You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्रान खान यांनी चालवली सरकारी उधळपट्टीवर कात्री
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सरकारी खर्चात कपात करायला सुरुवात केली आहे. देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करताना खास विमानाचा वापर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
इम्रान खान यांनी सरकारी उधळपट्टी आणि दिखाऊपणा यावर सातत्याने टीका केली आहे. सत्ता स्वीकारल्यानंतर त्यांनी आता या उधळपट्टीस चाप लावण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयनं माहिती मंत्री फवाद चौधरी यांच्या हवाल्याने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
"राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्व अधिकारी, मुख्य न्यायाधीश, सिनेटचे सभापती, नॅशनल असेंब्लीचे सभापती, मुख्यमंत्री क्लब किंवा बिझनेस क्लासने प्रवास करतील," असं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, शिवाय देशावर कर्जाचं ओझं वाढत आहे.
देशाची आर्थिक स्थिती सुधारणे हे पाकिस्तानातल्या नवीन सरकार समोरचं सर्वांत मोठं आव्हान आहे.
पाकिस्तानातील सर्वसाधारण निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इम्रान खान यांनी देशाला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणातच सरकारी खर्चात कपात करण्याचं मनोदय जाहीर केला होता.
ते म्हणाले होते, "सरकारमध्ये साधेपणा होता. इथं निवडलेले नेते स्वतःवरच खर्च करतात. टॅक्स देणाऱ्या जनतेचा पैसा निर्दयीपणे उडवला जातो. मी देशाच्या कराच्या पैशाचं संरक्षण करीन."
माहिती मंत्री चौधरी म्हणाले, "पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना यापूर्वीही फर्स्ट क्लासने प्रवास करायला परवानगी नव्हती. ते नेहमीच बिझनेस क्लासने प्रवास करतात."
पाकिस्तानच्या कॅबिनेटने पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अधिकारी यांचा निधी संदर्भातील विशेषाधिकारालाही चाप लावला आहे.
चौधरी यांनी दावा केला आहे की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विशेषाधिकारात 51 अब्ज रुपये खर्च केले आहेत.
निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान यांनी लहान घरात राहण्याचा आणि पाकिस्तानाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत सरकारची कामगिरी सुधारण्याचं आश्वासन दिलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)