You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माजी पंतप्रधान शरीफ यांच्या म्हशींचा पाकिस्तान सरकारकडून लिलाव
सरकारची तिजोरी भरण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या म्हशींचीही विक्री केली आहे. नवाज शरीफ यांच्या 8 म्हशी विकून पाकिस्तान सरकारला 19 हजार डॉलर मिळाले आहेत. ही रक्कम भारतीय रुपयात जवळपास 13 लाख रुपये इतकी होते.
या म्हशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होत्या. या म्हशींचं दूध शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुरवलं जात होतं, असं सांगितलं जातं.
खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सरकारनं 'साधेपणा'ची मोहीम हाती घेतली आहे. यावर टीकाही होत असून यात ठोसपणा कमी आणि 'स्टाईल'च जास्त आहे, असं म्हटलं जात आहे. घरातून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.
सरकारने सरकारच्या मालमत्तांची विक्री सुरू केली आहे. पहिल्या प्रयत्नात सरकारने बुलेटप्रुफ जीपची विक्री केली होती.
म्हशींच्या लिलावात शरीफ यांच्या समर्थकांनी सहभाग घेतला होता.
हसन लतिफ यांनी यातील एक म्हैस जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांना विकत घेतली. ते म्हणाले, "माझ्याकडे आधीच 100 म्हशी आहेत. माझ्या नेत्याची ही म्हैस असल्याने ती विकत घेता येणं माझ्यासाठी सन्मानच आहे."
विक्री केलेल्या एका म्हशीला 2 लाख 24 हजार रुपये इतकी किंमत आली. ही म्हैस उत्तम दर्जाचं दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पंतप्रधान कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने लिलाव यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)