवड्यात त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यावेळी पुरी यांनी भगवी वस्त्रं परिधान केली होती.
"मी रस्त्याच्या कडेने चालत होतो, तेवढ्यात एका व्यक्तीने अचानक हल्ला करून मला खाली पाडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. डोकं, हात, पाय सगळीकडे मार लागला. तो ओरडत होता 'I kill you'. मी बचावलो, हेच खूप आहे."
हल्लेखोराने त्याच्या हातातल्या छत्रीने पुरी यांच्या डोक्यावर, छातीवर, हाताला आणि पायाला मारहाण केली, असं ते सांगतात. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले पुरी यांनी तिथून जात असलेल्या एका महिलेला हाक मारली.
त्या अमेरिकन महिलेने फोन केल्यावर पोलीस आले आणि तेच पुरी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
या प्रकरणी पोलिसांनी सर्गियो गुईवा या 52 वर्षीय लॅटिन मूळच्या संशयित हल्लेखोराला अटक केली आहे.
पुरी हे मूळ उत्तराखंडचे. 30 वर्षांपूर्वीच ते अमेरिकेत स्थायिक झाले. यापूर्वीही आपल्यावर असे काही हल्ले झाल्याचं ते सांगतात.
वंशद्वेषातून केलेला हल्ला?
वंश, धर्म किंवा वर्णाधारित द्वेषातून हा हल्ला झालेला तर नाही ना, या अनुषंगानेही प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्थानिक हेट क्राईम टास्क फोर्सने न्यू यॉर्क शहर पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात मदत करावी, असे आदेश न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रू कुमो यांनी दिले आहेत.
कुमो म्हणाले, "क्वीन्समध्ये शिवशक्तिपीठ मंदिराजवळ एका पुजाऱ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल ऐकून मला फार दुःख झालं. हा हेट क्राईम असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे."
ते पुढे म्हणाले, "न्यूयॉर्कमधला प्रत्येक रहिवासी अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या विरोधात आहे. कुणाविरुद्धच्या द्वेषातून असे हिंसक हल्ले करून समाजाला घाबरवण्याचा आणि त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण सर्वांनी याविरोधात एकत्र यायला हवं."
कुमो यांचा जन्मही क्वीन्समधलाच असल्याने हा भाग आणि इथल्या रहिवाशांची त्यांना चांगलीच माहिती आहे.
लोकांमध्ये दहशत
ग्लेन ओक्स भागात असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये या घटनेमुळे संताप आणि भीतीचं वातावरण आहे.
यापैकी अनेकांना वाटतं की हल्लेखोराने त्यांच्या स्वामींना मुद्दाम लक्ष्य केलं आहे. मारहाण करताना तो 'हा माझा मोहल्ला आहे', असं तो ओरडत असल्याचं ते सांगतात.
भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण अभिषेक या मंदिरातल्या कामात मदत करतो. तो सांगतो, "तुम्ही एखाद्याला असं कसं मारू शकता? आमच्या भागात तर स्वामी सगळ्यांचे आवडते आहेत. ते अत्यंत दयाळू आहेत. या हल्ल्याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे."
मंदिराजवळच राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मयुरी या हल्ल्यानंतर घाबरल्याचं असल्याचं सांगतात. "स्वामीजींवर असा हल्ला झाल्याचं वाईट वाटलं. असं व्हायला नको. भीती तर वाटतेच."
शहरातल्या अनेक नेत्यांनी मंदिरात जाऊन स्वामींची भेट घेऊन विचारपूस केली. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लटिशिया जेम्स यांनी हल्लेखोराला शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांच्या 'काउंसिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन' या संस्थेच्या न्यूयॉर्क शाखेनेही एक पत्रक काढून या हल्ल्याचा निषेध केला आहे.
या शाखेच्या संचालिका अफाफ नाशेर यांनी म्हटलं, "या कठीण काळात आम्ही आमच्या हिंदू बांधवांसोबत आहोत. कुठल्याही माणसाला त्याच्या वर्णावरून किंवा त्याच्या धर्मावरून लक्ष्य करता कामा नये."
सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत न्यूयॉर्क शहरात गेल्या काही महिन्यात वंश, धर्म आणि वर्णद्वेषातून झालेल्या हल्ल्यांचं प्रमाण 64 टक्क्यांनी वाढलं आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)