You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान निवडणूक : विजयानंतर इम्रान खान भारताबद्दल काय म्हणाले?
भारतातल्या माध्यमांनी माझी प्रतिमा बॉलिवूडच्या खलनायकासारखी रंगवली. त्याचं वाईट वाटतं, असं इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणुकीनंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
पाकिस्तानची संसदीय निवडणूक बुधवारी पार पडली आणि संध्याकाळी 6 नंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. इम्रान खान यांच्या PTI (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) या पक्षाला 119 जागांसह आघाडी मिळाली मिळाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.
गुरुवारी संध्याकाळी इम्रान खान यांची पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यात त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
इम्रान खान काय म्हणाले?
इम्रान खान यांची पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यात त्यांनी त्यांचा अजेंडा मांडला.
- 1996 मध्ये पक्षाची स्थापना केली. आता आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. जिनांच्या स्वप्नातला पाकिस्तान प्रत्यक्षात आणणं हे माझं स्वप्नं आहे.
- गरिबी रेषेखालील लोकांना वर आणण्यासाठी धोरणं आखली जातील. शाळेबाहेर असलेल्या मुलांना शिक्षणासाठी संधी देऊ.
- राजकीय विरोधकांशी सूड भावनेनं वागणार नाही. देशाच्या प्रशासन व्यवस्थेत सुधारणा करू.
- करदात्यांच्या पैशांतून डामडौल करणार नाही. पंतप्रधानांच्या राजेशाही महालात राहणार नाही.
- अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरणात आमूलाग्र बदल करणार.
- गरिबी निर्मुलनासाठी चीनच्या मॉडेलचा अभ्यास करणार.
भारताबद्दल ते म्हणाले...
- भारताची सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार. भारत-पाकिस्तान यांच्यातला व्यापार हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा.
- भारतातल्या माध्यमांनी माझी प्रतिमा बॉलिवूडच्या खलनायकासारखी रंगवली. त्याचं वाईट वाटतं.
- क्रिकेटच्या निमित्तानं मी भारतात खूप फिरलो आहे. पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध सुधारावेत असं मला वाटतं.
- काश्मीरचा मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. गेल्या 30 वर्षांत काश्मिरी जनतेनं खूप भोगलं आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन सुरू आहे.
- भारत एक पाऊल पुढे आला तर आम्ही दोन पावलं पुढे येऊ. दोन्ही देशातली मैत्री उपखंडासाठी आवश्यक आहे. संवादानं प्रश्न सुटू शकतात.
पक्षाच्या ट्विटर हॅण्डलनं या पत्रकार परिषदेची माहिती दिली होती.
पंजाब आणि सिंध
PTIनं पंजाबमध्ये सरकार स्थापन करत असल्याचं म्हटलं आहे. पक्षप्रमुख इम्रान खान यांच्या घराबाहेर झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते नईम-उल-हक यांनी ही माहिती दिली. आमचा पक्ष केंद्रात सत्तेवर येणारच आहे, पंजाबमध्येही आम्ही सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ असं ते म्हणाले.
सिंघ प्रांतात त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करू असंही ते म्हणाले. कराचीमध्ये त्यांनी एमक्यूएमचा पराभव केला असल्याचा दावाही त्यांनी केला.
लाहोर आणि रावळपिंडीच्या रस्त्यावर पीटीआय समर्थकांचा जल्लोष सुरू आहे. #JeetayGaKaptaan हा हॅशटॅग पाकिस्तानात ट्रेंड होतोय.
मतमोजणीचं काम उशीरापर्यंत सुरू होतं. निकालाला होणाऱ्या विलंबामुळे त्यामुळे निवडणूक आयोगाला टीकेचा सामना करावा लागला.
आता आलेल्या माहितीनुसार, 49 टक्के मत केंद्रांवर मोजणी पूर्ण झाली आहे. त्यात इम्रान खान यांच्या पक्षाची PTI (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) आघाडीवर कायम आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ (PML-N) दुसऱ्या स्थानावर आहे. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 137 जागा मिळणं आवश्यक आहे.
निकालांना होणारा विलंब जाणीवपूर्वक रचलेलं कारस्थान आहे. घोटाळ्याची शक्यता आहे, असे आरोप होऊ लागल्यानंतर साधारण पहाटे 4.30च्या सुमारास पहिला निकाल जाहीर करण्यात आला. रावळपिंडीतून तहरीक ए इन्साफ पार्टीचे उमेदवार चौधरी मोहम्मद अदनान जिंकल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली.
मुख्य निवडणूक अधिकारी सरदार रझा खान यांनी घोटाळ्याचा आरोप फेटाळून लावत हा विलंब तांत्रिक कारणांमुळे होत असल्याचं म्हटलं आहे. तांत्रिक कारण, सुरक्षा आणि हवामान यामुळे विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ (PML-N) या पक्षाने या निवडणूकीत घोटाळा करत असल्याचा आरोप आयोगावर केला आहे. निवडणूक आयोगाचे एक वरिष्ठ अधिकारी बाबर याकूब यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. "रिझल्ट्स ट्रान्समिशन सिस्टीममुळे विलंब होत आहे. एकाच वेळी हजारो निवडणूक अधिकारी या मशीनचा वापर करतात तेव्हा मशीन बंद पडतं," असं ते म्हणाले.
आतापर्यंतचा कल काय सांगतो?
एकूण जागा 272
आतापर्यंत स्पष्ट झालेल्या कलानुसार PTIला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
तरीही ते बहुमताजवळ जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
PML-Nचे नेते शहबाझ शरीफ यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. मतमोजणीच्या वेळी पार्टीच्या एजंट्सना देण्यात येणाऱ्या फॉर्मवरून हे आरोप त्यांनी केले आहेत.
इतर पक्ष्यांच्या साथीने याविरोधात तक्रार करणार असल्याचं शरीफ यांनी सांगितलं.
दरम्यान, निवडणूक कल स्पष्ट होत असल्याने इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानात 2013च्या गेल्या निवडणुकीच्या वेळी नवाझ शरीफ यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा जिंकूनही बहुमत मिळू शकलं नव्हतं. तशीच परिस्थिती आता इम्रान खान यांच्या पक्षाची होणार, असं विश्लेषक सांगत आहेत.
जाणकारांच्या मते, या वेळी मुस्लीम लीग नवाझ हा पक्ष मजबूत विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल.
हेही वाचलंत का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)