'सोशल मीडियावरच्या मीम्समुळे माझ्या आयुष्याचीच थट्टा झाली'

    • Author, विनिशियस लेमोस
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सोशल मीडियामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. काही लोकांना यामुळे प्रसिद्धी मिळाली. पण अनेक जण असेही आहेत जे सोशल मीडियाचा बळी ठरले. डेब्रासोबत असंच झालं.

2012 मधल्या एका संध्याकाळी वाटत होतं की आपण फार मस्त दिसतोय.

15 वर्षांची डेब्रा गडद रंगाचा ड्रेस घालून कुटुंबातल्या पार्टीसाठी तयार झाली. तिने काळा गॉगल चढवत सेल्फी काढला आणि फेसबुकवर टाकला. लवकरच तिला समजलं की तिच्या फोटोचा वापर मीमसाठी (Meme) केला जातोय.

या मीममध्ये डेब्राच्या गॉगलला एका ब्रँडचं नाव देण्यात आलं होतं. लोक या ब्रॅण्डचं नाव लिहून फोटो शेअर करत होते. हा फोटो शेअर करून लोक हसत असताना डेब्रा मात्र तिच्या खोलीत बसून रडायची. या गोष्टीचा तिच्यावर इतका परिणाम झाला की, तिने घरातून बाहेर पडणंच बंद केलं. म्हणजे तिला कोणी ओळखू नये.

डेब्रा आता 22 वर्षाची आहे. तिने बीबीसीला सांगितलं. "माझ्या वयाच्या इतर मुलींपेक्षा मी कुरूप असल्याचं मला वाटायचं. अपमान झाल्यासारखं वाटायचं. त्या फोटोवर येणाऱ्या कॉमेंट्समध्ये माझ्याबद्दल खूप काही बोललं जायचं. मला याचा खूप त्रास व्हायचा."

तिने शाळा सोडली. घराबाहेर जाणंच बंद केलं. घरात बसून ती आत्महत्येचा विचार करायची.

"माझ्यात अजिबात शक्तीच उरली नव्हती. मी रडत बसायचे आणि स्वतःला तो फोटो काढल्याबद्दल दोष द्यायचे."

सात वर्षांनंतर डेब्राच्या लक्षात आलं की, पुन्हा एकदा तिचा फोटो सोशल मीडियावर मीमसाठी वापरला जातोय.

ती सांगते, "लोकांनी काही काळ लोकांनी फोटो वापरणं बंद केलं होतं. पण आता पुन्हा एकदा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर माझा फोटो मीम म्हणून शेअर केला जाऊ लागला."

आता डेब्रा तिच्या तीन वर्षांच्या मुलासह ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये राहते आणि फार्मसीमध्ये काम करते. पण आता ती या मीम्सचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही.

डेब्रानं ठरवलंय की, आधीसारखी आता ती ही गोष्ट लपवून ठेवणार नाही. तिने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिलेलं आहे की, ज्या फेसबुक पेजेसनी तिचा फोटो वापरला आहे, ती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.

"माझ्या लक्षात आलं की माझी चूक नव्हती. सात वर्षांपूर्वी मी जे झेललं होतं ते आज मी करणार नाही." या मीम्समध्ये डेब्राला एका कुरूप महिलेच्या रूपात दाखवण्यात आलंय.

लोकांनी उडवली थट्टा

आपला फोटो फेसबुकवर पोस्ट करताना डेब्राला असं वाटलं होतं की, लोकं आपलं कौतुक करतील पण त्या फोटोची थट्टा झाली.

"मला वाटत होतं की मी सुंदर दिसतेय. तेव्हा मला स्वतःबद्दल आत्मविश्वासही होता." ती सांगते की, तो फोटो एका मुलाने शेअर केला होता, जो तिच्याच एका मित्राचा मित्र होता.

डेब्रानं त्या मुलाला हा फोटो काढून टाकायला सांगितलं. त्याने त्याच्या प्रोफाईलवरून हा फोटो काढला, पण त्याआधीच अनेकांनी हा फोटो शेअर केला होता.

ती सांगते, "या फोटोमुळे काय घडेल याची मला कल्पना नव्हती. पण जेव्हा मी माझ्या घराजवळच्या एका दुकानात गेले, तेव्हा लोकांनी मला ओळखलं. अनेकजण माझ्यावर हसू लागले. खूप वाईट होतं ते."

डेब्रा शाळेत असताना तो फोटो व्हायरल झाला. तिला समजलं की तिच्या वर्गातली मुलंही हे मीम पाहत आहेत.

शाळा सोडावी लागली

ती सांगते, "पुन्हा एकदा लोकांनी माझा फोटो मीम्ससाठी वापरत माझी थट्टा उडवली."

यानंतर लवकरच तिला शाळा सोडावी लागली. डेब्राची आई सांगते तेव्हा ती अगदी एकटी असायची.

त्या सांगतात, "मला तिची मदत करायची होती. पण मला समजतच नव्हतं की मी काय करावं. मला याचं खूप वाईट वाटायचं."

मानसशास्त्रज्ञ मर्क डिसूझा यांच्या मते ही गंभीर बाब आहे. ते म्हणतात, "सोशल मीडिया एखाद्याच्या आयुष्यातली मोठी अडचण ठरू शकतो. कोणाचीही थट्टा उडवण्यासाठी एक क्लीकही आता पुरेसं आहे. कोणताही मजकूर आरामात व्हायरल होऊ शकतो आणि एकदा का तो पसरला की त्या व्यक्तीला स्वतःला त्यापासून लांब ठेवणं कठीण जातं."

आत्महत्येचा प्रयत्न

डेब्रा सांगते, "जे काही सुरू होतं त्यामुळे मी खूप उदास होते. माझ्याकडे जगण्यासाठीचं काहीच कारण नव्हतं."

त्यावेळी डेब्राने 2012 मध्ये घरीच काही गोळ्या घेतल्या. जे चालू आहे त्या सगळ्यातून तिला मुक्ती हवी होती. तिला सगळं संपवायचं होतं. पण सुदैवाने तिला काही झालं नाही.

एक नवी सुरुवात

2014साली हे सगळं संपलं. आता ती समोरच्या आरशात स्वतःकडे पाहू शकत होती. लोकांचा मीम्समधला रस हळुहळू कमी झाला आणि तिचा फोटो शेअर होणंही बंद झालं.

ती सांगते, "माझा आत्मविश्वास पुन्हा वाढायला लागला होता."

उशीरा का होईना, पण डेब्राने शिक्षण पूर्ण केलं. 2015मध्ये तिची एका मुलाशी मैत्री झाली. काही काळाने ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. या मुलाचा पिता आणि ती आता एकत्र नाहीत. पण ती म्हणते, मी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं होतं.

मीम्सना पुन्हा सुरुवात

जुलैच्या सुरुवातीला ती पुन्हा एकदा हैराण झाली, कारण तिचा फोटो पुन्हा एकदा एका मीमसाठी वापरण्यात आला होता.

फेसबुकवरची अनेक पेजेस तिच्या रूपाची, रंगाची थट्टा उडवत होती. तिने ते पेज चालवणाऱ्यांना मेसेज पाठवून हा फोटो शेअर करण्याचं थांबवायला सांगितलं.

ती सांगते, "एका मुलाने मला सांगितलं की त्याला वाटलं की, मी मेलेले आहे म्हणून मग हा फोटो शेअर करायला हरकत नाही."

वंशवादाविरूद्ध लढाई

तिचं मीम शेअर होत असताना तिच्या लक्षात आणखीन एक गोष्ट आली.

ती सांगते, "लोकांनी माझा फोटो शेअर करायला सुरुवात केल्यानंतर त्यावर अनेक वंशवादी, रंगभेदी कॉमेंट्स येऊ लागल्या होत्या. जेव्हा 2012मध्ये हे सगळं घडलं होतं तेव्हा मला फारसं काही समजायचं नाही. पण आता मात्र सारं काही समजतं."

'मला माझा रंग आवडतो'

ती म्हणते, "या मीम्समधून वंशवाद (Racism) स्पष्ट दिसते. कारण ते लोक गोऱ्या मुलींना सुंदर मुली म्हणतात आणि मला कुरूप म्हणतात. एका काळ्या मुलीलाही सुंदर दाखवलं जाऊ शकतं पण ते असं करत नाहीत. मी जे काही सहन केलं किंवा सहन करत आहे त्यावरून मला हेच समजलंय की, ही वंशवादच्या, रंगभेदाच्या विरोधातली लढाई आहे."

डेब्राला आता त्या सगळ्या पेजेसवर कायदेशीर कारवाई करायची आहे, ज्यांनी तिचा फोटो एक मीम म्हणून शेअर केला. बीबीसीकडे आपली बाजू मांडताना फेसबुकने सांगितलं की कोणालातरी त्रास देणं, त्यांचा अपमान करणं त्यांच्या नियमांच्या विरोधात आहे.

डेब्रा सांगते की, "2012मध्ये तिने सगळे मीम्स रिपोर्ट केले होते आणि तिच्या सगळ्या मित्रांनाही असं करायला सांगितलं होतं. पण तरीही हा फोटो हटवण्यात आले नाहीत." ज्यांनी हा फोटो शेअर केला अशा फेसबुक पेजेसला तो फोटो काढून टाकायला सांगितल्यानंतरच त्यांनी तो काढून टाकल्याचं ती सांगते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)