You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलॉन मस्क यांना ट्वीट भोवलं; टेस्लाचं अध्यक्षपद सोडणार
टेस्ला कंपनी खासगी बनवण्यासंदर्भात चुकीचे ट्विट केल्याच्या आरोपानंतर टेस्ला कंपनीचे चेअरमन इलॉन मस्क यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील सेक्युरिटिज अॅंड एक्सचेंज कमिशनसोबत (SEC) चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांना 2 कोटी डॉलर इतका दंड भरावा लागणार आहे. मस्क यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला पण ते मुख्याधिकारी पदावर कायम राहणार आहेत.
ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?
ऑगस्ट महिन्यात त्यांनी ट्वीट केलं होतं. टेस्ला कंपनीला स्टॉक मार्केटमधून काढून घेण्यात येईल आणि कंपनीची मालकी खासगी स्वरूपाची राहील, असं त्यांनी म्हटलं होतं
ज्यांचे शेअर्स आहेत त्यांना काळजी करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सूचित केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढला आणि काही वेळानंतर पडला.
मस्क यांचे ट्वीट दिशाभूल करणारे होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि बाजारात हालचाल निर्माण झाल्याचं SECनं म्हटलं.
पण प्रत्यक्षात मस्क यांनी आपण काय करणार आहोत याबद्दलचा खुलासा केला नाही. व्यवहार कसा होणार, निधी कुठून येणार याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही, SECनं म्हटलं.
त्यांच्या ट्वीटनंतर जेव्हा SECनं त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी खुलासा केला होता. मी फक्त गुंतवणूकदारांचं हित डोळ्यासमोर ठेऊन पारदर्शक कृती केली, असं त्यांनी म्हटलं होतं.
मस्क आणि SECनं करार केला आहे. मस्क कंपनीबाबत ट्वीट करतील तेव्हा ते जबाबदारीने करावेत अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. करारात ठरल्याप्रमाणे त्यांना 45 दिवसांमध्ये चेअरमनपद सोडावं लागणार आहे. पुढील तीन वर्षं ते या पदावर पुन्हा येऊ शकत नाही. मस्क यांनी कोणत्याही पब्लिक कंपनीच्या पदावर राहू नये असं SECला वाटत होतं पण SECसोबत करार केल्यानंतर त्यांना मुख्याधिकारी पदावर राहण्याची परवानगी देण्यात आली.
नव्या चेअरमनपदासाठी नियुक्ती अद्याप बाकी आहे. लवकरच वेगळा चेअरमन नियुक्त करण्यात येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे.
इलॉन मस्क कोण आहेत?
एलन मस्क यांचा जन्म दक्षिण अफ्रिकेत झाला. PayPal या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी डॉलर्स कमवले आणि नंतर टेस्ला, SpaceX या कंपन्या घेतल्या.
जगातील 25 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती, असा फोर्ब्सनं त्यांचा गौरव केला होता. त्यांची संपत्ती 19.7 अब्ज डॉलर इतकी आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)